Exclusive
Typography

मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं. आपल्या आई-वडीलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात, तेव्हा आई-वडीलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो. दिवंगत अभिनेते मधुकर तोरडमल हे मराठी नाट्य-सिनेसृष्टीतील खूप मोठं नाव. त्यांची मुलगी तृप्ती तोरडमल आपल्या वडीलांच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनेत्री बनली आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाद्वारे तृ्प्ती अभिनेत्री म्हणून मोठ्या पडद्यावर पदार्पण करत आहे.

जे. ए. एन्टरटेन्मेंट आणि पॅनोरमा स्टुडिओजची प्रस्तुती असलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाची निर्मिती जॅान अब्राहम करत आहे. स्वप्ना वाघमारे जोशी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमाद्वारे जॅानची पावलं मराठीकडे वळण्यासाठीही तृप्तीच कारणीभूत आहे. तृप्तीला मराठी सिनेमाची निर्मिती करायची होती. स्वप्ना वाघमारे यांची जशी ती मैत्रीण आहे, तशीच जॅानचीही आहे. जॅानसोबत तृप्तीचे घरगुती ऋणानुबंध आहेत. जॅानला मराठी सिनेमा करायचा होताच. जेव्हा ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाबद्दल आणि त्यावर आधारित असलेल्या सिनेमाबद्दल सांगितलं, तेव्हा तो स्वत:हून या सिनेमाच्या निर्मितीत सहभागी व्हायला तयार झाल्याचं तृप्तीचं म्हणणं आहे.

Trupti Toradmal Debut Savita Damodar Paranjpe 01

‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाचा सिनेमा बनवण्याविषयी बोलताना तृप्ती म्हणाली की, "अभिनयक्षेत्रात वडिलांचं खूप मोठं नाव आहे, पण मी अभिनेत्री बनायचं असं कधीच ठरवलं नव्हतं. प्रोडक्शन करण्याची माझी इच्छा होती. त्या निमित्ताने मी आणि स्वप्नाताई शिरीष लाटकर यांना भेटण्यासाठी त्यांच्याकडे निघालो होतो. त्यावेळी स्वप्नाताईंनी गाडीमध्ये या नाटकावर सिनेमा बनवायचा विचार असल्याचं सांगितलं. ते मला खूप भावलं आणि गाडीतून उतरण्यापूर्वीच आमचा विचार बदलला. शेखर ताम्हाणे यांच्याशी फोनवर बोलून नाटकाच्या हक्काबाबतही चर्चाही झाली. अशा प्रकारे अचानकपणे ‘सविता दामोदर परांजपे’ चा नाटक ते सिनेमा असा प्रवास सुरू झाला."

खरं तर ‘सविता दामोदर परांजपे’ हा तृप्तीचा अभिनयातील पदार्पणाचा सिनेमा आहे, पण ती या सिनेमाबाबत खूप कॅान्फीडन्ट आहे. ती म्हणते की, "पप्पांचा आशिर्वाद माझ्या मागे आहे. त्यामुळेच हे घडून आलं आहे. आज त्यांना जाऊन वर्ष होतं आहे, पण ते गेले असं वाटतच नाही. कदाचित मी अभिनय करावं असं त्यांना वाटत होतं, पण त्यांनी कधीच कोणतीही गोष्ट माझ्यावर लादली नाही. त्यामुळे ‘अभिनय कर’ असंही कधी म्हणाले नाहीत, पण त्यांच्या प्रेरणेमुळेच मी अभिनेत्री बनले आहे. या सर्व प्रवासात स्वप्नाताईंनी मला खूप सांभाळून घेतलं. अभिनयाच्या वर्कशॅापखेरीजही त्यांनी बऱ्याच गोष्टी समजावून सांगितल्या. त्या माझ्या पहिल्या समीक्षक आहेत. त्यामुळेच एखादा सीन झाला की, मी तो मॅानिटरवर पाहण्यापूर्वी स्वप्नाताईंकडे पाहायचे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव मला माझ्या कामाची पोचपावती तर द्यायचेच, पण पुढील सीन करण्यासाठी हुरूपही वाढवायचे."

Trupti Toradmal Debut Savita Damodar Paranjpe 04

शेखर ताम्हाणे यांच्या दिग्दर्शनाखाली १९८५ मध्ये मराठी रंगभूमीवर अवतरलेल्या ‘सविता दामोदर परांजपे’ या नाटकाने त्या काळातील प्रेक्षकांचा थरकाप उडवला होता. नाटकामध्ये राजन ताम्हाणे आणि रीमा लागू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाचं लेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. नाटकात रीमा लागूंनी साकारलेली भूमिका तृप्तीने साकारली आहे. तृप्तीच्या जोडीला सुबोध भावे आणि राकेश बापट, पल्लवी पाटील, अंगद म्हसकर, आणि सविता प्रभुणे या कलाकारांच्या या सिनेमात भूमिका आहेत.

येत्या ३१ ऑगस्ट ला ‘सविता दामोदर परांजपे’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Trupti Toradmal Debut Savita Damodar Paranjpe 03

Trupti Toradmal Debut Savita Damodar Paranjpe 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News