Exclusive
Typography

लहानपणी मित्राच्या व्हिसीआरवर ‘काँन्ट्री’ करून करून बघितलेल्या निरनिराळ्या चित्रपटांपासून प्रवास सुरू झाला. आज या पॅशनने चित्रपटांच्या दुनियेत आणून सोडले. सामान्य कुटुंबाची स्वप्ने तशी मर्यादीत, याला मात्र लहानपणापासून अभिनयाची आवड. ही आवड कॉलेज लाईफमध्ये अधिक तीव्र झाली व स्वप्नांच्या चंदेरी दुनियेत आज तो वास्तव्यात वावरत आहे. हा प्रवास आहे राजवाडे अ‍ॅन्ड सन्स, सत्या 2 सह अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडणार्‍या अमित्रियान पाटील याचा. अमित्रियानचा बॉईज 2 हा सिनेमा ५ ऑक्टोंबरला प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि सुपरहिट झाला. अर्थात याच्या स्वप्नांना खरे पंख दिले ते त्याच्या संघर्षाने, मेहनतीने व योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या क्षमतेने. संघर्षातून शिकत गेल्यामुळे आव्हानात्मक भूमिकाच आज अमित्रियानची आवड बनल्या आहेत.

Amitriyaan Patil Photo 01

अमित्रियान पाटील हा अकोला येथील एका सामन्य कुटुंबातील तरूण. मुलाने भविष्यासाठी इंजिनिअरिंग करावं ही त्याच्या पालकांची इच्छा. ‘आयुष्यातले चार वर्ष मला दे. त्यानंतर हवे ते कर’ ही बाबांची इच्छा पूर्ण करण्यासाठी अमित्रियानने इंजिनिअरिंगला अ‍ॅडमिशन घेतली. अन्य विद्यार्थी सबमिशन, प्रोजेक्टच्या टेंशनमध्ये असताना अमित्रियान मात्र वेगवेगळ्या भूमिका साकारण्याच्या विचारात असायचा. शिक्षकांना पाहिल्यावर शिक्षक व्हावे, ढाब्यावाल्याला पाहिल्यावर ढाबा चालवावा, वाहन चालक व्हावे, असे तो कल्पनेच्या दुनियेत वेगवेगळ्या भूमिकांमध्ये वावरायचा. जी भूमिका आवडली त्यात जगणं, ती अनुभवणं हे केवळ अभिनयाच्या क्षेत्रातच शक्य होतं... हे अमित्रीयानला गवसलं होतं.

Amitriyaan Patil Photo 03

सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये याचा नेहमी उस्त्फुर्त सहभाग असायचा त्यातूनच याच्यातील अभिनेता बहरत गेला. पॉलिमर टेक्नॉलॉजीची चार वर्ष निघाली व अमित्रियानने मुंबईची वाट धरली. अर्थात ही वाट तेवढी सोपी नव्हती. येथे अ‍ॅड मध्ये डिप्लोमा केला, त्यानंतर एका अ‍ॅड एजंसीमध्ये जॉब केला. गिटार शिकविण्याचे काम केले. नंतर थिएटरमध्ये छोटे छोटे रोल मिळविले. शॉर्टफिल्म केल्या, अनेक चित्रपटांमध्ये छोटे छोटे रोल केले. त्यानंतर याने मागे वळून पाहिले नाही. राजवाडे अ‍ॅन्ड सन्स, सत्या-2, मन्या, 332 मुंबई टू इंडिया, अशा अनेक हिंदी, मराठी चित्रपटांमधील आव्हानात्मक भूमिका स्वीकारून त्याने त्याची एक वेगळी छाप सोडली. आगामी त्याचे दोन मराठी व दोन हिंदी चित्रपट येणार आहे.

Amitriyaan Patil Photo 04

ज्यापण भूमिका आजपर्यंत केल्या त्या एकसारख्या नव्हत्या. एकसारखा अभिनय करून पुढे जाणे सोपे असते. मात्र तसे न करता निवडक व आव्हानात्मक भूमिका साकारणे आवडते असे अमित्रियान सांगतो.

मित्राकडे व्हिसीआर होता. सर्व मिळून पैसे गोळा करून चित्रपट बघायचो. या व्हिसीआरने जीवनाच्या रंगभूमिवरील खर्‍या सिनेमाचा मार्ग दाखविला. लहानपणापासून जे जगलो व जे आता अनुभवतोय त्यात जमीन आसमानचा फरक आहे.. त्यामुळे कुठल्याही भूमिका आज माझ्यासाठी सोयीस्कर होतात, असेही तो सांगतो.

स्वप्नांना मेहनत व निर्णय क्षमतेची साथ दिल्यास यश निश्‍चित मिळते, हा संदेशही तो आपल्या या प्रवासातून देतो.

Amitriyaan Patil Photo 02

Amitriyaan Patil Photo 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement