Exclusive
Typography

मराठी सिनेसृष्टीत नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील सिनेमे बनत असतात. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळताना नरेश बिडकर यांनीही अशाच एका नावीन्यपूर्ण विषयावर सिनेमा बनवला आहे. ‘Once मोअर’ असं शीर्षक असलेल्या या सिनेमात आशुतोष पत्की मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांचा चिरंजीव असलेल्या आशुतोषचा हा पहिलाच मराठी सिनेमा आहे.

अभिनय हे आशुतोषचं पॅशन आहे. त्यामुळेच बारावीनंतर हॅाटेल मॅनेजमेंट पूर्ण करून तो थेट अभिनयाकडे वळला. अनुपम खेर अॅकॅडमीमध्ये अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं. ‘मेंदीच्या पानावर’ आणि ‘दुर्वा’ या गाजलेल्या मालिकांच्या माध्यमातून आशुतोष घराघरात पोहोचला आहे. आशुतोषचा पहिला वहिला सिनेमा असलेला ‘Once मोअर’ १२ ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

वडील जरी संगीतकार असले तरी अभिनयाकडे वळण्याबाबत आशुतोष म्हणाला की, "गाणं आणि संगीत बालपणापासूनच ऐकत आलो आहे, पण अभिनय हे माझं पॅशन आहे. बाबांनीही कधीच कोणत्याही गोष्टीसाठी फोर्स केला नाही की अडवलं नाही. त्यामुळे हॅाटेल मॅनेजमेंटनंतर अभिनयाचं ट्रेनिंग घेऊन मालिकांमध्ये काम केलं. हा सिनेमाही मला त्यांच्यामुळेच मिळाला असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. या सिनेमाचे निर्माते सुहास जहागीरदार बाबांना खूप मानतात." त्यांनी सिनेमात काम करण्याबाबत विचारलं, तेव्हा कथा आणि व्यक्तिरेखा ऐकून होकार दिला. दिग्दर्शक नरेश बीडकर यांनी जेव्हा मला कथा ऐकवली तेव्हाच त्यांचं व्हीजन क्लीयर होतं. त्यामुळे सिनेमात काम करताना खूप सोपं गेलं. सिनेमा जसा कागदावर होता तसाच त्यांनी तो पडद्यावरही उतरवला आहे. अभिनयाचे विविध कंगोरे दाखवणारी ही भूमिका माझ्यासाठी आव्हानात्मक होती."

Once More Marathi Film Title 01

दिग्दर्शनातील पहिलं पाऊल आणि आशुतोषसारख्या नवोदित कलाकारासोबत काम करण्याच्या अनुभवाबाबत नरेश बिडकर म्हणाले की, "आशुतोषसाठी सिनेमा हे माध्यम जरी नवीन असलं तरी अभिनय किंवा कॅमेरा फेस करणं त्याच्यासाठी नवीन नाही. त्याने यापूर्वी दोन मोठ्या मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्याच्या अभिनयाबाबत प्रश्नच उद्भवत नाही. नवीन चेहरा ही ‘Once मोअर’च्या कथानकाची खरी गरज होती. ती ओळखून आशुतोषची निवड केली. त्यानेही आमचा विश्वास सार्थ ठरवत खूप चांगलं काम केलं आहे."

या सिनेमात आशुतोषसोबत धनश्री दळवी हा नवा चेहरा दिसणार आहे. यांच्या जोडीला रोहिणी हट्टंगडी, पूर्णिमा तळवलकर, भारत गणेशपुरे, सुशांत शेलार आदी मराठी सिनेसृष्टीतील अनुभवी कलाकारही या सिनेमात आहेत. श्वेता बिडकर यांनी या चित्रपटाचं लेखन केलं आहे. छायांकन संजय सिंग यांचं आहे. मुंबईसह फिल्मसिटी व गोवा येथील विविध लोकेशन्सवर या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यात आलं आहे. वंशिका क्रिएशन, देवस्व प्रोडक्शन, लवंदे फिल्म्स व विष्णू मनोहर फिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘Once मोअर’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. धनश्री विनोद पाटील आणि सुहास जहागीरदार यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. विष्णू मनोहर, निलेश लवंदे, अभय ठाकूर या सिनेमाचे सहनिर्माते आहेत. सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांची निर्मिती असलेला ‘Once मोअर’ हा पहिलाच सिनेमा आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement