Exclusive
Typography

१९९८ साली, दूरदर्शनसाठी नववर्षाच्या निमित्ताने एका विशेष विनोदी कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मी विजू मामा बरोबर पहिल्यांदा काम केले. वर्षा उसगावकर ह्यांच्या नवऱ्याची भूमिका होती. त्यावेळी वर्षा उसगावकर प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या आणि त्या जास्त करून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हिरॉईन म्हणूनच काम करीत होत्या. माझी पण वर्षाजीं बरोबर काम करण्याची पहिलीच वेळ. विजूमामाने मला शुटिंगच्या आधी विचारले "तू तिला नक्की सांगितलंय ना, तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत मी असणार ते". मी वर्षा उसगावकर ह्यांना स्क्रिप्ट वाचायला दिले तेंव्हा ते वाचून त्यांनी मला विचारले माझ्या नवऱ्याची भूमिका कोण करणार आहे. मी 'विजय चव्हाण' सांगितल्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या "विजय कॉमेडी छान करतो, परफेक्ट आहे तो या भूमिकेला".

Mahesh Tilekar with Vijay Chavan 02

विजय चव्हाण हे नावच असं होतं की या नावाला कधीच कुठल्या सहकलाकाराने आक्षेप घेतला नाही. कारण प्रत्येकाला खात्री असायची की विजूमामा आहे म्हणजे धमाल येणार आणि तशी धमाल त्यांच्या बरोबर काम करताना मला पण आली. जाणवले पण नाही की मी पहिल्यांदाच त्यांच्या बरोबर काम करतोय. विजू मामा हा कलाकार असा होता की एकदा त्यांच्या बरोबर काम केलं, त्याच्या सहवासात तुम्ही आला की पुन्हा पुन्हा त्यांच्या बरोबर काम करण्याचा, त्याच्या सहवासात राहण्याचा 'मोह' प्रत्येकाला व्हायचा. माझ्याकडे विजूमामानी काम केल्यानंतर आमचे सूर जुळले. माझ्या आधार, गाव तसं चांगलं, लाडी गोडी, वन रुम किचन या चित्रपटांमध्ये, काही जाहिरातीमध्ये, इतरही प्रोजेक्ट मध्ये आणि 'मराठी तारका' च्या काही शो मध्ये विजू मामाचा सहभाग होता. दूरदर्शनसाठी काही टेलिफिल्म, छोट्या मालिका करत असताना २००० साली नवीनच सुरू झालेल्या झी टीव्ही साठी (तेंव्हाचे अल्फा टीव्ही) माझी निर्माता दिग्दर्शक म्हणून 'अफलातून' मालिका सुरू झाली. यात विजूमामा मुख्य भूमिकेत विजय लाकडे नावाने, मयताचा सामान विकणारा दाखवला होता.

Mahesh Tilekar with Vijay Chavan 03

त्यावेळी विजूमामाचं 'तू तू मी मी' नाटक जोरात चालू होतं. चित्रपटाचे शुटिंग आणि नाटकाचे शो यामुळे खूपच बिझी असल्यामुळे सिरीयल करायला खरं तर मामा कडे वेळ न्हवता, पण माझ्यासाठी म्हणून त्याने ती सिरीयल केली. पुण्यात माझ्या शुटिंगसाठी येताना दरवेळी वेगवेगळ्या ठिकाणावरून सिनेमाचे शुटिंग संपवून रात्रीचा बसने प्रवास करून विजूमामा पुण्यात यायचा. मी बरेचदा विचारायचो मामा माझ्या शुटिंगसाठी तुम्हाला रात्रीचा प्रवास करून यावं लागतंय, त्यावर "नाहिरे, मला नाटकामुळे सवय आहे" असं हसऱ्या चेहऱ्याने तो सांगायचा. शुटिंग संपल्यावर रात्री पुण्यातील दुर्गाची बिर्याणी मिळाली की मामा खुश. काहीवेळा पुण्यात विजू मामाच्या नाटकाचा शो असेल तेंव्हा तो दिवसभर मला शुटींगसाठी वेळ द्यायचा आणि रात्री नाटक करून नाटकाच्या गाडीने मुंबईला परत जायचा आणि मग मला गंमतीने म्हणायचा मी तुझे प्रवासाचे पैसे वाचवतो. माझ्याबरोबर अनेक प्रोजेक्टमध्ये विजूमामा होता.  शुटिंगसाठी, शो साठी कधी त्याच्या डेट्स विचारायला फोन केला की विजूमामानी डेट्स सांगितल्यावर पुढे मी पैश्याचं विचारायला सुरवात केली की "अरे आवाज कट होतोय तुझा, ऐकायला येत नाही" असं बोलून विजूमामा नेहमी पैश्याचं बोलायला टाळायचा. माझ्याकडे कधीच किती पैसे देणार म्हणून विचारणा केली नाही की आमच्या मध्ये कधीच 'व्यवहार' आला नाही. मी देईन ते पैसे तो घ्यायचा.

Mahesh Tilekar with Vijay Chavan 04

माझी 'अफलातून' सिरियल चालू असताना विजूमामानेच त्याच्या नाटकात काम करणाऱ्या भरत जाधव, क्रांती रेडकर, अंकुश चौधरी यांना माझ्या सिरियल मध्ये काम द्यायला सांगितले आणि मी त्यांना संधी दिली. आपल्या सहकलाकारांना तो नेहमीच सांभाळून घ्यायचा. अफलातून सिरियलला प्रत्येक एपिसोडला हिंदी, मराठी मधील एक सेलिब्रिटी मी काम करायला बोलवायचो तेंव्हा "महेश, तुझ्यामुळे मला या मोठ्या कलाकारांच्या बरोबर काम करायला मिळतंय" असं नम्रपणे विजूमामा मला सांगायचा. याच सिरियलच्या प्रत्येक एपिसोडला विजूमामाला नवीन आणि भारी पँट शर्ट, टी शर्ट घालायला द्यायचो, त्यावर विजूमामा म्हणायचा माझी कपड्यांची सगळी हौस तुझ्या सिरियलमुळे पूर्ण होतेय. त्याला कारणही तसेच होते, पुण्यात टिळक स्मारकच्या बाहेर लायनीत जी दुकानं आहे, तिथं 'न्यू फॅशन ड्रेसेस' या नावाने एक दुकान होतं. त्याचे मालक पटेल, यांच्याशी माझी ओळख झाली होती, नाटकासाठी जेंव्हा भरत जाधव, अंकुश चौधरी टिळक स्मारकाला आले की ते सहज म्हणून कपडे बघायला आजूबाजूच्या दुकानात जायचे, तेंव्हा हे दोघे तसे फार यशस्वी झाले न्हवते, त्यांचाही संघर्षाचाच काळ चालू होता.

Mahesh Tilekar with Vijay Chavan 05

माझ्यामुळे अंकुश, भरत, विजूमामा यांची पटेल यांच्याशी ओळख झाली होती. ते चांगल्या डिस्काउंट मध्ये कपडे द्यायचे, कधी कधी तर "जो आपको देना है वो दे दो" असें म्हणायचे. दुकानात गेल्यावर, चहा, नाश्ता मागवायचे. तेंव्हा विजूमामा चेष्टा करीत पटेल यांना म्हणायचे "तुम्हीच असे पहिले गुजराती माणूस आहात, जो धंदा वाढवण्या ऐवजी तो बंद करण्याच्या मार्गावर आहात". त्यावर हसत श्री पटेल म्हणायचे "आप हमारे महेशभाई के दोस्त हो, महेशभाई बडे बन जाये तो हमे खुशी हैं." पटेल त्यांच्या दुकानातील नवीन कपडे प्रत्येक एपिसोडसाठी विजूमामाला घालायला द्यायचा, शुटिंग संपले की ते कपडे आम्ही परत द्यायचो, त्याचे ते पैसेपण घ्यायचे नाहीत. उलट नवीन काही कपडे आले की मला स्वतःहून सांगायचे "महेशभाई, नये कपडे आये है, विजूमामा के लिये लेके जाओ". फक्त विजूमामाच नाही तर इतर कलाकारांसाठी देखील पटेल मला कपडे द्यायचे, माझ्या पहिल्या'आधार' चित्रपटासाठी पण त्यांनी कपडे दिले होते. मला मदत व्हावी म्हणून पटेल नेहमीच उभे राहिले.

Mahesh Tilekar with Vijay Chavan 06

सध्या श्री पटेल अमेरिकेत राहतात, पण आजही टिळक रोड ला गेल्यावर श्री पटेल, त्याचं 'न्यू फॅशन ड्रेसेस' दुकान आणि विजूमामा यांची आठवण हमखास येतेच. माझ्याकडे अनेक मोठे कलाकार काम करायचे, कधी मोठया व्यक्ती ज्यांना भेटणं अवघड आहे, त्याही मला भेटायच्या. तेंव्हा विजूमामा म्हणायचा महेशकडं 'लिंबू' आहे, ते तो फिरवतो आणि मग सगळे त्याच्याकडे काम करायला तयार होतात'. त्यामुळे विजूमामा नेहमी मला 'लिंबू' म्हणून चिडवायचा. गाव तसं चांगलं, वन रूम किचन या माझ्या चित्रपटांच्या शुटिंग वेळी तर आम्ही प्रमाणाबाहेर धमाल केलीये. शुटिंग नंतर निळूभाऊ, विजू मामा, संजय नार्वेकर, नागेश भोसले अशी आमची सगळ्यांची गप्पांची मैफिल रंगायची.

Mahesh Tilekar with Vijay Chavan 07

मराठी तारका च्या पहिल्या आणि नंतरच्या काही शो मध्ये विजूमामाने डान्स केला होता. पुण्यात तारकांचा पहिला शो झाला तेंव्हा दुसऱ्या दिवशी पुण्यातल्या टाइम्स ऑफ इंडिया या इंग्लीश पेपरमध्ये विजूमामाचा डान्स करतानाचा फोटो आल्यावर तो पाहून तो मुद्दाम तारकांना चिडवू लागला "बघा, तुमच्यापेक्षा माझ्यात डान्स टॅलेंट खूप आहेत, म्हणून माझा फोटो इंग्लिश पेपरमध्ये आला, आता मी इंटरनॅशनल डान्सर आहे". असं बोलून तो स्वतःवरच विनोद करून सगळ्यांना हसवायचा. 'मराठी तारका' शो पाहायला राष्ट्रपतींना बोलावण्यासाठी, त्यासाठी त्यांना भेटायला मी दिल्लीत निघालो हे फक्त विजू मामालाच माहीत होतं. तेंव्हा मला बेस्ट ऑफ लक देण्यासाठी विजूमामाने मला फोन केला आणि सांगितलं महेश काही करून यावेळी चांगलं 'लिंबू' फिरवून ये. राष्ट्रपतींनी आपला कार्यक्रम पाहिला तर आपल्या तारका शो ची उंची आणखी वाढेल. माझ्याकडे राष्ट्रपतींची रीतसर अपॉइंटमेंट न्हवती, त्यामुळे त्या भेटतील की नाही याची शंका होती. मी दुपारी तिथे पोचलो आणि संध्याकाळी ७ वाजता राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची भेट झाली. त्यांनी मलाच राष्ट्रपती भवन मध्ये 'मराठी तारका' कार्यक्रम करण्याचं आमंत्रण दिले आणि दोन डेट्स देऊन यातली जी तुम्हाला जमेल त्यादिवशी राष्ट्रपती भवन मध्ये मराठी तारका कार्यक्रम करू असं आश्वासन दिलं. मला प्रचंड आनंद झाला, तिथून बाहेर पडल्यावर पहिला फोन विजूमामाला करून मी आनंदाची बातमी दिली की आपला कार्यक्रम पाहायला मुंबईत येण्याऐवजी आपल्यालाच राष्ट्रपतींनी राष्ट्रपती भवनात मराठी तारका करायला आमंत्रीत केलंय. ते ऐकून विजूमामा बोलला " महेश,आत्ता मला खात्री पटली की तुझ्याकडे जे लिंबू आहे ते साधंसुदं लिंबू नाही, तर ते संत्र्याएवढं मोठं लिंबू आहे".

Mahesh Tilekar with Vijay Chavan 08

राष्ट्रपती भवनात कार्यक्रमाच्यावेळी राष्ट्रपतींचे आगमन झाले तेंव्हा राष्ट्रपतींच्या स्वागताला मी, वर्षाजीं उसगावकर आणि हक्काचा माणूस म्हणून विजू मामा माझ्याबरोबर उभा होता. कार्यक्रम झाल्यानंतर रात्री आम्ही सगळे जेवायला बसलो तेंव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. विजूमामाने सगळ्यांच्या समोर माझे आभार मानत गमतीत सांगितले " महेश, चांगला अभिनय करून आम्हाला राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळणं कठीण होतं पण तारका शो मध्ये नाचायला संधी मिळून राष्ट्रपतींच्या हस्ते सत्कार होणं आणि राष्ट्रपती भवन पाहायला मिळण हे भाग्य तुझ्यामुळेंच मिळालं आम्हाला". खरं तर माझं भाग्य की मला विजू मामा सारख्या अफलातून कलाकारा बरोबर काम करता आले.

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Source: Facebook - Mahesh Tilekar

Mahesh Tilekar with Vijay Chavan 09

Mahesh Tilekar with Vijay Chavan 10

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement