Exclusive
Typography

सरस्वतीचा आशीर्वाद - कुठल्याही कलाकाराला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'लक्ष्मी' आणि 'सरस्वती' चा आशीर्वाद मिळणं फार आवश्यक आहे. मेहनतीने, कष्ट करून 'लक्ष्मी' मिळवता येते, पण केवळ नशीब आणि योग असेल तरच 'सरस्वती'चा आशीर्वाद मिळतो. आशा भोसले या सरस्वतीचा सहवास आणि आशीर्वाद मला लाभला याबद्दल परमेश्वराचे मानू तेवढे आभार कमीच आहे. २००७ साली माझ्या 'मराठी तारका' पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला गेस्ट म्हणून बोलावण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच मी आशा भोसले यांना फोन केला, पण त्या बिझी असल्यामुळे येऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग मी माधुरी दीक्षितला गेस्ट म्हणून बोलावलं, त्यावेळचे जवळपास सर्वच जुने नवे कलाकार मोठ्या संख्येने एकत्र या कार्यक्रमाला आले. मुंबईतल्या सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. माधुरीची मराठी कलाकारांच्या कार्यक्रमाला येण्याची ती पहिलीच वेळ होती. कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी आशा भोसले यांनी मला भेटायला घरी बोलावले.

Mahesh Tilekar with Asha Bhosle 02

मी त्यांना 'मराठी तारका' पुस्तक भेट दिले, तेंव्हा त्यांनी माझ्या कार्यक्रमाला येऊ न शकल्यामुळे खंत व्यक्त केली आणि मला सांगितले की त्यांचे मित्र प्रसिद्ध फोटोग्राफर गौतम राज्याध्यक्ष यांनी आशाताईंकडे माझ्याबद्दल खूप कौतुक केले आहे. ती माझी आणि आशाताईंची पहिली भेट. त्यानंतर माझ्या 'गाव तसं चांगल' या सिनेमात एक लावणी गाण्यासाठी मी त्यांना विचारले, त्या हो म्हणाल्या. मी त्यांना सांगितलं संगीतकार नवीनच आहे, त्यावर त्यांनी "नवीन लोकांना कुणीतरी संधी दिलीच पाहिजे"असे म्हणत मला लगेच माझ्या सिनेमाच्या संगीतकाराला फोन करायला सांगून त्याच्याशी त्यांनी फोनवर गाण्याबद्दल चर्चा केली. संगीतकाराला तर सुखद धक्का होताच की आशा भोसले स्वतः त्याच्याशी बोलतायेत आणि त्याच्या संगीतकार म्हणून पहिल्याच चित्रपटात त्या गाणार आहेत. मी त्यांना पैश्याविषयी विचारले तर त्या म्हणाल्या पैश्याचं टेन्शन घेऊ नको. प्रत्यक्ष गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी त्या आल्यावर आधी मी पैश्याचं पाकीट त्यांना देत सांगितलं "आशाताई हे पाकीट घ्या" त्यावर त्यांनी आधी गाणं रेकोर्ड होऊ दे मग घेते असं सांगितलं.

Mahesh Tilekar with Asha Bhosle 03

नवीन संगीतकार असूनही आणि अनेकदा लावणी गायलेल्या असल्या तरी आशाताई संगीतकाराला आणि मला सतत विचारत होत्या बरोबर गातेय ना मी, तुम्हाला पाहिजे तसं". यावर आम्ही काय बोलणार त्यांना ऐकून आमचे कान तृप्त होत होते. रेकॉर्डिंग संपल्यावर मी त्यांना पैश्याचं पाकीट दिल्यावर त्यांनी पाकीट हातात घेऊन त्यातील पैसे काढून माझ्याकडे दिले आणि सांगितलं "हे पैसे राहुदेत, कुठं आणि कुणा बरोबर 'व्यवहार' करायचा हे समजतं मला महेश". मी खूप आग्रह करूनही त्यांनी माझ्याकडून पैसे घेतलेच नाही. काही दिवसांनी मी त्यांना एक साडी भेट दिली. पण त्या म्हणाल्या महेश, असा फिरता कलरची साडी मी नेसत नाही आणि तू दिलेली साडी मी नेसणार आहे. मग मी सांगितलं आशाताई मी दुसरी देतो साडी. मी ती साडी पुण्यात माझ्या ओळखीच्या एका दुकानातून घेतली होती. आशाताई म्हणाल्या मी पुण्यात येईन तेंव्हा आपण त्या दुकानात जाऊन साडी घेऊ.

Mahesh Tilekar with Asha Bhosle 04

त्याप्रमाणे त्या एकदा पुण्यात आल्यावर आम्ही साडी दुकानात गेलो. आशाताई साडी घ्यायला आपल्या दुकानात आल्याचे पाहून दुकानातील प्रत्येकाला आनंद झाला होता. आशाताईंच्या समोर साड्यांचा ढीग लागला, त्या एक एक साडी पाहत होत्या. आवडलेल्या साड्यांची त्यांनी किंमत पाहीली आणि त्या दुकानदाराला म्हणाल्या "काय हो आशा भोसले दुकानात आल्यामुळे महागाच्या साड्या दाखवू नका, महेश मराठी प्रोड्युसर आहे, त्याला परवडेल अशी साडी दाखवा". पण मी त्यांना आवडलेलीच साडी विकत घेऊन आग्रहाने त्यांना घ्यायलाच लावली. नंतर एका हिंदी अल्बम गाण्याच्या शुटिंगसाठी त्या मी दिलेली साडी नेसल्या आणि शूटिंगच्या तिथूनच मला फोन करून सांगितले "महेश,आज मी तू दिलेली साडी नेसलीये". गिफ्ट म्हणून अनेकदा त्यांना साड्या मिळतात पण सगळ्याच नेसल्या जात नाहीत पण मी दिलेली साडी त्या आवर्जून नेसल्या होत्या, हेच माझ्यासारख्या सामान्य माणसासाठी खूप होतं.

Mahesh Tilekar with Asha Bhosle 05

पुढे आमची छान मैत्री झाली, त्या जेंव्हा माझ्या घरी यायच्या तेंव्हा आल्यावर त्यांनी कधीच वागण्या बोलण्यातून स्वतःच्या मोठेपणाचा, श्रीमंतीचा दिखावा केला नाही. उलट हक्काने "आज मी पोहे खाणार"असं सांगून आपल्याला एवढी मोठी व्यक्ती घरी आल्यावर काय खायला द्यावं असं आलेलं टेन्शन त्या क्षणातच घालवतात. आम्ही अनेक कार्यक्रमांना एकत्र जातो, भेटतो तेंव्हा गाण्यापासून खाण्या पर्यंतच्या गप्पा होतात. सिनेमाक्षेत्रात त्यांना आलेले अनुभव त्या सांगतात, तेंव्हा असं वाटतं की त्यांना लोकांनी दिलेला त्रास,त्यांनी केलेलं कष्ट याच्यापुढे आपणतर काहीच नाही आणि एवढं सगळं सहन करूनही त्या हरल्या नाहीत. माझ्या 'मराठी तारका' कार्यक्रमाला दोनदा त्या आल्या होत्या. तारकांचे आणि माझे भरभरून कौतुक केले त्यांनी.

Mahesh Tilekar with Asha Bhosle 06

एकदा एका चॅनेलसाठी मी पावसावर आधारित 'इंद्रधनू' नावाचा नृत्याचा कार्यक्रम करीत होतो. त्याला श्रद्धा कपूर गेस्ट म्हणून येणार होती. पण ABCD 2 सिनेमातील डान्स रिहर्सलला तिचा पाय फ्रॅक्चर झाला. माझ्या कार्यक्रमाच्या दिवशी सकाळीच असं झालं, आता ऐनवेळी कुणाला गेस्ट म्हणून बोलवावं या चिंतेत मी होतो. मी आशाताईंना फोन केला तर त्या दिल्लीत होत्या आणि दुसऱ्या दिवशी मुंबईत येणार होत्या. मी माझी अडचण सांगितली त्यावर मागचा पुढचा विचार न करता मला म्हणाल्या "महेश, कश्याला टेन्शन घेतोस, मी दुपारच्या फ्लाईटने मुंबईत येते, तू कार्यक्रमाकडे लक्ष्य दे." केवढा आधार मिळाला मला त्यांच्या बोलण्याने. चार वाजता मुंबईत पोचल्यावर घरी जाऊन तयार होऊन बरोबर सहा वाजता वेळेत माझ्या कार्यक्रमाला त्या हजर होत्या. केवढी ही एनर्जी आणि सळसळता उत्साह. कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना Thank you म्हणायला फोन केल्यावर त्यांनी "Thank you कश्याला, अरे तू अडचणीत होता तर मैत्रीत मी तुझ्या उपयोगी आलंच पाहिजे, माझे आशीर्वाद आहेत तुझ्याबरोबर कितीही अडचणीत असला तरी त्यातून तुला मार्ग सापडेल" असं बोलून त्यांच्या मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवला.

Mahesh Tilekar with Asha Bhosle 07

साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद मुखातून हे ऐकल्यावर धन्य झाल्यासारखे वाटले. एखाद्याला आवडेल अशीच वस्तू भेट म्हणून देण्याची त्यांना भारी हौस. मला ही त्यांनी अनेक गिफ्ट्स दिल्यात, त्यातील एक म्हणजे माझ्या घरी येऊन त्यांनी मला गणपतीची सुरेख मूर्ती दिली होती त्या मूर्तीला मी डोक्यावर पुणेरी पगडी घालून तो फोटो आशाताईंना पाठवला तो पाहून खुश होऊन त्या म्हणाल्या "मी दिलेल्या मूर्तीला तू पगडी घातल्यामुळे बघ आणखी ती सुंदर, आकर्षक दिसतेय". माझ्या घरी येणाऱ्या प्रत्येकाचं लक्ष गणपती बाप्पाच्या मूर्तीकडे आधी जातं. आशाताईंच्या सहवासात राहिल्यामुळे मी एक गोष्ट शिकलोय की आयुष्यात आपण जे काम करू ते ही सुंदर आणि आपल्याबरोबर इतरांनाही समाधान देणारं असावं म्हणजे ते कायम सगळ्यांच्या लक्ष्यात राहतं, जसं आशाताईंचं गाणं.

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Mahesh Tilekar with Asha Bhosle 08

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement