Exclusive
Typography

आयुष्यात एक वेळ अशी येते की एकामागोमाग एक, अश्या येणाऱ्या संकटांची इतकी सवय होऊन जाते की त्या संकटांचं स्वागत हसत हसत करण्याचं बळ आपल्यात येतं. २००३ मध्ये मी माझा निर्माता - दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट केला, त्यावेळी अनेक अडचणींचा सामना मला करावा लागला. टीव्ही मालिकांची निर्मिती दिग्दर्शन करून हाती थोडे पैसे जमा झाले होते आणि ओळखीच्या दोघा तिघांनी मला सिनेमासाठी फायनान्स देण्याचे कबूल केले म्हणून उत्साहाने मी तयारी सुरू केली. ऐश्वर्या नारकर, नयनतारा, जयराम कुलकर्णी, विजू खोटे, श्रीधर पाटील, विजय चव्हाण, अंकुश चौधरी, सुलभा आर्य हे कलाकार माझ्या पहिल्या 'आधार'चित्रपटात काम करायला तयार झाले.

पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये कॅमेरामन म्हणून शिक्षण घेणारा, मूळचा हैद्राबादचा राहणारा सेंथीलकुमार याला मी माझ्या एका टेलिफिल्मसाठी संधी दिली होती. त्यालाच मी माझ्या'आधार' चित्रपटासाठी कॅमेरामन म्हणून पहिला ब्रेक दिला. पुढे जाऊन साऊथमध्ये त्यानं खूप मोठे सिनेमे केले. 'बाहुबली' सिनेमाचा कॅमेरामन म्हणून त्याच्या कामाची खूप चर्चा झाली. माझ्या सिनेमाच्या शुटिंगची सगळी तयारी झाली, पण शुटिंगच्या दिवशी फायनान्स देतो म्हणून शब्द देणारे फाईनान्सर ऐनवेळी पैसे द्यायला नाही म्हणाले. तेंव्हा डोळ्यासमोर फक्त अंधार दिसत होता. शुटिंगची सगळी तयारी झालेली त्यामुळे पुढे पैश्याशिवाय शुटिंग कसं करायचं हा प्रश्न होता. डोकं बधिर झालं, शुटिंगचा पाच ते सहा दिवसाचा किरकोळ खर्च भागेल इतकेच पैसे माझ्याजवळ होते. पण मग इतर मोठया खर्चासाठी लाखो रुपये लागणार होते ते जमवायचं कसे ही मोठी अडचण होती. शुटिंग कॅन्सल करण्याशिवाय पर्याय न्हवता, पण पहिलाच सिनेमा, एकदा टाकलेले पाऊल मागे कसं घेणार? माझी अडचण पाहून मेकअपमन असलेला मित्र अभिजीतने त्याचे सोन्याचे ब्रेसलेट, चेन, अंगठी मोडून आणि जवळ साठवलेले पैसे मला दिले. मग ठरवलं हातात जेवढे पैसे आहेत,त्यात निदान पहिलं शेड्युलचं शुटिंग कसंबसं उरकून घेऊ आणि मग पुढचं पुढे पाहू, घर तारण ठेवून बँकेकडून कर्ज मागितले पण बँकेने मी मागितलेल्या कर्जापैकी चाळीस टक्केच कर्ज मंजूर केले. त्यामुळे शुटिंगच्या आणि पैश्याच्या टेन्शन मध्येच मी सिनेमाचं पहिलं शेड्युल संपवलं.

Mahesh Tilekar with Akshay Kumar 01

कलाकारांना राहिलेल्या शुटिंगसाठी एक महिनानंतरच्या तारखा मी दिल्या होत्या आणि त्या दरम्यान पैसे कसेही करून जमवायचं होते. टेन्शनमध्ये असतानाच डोक्यात एक कल्पना आली की आपल्या सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून एक छोटी भूमिका आहे त्यासाठी हिंदीतीला कुणी स्टार मिळाला तर? खिशात पैसे नसतानाही मोठी स्वप्नं पाहणं चालूच होतं. विजू खोटे यांनी मला अक्षयकुमार मेहबूब स्टुडिओत शुटिंग करीत असल्याचे सांगितले. त्यावेळी अक्षय खूपच टॉपला होता. त्याच्या 'आवरा पागल दिवाना' सिनेमाच्या सेटवर मी दुपारी ३ ला पोचलो. शुटिंगमध्ये बिझी असल्यामुळे त्याने मला फ्री झाल्यावर बोलू म्हणून सांगितले. मी तो फ्री होण्याची वाट बघत बसलो, संध्याकाळ होत आली आणि माझ्यासमोर अक्षय गाडीत बसून निघून जाताना दिसला. वाटलं त्याला आपल्याला भेटायचं न्हवतं म्हणूनच त्याने चार तास वाट पाहायला लावलं आणि निघून गेला. मनातल्या मनात मी नशिबाला दोष देत असतानाच समोरून अक्षयची गाडी परत येताना दिसली आणि गाडीतून उतरून अक्षयकुमार माझ्याकडे आला. मला थांबायला सांगितल्याचे तो विसरून गेल्याचे त्याने प्रामाणिकपणे कबूल केले आणि काय काम आहे ते विचारले. मी त्याला सांगितले की मी माझा पहिला सिनेमा करतोय आणि त्यात पाहुणा कलाकार म्हणून त्याने काम करावे अशी माझी इच्छा आहे, त्यासाठी पुण्यात शुटिंगला मला फक्त त्याचा दीड दिवस लागेल.

माझं ऐकून घेतल्यावर अक्षयने सांगितले की तो हिंदीतच खूप बिझी आहे. त्यामुळे त्याच्याकडे अजिबात वेळ नाही. कदाचित त्याला मराठी सिनेमात काम करणं कमीपणाचे वाटले असणार अशी माझी समजूत झाली. मी त्याला हिंदीतल्या कलाकारांची नावं सांगितली ज्यांनी माझ्याकडे मराठी टीव्ही सिरियलला काम केले होते. पण ते ऐकूनही अक्षय काहीच बोलला नाही. माझी खात्री पटली की हा एवढा मोठा स्टार माझ्यासारख्या नवीन निर्माता दिग्दर्शकाकडे नक्कीच काम करणार नाही आणि त्यातच तो टॉपला असताना. मी निराश होऊन परत निघालो. हिंदी फिल्म इंडस्ट्री मधल्या अनेकांनी मला सांगितले की अक्षय खूपच प्रोफेशनल आहे, तो कामाचे रोखठोक पैसे घेतो आणि सध्या तो टॉपला आहे तर मराठी सिनेमात काम करणं हे कमीपणाचे ठरेल म्हणून तो नाही म्हणाला असेल मला. आपल्या सिनेमात काम करायला हिंदी स्टार मिळवण्याचा प्रयत्न फसल्यामुळे दुःख तर झालं होतं आणि आता पुढे सिनेमाचं शुटिंग करायचं तर पैसे जमवण्याचं मोठं आव्हान होतं. काहीतरी मार्ग निघेल ही आशा बाळगून मी पुण्यात पिंपरी मध्ये वैष्णव देवीचे एक मंदिर आहे, तिथे दर्शनासाठी गेलो. दर्शन घेऊन बाहेर पडलो आणि अक्षयकुमारचा मला फोन आला. त्याने सांगितले "मी तुझ्या सिनेमात काम करतोय, उद्या मला येऊन भेट". आनंदाने नाचावं की रडावं तेच कळत न्हवतं आणि माझा मोबाईल नंबर अक्षयला मिळाला कसा?सगळं काही समजण्याच्या पलीकडे होते. मी दुसऱ्या दिवशी अक्षयला भेटलो, त्यानेच मला सांगितले की माझ्याकडे ज्या हिंदी कलाकारांनी मराठी सिरियलला काम केलेले होते त्यातले काही त्याच्या ओळखीचे असल्याने त्याने माझ्याबद्दल त्यांना विचारले, तेंव्हा प्रत्येकानं त्याला माझ्याबद्दल चांगलं सांगितलं. माझ्या स्ट्रगलची सगळी माहिती ऐकून त्याला वाटले की माझ्यासाठी मराठीत काम केले पाहिजे. मी अक्षयला त्याची भूमिका सांगितली आणि पैश्याबाबत विचारले. तो काही सांगायच्या आधी त्याला मराठी फिल्मचे बजेट कमी असते हेही मी लगेच सांगून मोकळा झालो. त्यावर "मला तुझ्याकडून एकही पैसा नको, फक्त मला शुटींगच्यावेळी महाराष्ट्रीयन जेवण तू द्यायचं, एवढं जमेल ना?" त्यानी असं विचारल्यावर माझी अवस्था 'उपरवाला जब देता है तो छप्पर फाडके देता है' अशी झाली.

Mahesh Tilekar with Akshay Kumar 02

अक्षयकुमार माझ्या सिनेमाच्या शुटिंगला आल्यावर निदान त्याला राहण्यासाठी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये रूम दिली पाहिजे म्हणून मी पुण्यातल्या ब्लु डायमंड(ताज) हॉटेलमध्ये एक रूम बुक केली. शुटींगच्यावेळी आदल्या दिवशी किती वाजता पुण्यात पोचणार हे विचारायला मी अक्षयला फोन केला तेंव्हा मी त्याला हॉटेलमध्ये रुम बुक केल्याचे सांगितले, त्यावर त्याने बुकिंग कॅन्सल करायला सांगितले आणि ज्या बंगल्यात शुटिंग करणार आहोत तिथेच एका रुम मध्ये राहीन म्हणून सांगितले. विनाकारण हॉटेलचा खर्च कश्याला करतोय असेही तो म्हणाला. ज्या बंगल्यात आम्ही शुटिंग करणार होतो तो एक साधा बंगला होता, त्यात हिंदी कलाकारांना हिंदीत दिल्या जातात तश्या कुठल्याच भारी सुविधाही न्हवत्या. त्यामुळे हिंदीतीला स्टार अक्षय, कसा काय तिथे राहीन याची शंका आली. पण अक्षय पोचल्यावरच बंगल्यातल्या गार्डन मधील बेंच पाहून मी इथं मोकळ्या हवेत झोपतो म्हणाला, मीच त्याला मच्छर चावतील असे सांगून रूममध्ये झोपायला सांगितले. अक्षय बरोबर आलेला त्याचा स्टाफ मेकपमन, ड्राइवर, स्पॉटबॉय हे हॉलमध्ये गाद्या टाकून झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षयच्या बाथरूम मधला गिझर बिघडला, तरी कसली तक्रार न करता थंड पाण्याने आंघोळ करून तो शुटिंगसाठी तयार झाला. त्याच्या आवडीची साबुदाणा खिचडी नाश्त्याला दिल्यामुळे तो खुश झाला. शूटिंगला लागणारे कपडे त्याने स्वतःचेच आणले शिवाय त्याला लागणारी फळे, नारळपाणी सगळं लवाजमा घेऊनच तो आला. मला एका पैशाचाही खर्च होऊ दिला नाही. शुटिंग झाल्यावर त्याच्या ड्राइव्हरला गाडीच्या पेट्रोलचे पैसे आणि मेकपमन, स्पॉट बॉयला त्यांच्या कामाचे पैसे देऊ लागलो तर कुणीच खूप आग्रह करूनही पैसे घेतले नाही त्यांनी सांगितले "साहबने बोला है यहासे कुछभी पैसे नही लेना". मी अक्षयला सांगितले की मला तेवढं तरी पैसे देऊ देत, मग तो मला म्हणाला "महेश, माझा तुला उपयोग व्हावा म्हणून मी तुझ्या सिनेमात काम करतोय मग माझ्यामुळे तुला कुठला खर्च झालेला माझ्या मनाला पटणार नाही आणि मला खात्री आहे की उद्या तू मोठा झालास की तू पण अशीच कुणाला तरी नक्कीच मदत करशील." ते ऐकून त्याला मी एक गणपतीची मूर्ती भेट दिली. ती त्याने आनंदाने स्वीकारली.

दोन दिवसांनी अक्षय राहिलेल्या त्याच रूममध्ये सगळ्या सुविधा असतानाही दुसऱ्या एका मराठी कलाकाराने एक दिवस राहायला मात्र नकार दिला आणि वर मला ऐकवले "अक्षयकुमार राहिला असेल इथं, तो नेहमी फाईव्ह स्टार मध्ये राहणारा, एक दिवस साध्या रूम मध्ये राहिलं तर बिगडलं कुठं, मी नाही राहणार इथं". अक्षयने मराठीत माझ्याकडे काम केल्याच्या बातम्या पेपरमध्ये येऊ लागल्या त्यातून मलाही प्रसिद्धी मिळाली. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटत होते की भयंकर प्रोफेशनल असणाऱ्या अक्षयने माझ्याकडे फुकट काम केलेच कसे. अक्षयच्या नावामुळे सिनेमा पूर्ण होण्या आधीच एका वितरकाने माझ्याकडे हिंदी, भोजपुरीसाठी राईटस मागितले आणि मला ऍडव्हान्स म्हणून काही रक्कम दिली जी मला राहिलेले शुटिंग पूर्ण करायला उपयोगी आली. माझ्या याच 'आधार' सिनेमात देवीचं एक गाणं होतं त्यासाठी त्याकाळी प्रेमळ ताई, सुनेच्या भूमिकेत प्रसिद्ध असलेल्या एका मराठी अभिनेत्रीला मी माझ्या सिनेमात देवीचं गाणं करावं म्हणून विचारले तर, त्यावेळी माझे नाव नसल्याने तिने स्पष्टपणे मला 'नाही' सांगितले.

Mahesh Tilekar with Jayaprada 01

मग मी पुन्हा विचार केला की जसं अक्षयकुमार आपल्याला मिळाला तसंच महिलांमध्ये लोकप्रिय असलेली एखादी हिंदी अभिनेत्री देवीच्या गाण्यासाठी मिळाली तर सिनेमाची व्हॅल्यू वाढेल. ज्यांचे सिनेमे मी लहानपणापासून पाहिले होते त्या हिंदी अभिनेत्री जयाप्रदा यांना मी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मी सातत्याने त्यांच्या घरी फोन करायचो पण "मॅडम घरपे नही है, मॅडम अभि बिझी है बादमे फोन करना "अशीच उत्तरे मिळाली. मग एकदा विचार आला रात्री उशिरा का होईना मॅडम घरी येतच असतील की? एकदा रात्री एक वाजता मी जयाप्रदा यांच्या घरी फोन केला तर फोन त्यांनीच उचलला. मी सांगितले त्यांना की अनेक दिवसांपासून मी त्यांना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय पण कोणी दाद देत नाही, म्हणून मी रात्री उशिरा फोन केला. त्या शुटिंग संपवून नुकत्याच घरी आल्या होत्या. माझ्याशी त्या खूप प्रेमाने बोलल्या आणि माझ्या सिनेमात काम करायला तयारही झाल्या. पैश्याची आणि रहायला हॉटेल कोणतं देणार, बाकी कसलीच चौकशी न करता त्यांनी फक्त मराठी शब्द पाठ करण्यासाठी माझ्या सिनेमातील देवीच्या गाण्याची ऑडिओ सिडी पाठवून द्यायला सांगितली.

दिलेल्या तारखेला त्या गाण्याच्या शुटिंगसाठी पुण्यात आल्या. राहायला मोठं हॉटेल नको हे त्यांनी आधीच सांगितले होते. पुण्यातील सहकार नगर भागातील महालक्ष्मीच्या मंदिरात शुटिंग होते. जयाप्रदा यांना पाहायला गर्दी जमली, विशेष करून महिलांची उपस्थिती खूपच होती. मंदिराजवळच एका खोलीत जयाजी तयार झाल्या, कसली मागणी नाही की कुरकुर नाही. महाराष्ट्रीयन जेवण त्यांनी आनंदाने घेतले. शुटिंग संपल्यानंतर मी त्यांना पैसे देऊ लागलो तर त्यांनी ते घेतले नाही आणि काही द्यायचंच असेल तर देवीच्या गाण्यात नेसलेली साडी मला देवीचा प्रसाद म्हणून द्या, असं त्या बोलल्यावर त्यांना साडी देऊन मी नमस्कार केला, मला आशीर्वाद देत त्या म्हणाल्या"महेश जी आप बहोत आगे जाओगे".

Mahesh Tilekar with Jayaprada 02

आधार चित्रपट तयार झाल्यावर सगळ्यात आधी सोलापूर, कोल्हापूर येथे रिलीज झाला. सोलापूर मध्ये रिलीजच्या पहिल्याच दिवशी पहिल्या शो ला महिलांनी सकाळपासूनच रांगा लावल्या होत्या. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून मीही खुश होतो, पण शो सुरू झाल्यानंतर काही वेळातच सोलापूर मध्ये दंगल सुरू झाली. जाळपोळ, हाणामारी मुळे काही भागात पोलिसांची संचारबंदी सुरू झाली. पोलिसांनी थिएटर मधून प्रेक्षकांना बाहेर काढले. मी आणि माझे कुटुंबीय जीव मुठीत घेऊन तिथून बाहेर पडत पुण्याला परत निघालो. सिनेमा रिलीजच्या दिवशीच आलेल्या अपयशाने सिनेमाचं पुढे काय होणार या विचाराने माझी झोप उडाली. पण काही दिवसांनी एक आनंदाची बातमी मिळाली, माझा सिनेमा मॉरिशस मध्ये प्रदर्शित करण्यासाठी मॉरिशस सरकारने मला निमंत्रीत केले. सगळा खर्च ते सरकार करणार होते. तिथे सिनेमा रिलीज करायच्या दोन दिवस आधी मला पोचायचे होते. विमानाची तिकिटेही आली होती पण व्हिसा वेळेत न मिळाल्याने ठरलेल्या दिवशी मला जाता आलेच नाही. त्यावेळी मुंबईहून आठवड्याला एकच फ्लाईट मॉरिशसला जात असे. आयोजकांनी सरकारी पातळीवर हालचाली करून दुसऱ्या दिवशी सकाळीच माझा आणि मित्र अभिजीतचा व्हिसा मंजूर करून दिला आणि मद्रास वरून रात्री मॉरिशसला जाणाऱ्या फ्लाईटची तिकिटे मला दिली. मुंबईहून फ्लाईटने मद्रास ला पोचलो तेंव्हा जीवात जीव आला.

Mahesh Tilekar with Aadhar Team 01

अडचणी आल्यातरी शेवटी आपण आयुष्यात पहिल्यांदा परदेशात, मॉरिशसला जातोय या आनंदात मी होतो. एअरपोर्ट वर सिक्युरिटी चेकिंग करत असताना पासपोर्ट वरचा व्हिसाचा स्टॅम्प पाहून पोलिसांनी मला अडवले. त्यांचे म्हणणे होते की जर व्हिसा महाराष्ट्रातील आहे तर दुसऱ्या राज्यातून प्रवास करता येणार नाही. तामिळनाडूत व्हिसा घेतला असता तरच मद्रास वरून मला फ्लाईट घेता आली असती. आयुष्यात पहिल्यांदा परदेशवारी करण्याची माझी संधी हुकणार हे दिसत होतं, मी खूप विनंती करूनही पोलीस अधिकारी काही ऐकून घेईनात. माझ्याकडे मॉरिशस सरकारच्या निमंत्रण पत्राची झेरॉक्स कॉपी होती ती त्यांना दाखवली, तर ओरिजनल कॉपी का नाही बरोबर ठेवली यावरून ते वाद घालू लागले. इतर लोक चेकिंग करून पुढे जात होते आणि डोळ्यातून अश्रू काढीत मी कोपऱ्यात उभा होतो. माझ्या बरोबर असलेला अभिजित मला धीर देत होता, शेवटचा प्रयत्न म्हणून पोलीस अधिकाऱ्यांना मी पुन्हा विनंती केली मला जाऊदेत. मग त्यांनी विचारले इथं तामिळनाडूत तुम्हाला ओळखणारे कुणी आहेत का? मी त्यांना सांगितले की मद्रास मध्ये राहणाऱ्या जयाप्रदा मला ओळखतात. त्यांनी माझ्या सिनेमात काम केलंय. त्यावर माझ्याकडे संशयाने बघत त्याने मला जयाप्रदा यांना फोन लावायला सांगितला. जयाजी आणि तो अधिकारी तामिळ भाषेत बोलू लागले, आता पुढे काय होईल या भीतीने माझी छाती धडधडू लागली. फोन झाल्यावर पोलीस अधिकारी माझ्याजवळ येत "मॅडमने बोला है आप उनके भाई हो". असं म्हणत त्याने मला फ्लाईटमध्ये बसण्याची संमती दिली. फ्लाईट उडाल्यावर डोळे मिटून मी देवाचं नाव घेतलं. उगवत्या सुर्यालाच नमस्कार करणाऱ्यांची संख्या जिथं जास्त आहे त्या सिनेमाक्षेत्रात मी अंधारात चाचपडत असताना स्वतःच्या प्रकाशाचा मला 'आधार' देणाऱ्या अक्षयकुमार, जयाप्रदा यासारख्या व्यक्तींपुढे मी आजही नतमस्तक आहे.

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Source: Facebook - Mahesh Tilekar

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement