Exclusive
Typography

अभिनय कट्ट्यावर आजपर्यंत विविध कलाकृतींचे सादरीकरण, व्याख्यान, चर्चा ते अनेक प्रयोग झाले. अशाच चर्चांपैकी अतिशय महत्वपूर्ण रोखठोक चर्चा म्हणजे ३६० क्रमांकाचा रविवारचा अभिनय कट्टा. अभिनय कट्ट्याचे दिपप्रज्वलन कट्ट्याचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. कट्ट्याच्या सुरुवातीला सुशील परबळकर व महेश रासने या कलाकारांनी मराठी आमची मायबोली या संकेत देशपांडे लिखित द्विपात्रीचे सादरीकरण केले. आजचा मराठी चित्रपट, कलाकार व रसिक प्रेक्षकांची मानसिकता या विषयावर अभिषेक सावळकर व परेश दळवी यांनी द्विपात्री तसेच अभिनय कट्टा ऍक्टींग अकँडमी च्या कलाकारांनी नृत्याभिनयाच्या माध्यमातून सुरेख सादरीकरण केले. तसेच आदित्य म्हस्के या बालकलाकाराने इंडियावाले या गाण्यावर अंगावर रोमांच उभं करणारं नृत्य सादर केलं. त्यानंतर थेट मराठी चित्रपट जगतो कसा या प्रमुख कार्यक्रमाला सुरुवात झाली.

मराठी चित्रपटाबाबत कमालीचे आपलेपण मानणारा मोठाच वर्ग असून त्यांच्या त्या प्रेमाचा स्वीकार करून मराठी चित्रपटाने त्यानुसार पावले उचलावीत असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट विश्लेषक दिलीप ठाकूर यानी ठाणे येथे आयोजित रोखठोक चर्चेत बोलताना केले. ठाणे शहरातील नौपाडा येथील 'अभिनय कट्टा' आयोजित कार्यक्रमात दिलीप ठाकूर हे बोलत होते. कट्टाचे संयोजक किरण नाकती यांनी ठाकूर याना 'मराठी चित्रपट जगतो कसा?' या विषयावर तासभर प्रश्न केले.

ठाकूर यावेळेस म्हणाले, "राष्ट्रीय व राज्य चित्रपट पुरस्कार, कान्स चित्रपट महोत्सवात मराठी चित्रपट, गोवा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील भारतीय पॅनोरमात मराठी चित्रपट अशा विविध कारणास्तव मराठी चित्रपटाला खूपच चांगले दिवस आलेत असे सकारात्मक वातावरण असते. पण एखाद्या शुक्रवारी पाच सात मराठी चित्रपट प्रदर्शित होणे, खान हिरोंच्या बड्या हिंदी चित्रपटासमोर मराठीला चित्रपटगृहच न मिळणे, एखादा कसदार चित्रपट एकाच आठवड्यात गायब होणे असे काही घडताच मराठी चित्रपट खूपच कठीण काळातून जात आहे असा नकारात्मक सूर उमटतो. त्यामुळेच मराठी चित्रपटाला चांगले दिवस आले आहेत का यावर हो अथवा नाही यापैकी काहीच उत्तर देता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालीय."

नाकती यांच्या एका प्रश्नाला उत्तर देताना ठाकूर म्हणाले, "मराठी चित्रपट कॅम्पेनमध्ये कमी पडतोय. त्याच्या जाहिरातीचे बजेट वाढले असले तरी त्यात कल्पकतेचा अभाव जाणवतोय. वृत्तपत्र जाहिरातीतीमधून कॅचलाईन गायब झालीय. एकच ठोकळा आठवडाभर प्रसिद्ध होतो. ट्रेलरमधून चित्रपट दिसू नये तर त्याच्याबाबतचे कुतूहल निर्माण व्हावे. भरपूर प्रमाणात चित्रपट प्रदर्शित करण्यापेक्षा मराठीची म्हणून ओळखल्या जाणार्‍या चित्रपटगृहात दिवसभरचे सगळेच खेळ घ्यावेत. म्हणजे मराठी रसिकांसमोर नेमके धोरण राहिल व त्यांचा विनाकारण गोंधळ उडणार नाही. मराठी प्रेक्षकांपर्यंत आपण कसे पोहचावे यासाठी नेमका विचार व्हावा." मराठी चित्रपट गुणवत्तेत सरस आहेत आणि प्रेक्षकदेखिल मराठी चित्रपट पाहू इच्छिताहेत, पण या दोघांत पडणार्‍या अंतरावर सकारात्मक विचार व्हायला हवा. मराठी चित्रपटाच्या संदर्भातील काही जुनी उदाहरणेही आजच्या मराठी चित्रपटाला पूरक ठरतील असेही ठाकूर म्हणाले.

जिजामाता उद्यानात झालेल्या या गप्पांना रसिकांची चांगली उपस्थिती होती. कार्यक्रमाअंती कट्ट्याचे संचालक व चित्रपट दिग्दर्शक किरण नाकती यांनी मराठी चित्रपट जगवण्याचं काम आपल्या सर्वाना करायचंय असं आवाहन उपस्थित सर्वच रसिक प्रेक्षकांना केलं.

Dilip Thakur on Abhinay Katta 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement