Exclusive
Typography

मराठी भाषा आणि मराठी माणसांच्यावरचं प्रेम, फक्त बोलण्यापुरतं, टाळ्या घेण्यासाठी कार्यक्रमांमधून आणि एक मे ला महाराष्ट्रदिनी फेटे बांधून पारंपरिक वेषभूषा करून ते फोटो फेसबुक, इन्स्टाग्राम वर पोस्ट करण्याइतपतच मर्यादित असू नये आणि म्हणूनच जेंव्हा आपल्या मराठी माणसांच्या मनोरंजनासाठी 'मराठी तारका' शो एका अश्या ठिकाणी करण्याची संधी मिळाली जिथं कुणी मराठी कलाकार गेलेला नाही. ७२ तासांचा खडतर सागरी प्रवास करून आमची मराठी तारका टीम तिथं जाऊन आली आहे. अंदमान निकोबार हे एक पर्यटन स्थळ आणि स्वातंत्रवीर सावरकरांनी काळ्या पाण्याची शिक्षा जिथं भोगली त्या सेलूलर जेल या दोन गोष्टीमुळे आपल्याला माहीत आहे. अंदमान निकोबार भारताच्या दक्षिणेकडचं टोक, भारताचा भाग असूनही भौगोलिकदृष्ट्या तोडलेलं नकाश्यावरून ते समजतं.

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 02

अंदमानच्या समुद्रातून प्रवास करून गेल्यावर पुढे कॅम्पबेल बे नावाचं एक आयलँड(टापू) आहे. आजूबाजूच्या इतर देशांनी या टापूवर कब्जा करू नये म्हणून इंदिरा गांधी यांनी 1972 साली लष्करातील निवृत्त मराठी लोकांना जमिनी देऊन राहायला घरं बांधून दिली. तेंव्हा पासून तिथं 'लक्ष्मीनगर' ही मराठी लोकांची वस्ती आहे. पण अचानक सुनामी आल्यामुळे तिथल्या अनेकांना जीव गमवावा लागला. घरं उध्वस्त झाली. केंद्र सरकारने त्यांना पुन्हा नवीन घरं, रस्ते बांधून दिलेत. महाराष्ट्रापासून अनेक वर्षे इतक्या दूरवर राहणाऱ्या 300 लोकवस्तीच्या या मूठभर मराठी माणसांच्या मनोरंजनासाठी मराठी तारका शो करण्याचा निर्णय मी घेतला.

त्यानिमित्ताने सेलूलर जेल पहायला मिळेल ह्याचा आनंद होता. आमच्या टीम मधील तारका आनंदाने यायला तयार झाल्या. त्यावेळी मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनयात प्रगती करण्याऐवजी 'सुंदर' दिसण्यासाठी धडपडणाऱ्या आणि स्वतःला सौंदर्याची खाण समजणाऱ्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींनी आमच्या तारकांना सल्ले देणं सुरू केले "नऊ-दहा दिवस एवढ्या लांब जायचं, ते ही फुकटात, काय गरज पडलीये तुम्हाला? इथं मुंबईत राहून सुपाऱ्या (कार्यक्रम) मिळाल्या तर चांगले पैसे कमवता येतील." त्यांचा ह्या सल्ल्याकडे आमच्या तारकांनी दुर्लक्ष करीत मला सहकार्य करायचं ठरवलं, मग माझाही हुरूप आणखी वाढला.

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 03

5 नोव्हेंबर 2014 ला आम्ही मुंबईवरून फ्लाईटने मद्रास, तिथून पुन्हा फ्लाईटने अंदमानला पोचलो. सेलूलर जेल मधील ज्या खोलीत स्वातंत्रवीर सावरकरांनी शिक्षा भोगली ती छोटी खोली पाहून सगळयांचे डोळे पाणावले.

दोन दिवस अंदमानला राहून तिसऱ्या दिवशी पुढच्या प्रवासाला निघायचे होते. अंदमान पासून कॅम्पबेल बे बेटावर जायला एक शीप जाते याची माहिती आधीच आम्ही घेतली होती. त्याप्रमाणे तिकिटे बुक केली. शीपने समुद्रातून प्रवास करीत जायचं याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत होता. पण प्रत्यक्षात त्या मोठया शीप वर पाऊल ठेवल्यावर समजलं की रेग्युलर माल वाहतूक करणारी ती शीप आहे. त्या शीप वरच्या मोजक्याच रुमपैकी फक्त चारच खोल्या आम्हांला देण्यात आल्या. आधी सांगूनही ऐनवेळी कमी रूम मिळाल्यामुळे एवढया सगळ्यांनी कसं ऍडजस्ट करायचं ते कळेना. बरं ज्या रूम मिळाल्या त्यात कसे बस चार एक लोक कोंबता येतील एवढीच जागा. माल वाहतूक करणाऱ्या कामगारांच्यासाठी असलेल्या त्या रूम, त्यामुळे इतर कोणतीच सुविधा त्यात न्हवती. सार्वजनिक सुलभ शौचालय पेक्ष्या वाईट अवस्था असलेले टॉयलेट्स, ज्यात नळाला येणारे पाणी अचानकपणे बंद व्हायचं. रूममध्ये मुक्तपणे फिरणारी झुरळे पाहून घाबरून तारका ओरडू लागल्या. टॉयलेट्स मधील दुर्गंध आणि शीप वर येणाऱ्या डिझेलच्या वासामुळे रूममध्ये थांबणे शक्य न्हवतं. सगळेजण शीप वरती असलेल्या ओपन डेकवर जाऊन बसलो. आमच्या टीम मधील प्रोडक्शन सांभाळणाऱ्या अभिजित, संग्राम या दोघांनी निघताना बरोबरच बिसलेरी बॉटलचे बॉक्स घेतल्यामुळे तहान लागल्यावर प्यायला पाणी तरी मिळाले. बरोबर कुणी खाकरा, ठेपले असे काही खाण्याचे पदार्थ आणले होते ते खात, डेकवरच्या मोकळ्या हवेमुळे थोडं फ्रेश वाटू लागलं, पण हा फ्रेशपणा फार काळ टिकला नाही आणि संकटांची मालिका सुरू झाली.

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 04

अंदमान पासून समुद्रातून निघाल्यापासून साधारणता तासाभराने शीपचा स्पीड वाढला, तसे अधून मधून हेलकावे बसू लागले. ते इतके होते की सरळ स्थिर उभं राहणं कुणालाच शक्य होईना. काहींना मळमळ, उलट्या सुरू झाल्या. एका तारकेने बरोबर आवळा सुपारी आणली होती, कुणाकडे लवंग, वेलची होती ती प्रत्येकाने तोंडात टाकली. काहींना सी सिकनेस सुरू झाला. वेळ जावा म्हणून मराठी, नंतर हिंदी गाण्यांची अंताक्षरी सुरू केली. त्या विशाल समुद्रातून जाणारी मोठी शीप, जिकडे पहावं तिकडे फक्त पाणीच पाणी. मी शांतपणे समुद्राकडे बघत बसण्याशिवाय काहीच करू शकत न्हवतो. रात्री शीप वर जेलमध्ये कैद्यांना देतात त्याप्रमाणे दिलं जाणारं जेवणं पाहून जेवणाची इच्छा झाली नाही. आमच्यातील काहींनी भूक लागली म्हणून त्या जेवणाचे दोन घास खाल्ल्यावर, कोणत्या तेलात ते जेवण बनवलंय याचा अंदाज आल्याने, त्या तेलाच्या वासाने उलटी व्हायची वेळ आली.

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 05

शीप वरच्या कामगारांना आणि इतर प्रवाश्यांना आधाश्यासारखे जेवताना पाहून त्या जेवणाची त्यांना सवय असल्याचे दिसत होते. आमचा ग्रुपच तेवढा मराठी लोकांचा, बाकी सगळे तमिळ बोलणारे. परतीच्या प्रवासात पुन्हा अश्याच पद्धतीने जावं लागणार या भीतीने काही तारकांची चिडचिड सुरू झाली. काहींनी रडायलाच सुरवात केली. परत जाताना दुसरा काही पर्याय मिळेल का असं काही तारकांनी मला विचारले, पण कुणालाही फोन करायचा तर मोबाईलला रेंजच न्हवती त्यामुळे कुठं रेंज आली तरच कुणाला संपर्क होऊ शकणार होता. रात्री झोपताना प्रत्येकीनं थोडा वेळ झोपायचं, मग त्याच जागेवर दुसरीने असे नंबर लावून झोपत अर्धी रात्र सगळ्यांनी जागून काढली. ती रात्र कधी सरतेय आणि दिवस उजाडतोय याची वाट बघत मी जागाच राहिलो. माझ्यावर पूर्ण टीमची जबाबदारी होती, सगळ्यांचे होणारे हाल मलाही पाहवत न्हवते. आतून माझी चिडचिड होत होती, पण जर मी ती दाखवली तर बाकी आमच्या तारका आणखी नाउमेद होतील म्हणून मी परमेश्वराचे स्मरण करित होतो आणि आलेल्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी स्वतःला खंबीर बनवत होतो.

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 06

सकाळ झाली तशी सगळ्यांची चलबिचल सुरू झाली. कॅम्पबेल बे बेटावर पोचायला संध्याकाळ होणार असे शीप वरच्या इतर प्रवाश्यांच्या कडून समजले. एके ठिकाणी मोबाईलला रेंज आल्यावर आनंदाने ओरडून तारकांनी मला सांगितल्यावर मी पटापट फोन लावायला सुरवात केली. लष्कराच्या काही उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना फोन करून परत जाताना हेलिकॉप्टरची व्यवस्था होऊ शकते का ते विचारलं. पावसाळी वातावरण सारखं बदलत असल्याने जरी रिस्क घेऊन हेलिकॉप्टर घेतले आणि अचानक हवामान बिगडून मध्येच काही झाले तर सगळीकडे समुद्र असल्याने बॉडीपन नंतर मिळणार नाही, असं उत्तर लष्कराच्या अधिकाऱ्यांनी दिलं. ज्या आपल्या मराठी माणसांसाठी आपण कार्यक्रम करायला जातोय त्यासाठी शीपच्या प्रवासाचा कितीही त्रास झाला तरी आपल्याला पुढं जावं लागणार असल्याचे मी आमच्या ग्रुपला समजावून सांगितले. सगळ्यांनीच मला सहकार्य करण्याचे कबूल केले. जवळपास जे खाण्याचे पदार्थ होते त्यातून सकाळच्या नाश्त्याची कशीबशी सोय झाली, पण दुपारी जेवणाचं काय? हा प्रश्न होताच. ग्रुप मधील एका तारकेने ती डाएट करीत असल्याने ओट्सचे काही पॅकेटस बरोबर आणले होते त्यातूनच सगळ्यांनी खायला काहीतरी बनवायचं ठरलं. शीप वरच्या व्यवस्थापकाला विनंती केली की किचन वापरता येईल का? तर त्यांनी नकार दिला. मधल्या एका बेटावर प्रवासी उतरताना शीप थांबली तेंव्हा, मी आणि काही तारकांनी तिथं खायला काही मिळतंय का याचा शोध घेतला. एके ठिकाणी एक माणूस भाजी विकत होता, ते पाहून एखादा खजिना मिळाल्याचा आनंद सगळ्यांना झाला. कांदा, टोमॅटो, मिरच्या,आणि एके ठिकाणी डाळ, तांदूळ मिळाले. शीपवर आल्यावर पुन्हा एकदा किचन वापरण्याची परवानगी मागितली पण पुन्हा नकारच आला. काही वेळाने किचनमध्ये कुणीच नसल्याचे पाहून तारकांनी किचनचा ताबा घेतला. पटापट सगळ्या कामाला लागल्या, एकमेकींना मदत करीत स्वैपाकाला सुरवात केली. बऱ्यापैकी खिचडी भात शिजत आला असताना किचन सांभाळणारे तिथे आले, तारका तिथं अन्न शिजवताना पाहून त्यांनी ओरडायला सुरवात केली. पण तारकांनी तिकडे दुर्लक्ष केले. तारका किचनमधून बाहेर जात नसल्याचे पाहून त्यांनी आणखी आवाज वाढवला, तेंव्हा जेवढा शिजला तेवढा तो खिचडी भात सगळ्यांनी एकत्र बसून खाल्ला. प्रत्येकाच्या वाटयाला पोटभर आलं नाही पण कष्टानी आणि प्रेमानं बनवलेल्या त्या भाताचे चार पाच घास खाऊनही सगळ्यांची पोटं भरली.

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 07

अंदमान पासून 36 तासांचा सागरी प्रवास करून रात्री आम्ही कॅम्पबेल बे बेटावर पोचलो. तिथून साध्या जीपने अंधारातून घाट वळणाचा प्रवास करीत दीड तासांनी 'लक्ष्मी नगर' गावात पोचलो. आजूबाजूला सगळीकडे जंगल आणि मध्येच हे गाव. फ्रेश होऊन लगेच आम्ही गावातील शाळेच्या अंगणात कार्यक्रम सुरू केला. जमलेल्या गावकऱ्यांनी कार्यक्रमाचा आनंद घेतला. गावातील एका घरी गावकऱ्यांनी आमच्यासाठी जेवणाची व्यवस्था केली होती. स्वतःच्या शेतातील ताजी भाजी, चुलीवरच्या भाकरी, मासे, गव्हाची खीर, सगळं घरगुती जेवण. आग्रह करून गावकऱ्यांनी आम्हाला पोटभर खायला घातलं. आम्ही कलाकार असून इतक्या लांब प्रवास करून आल्याचं कौतुक प्रत्येक गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. आम्हाला काही कमी पडू नये यासाठी त्यांच्या परीने ते झटत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना समजले की आत्ता तरी माल वाहतूक शीपने तिथं पोचायची सोय आहे, पूर्वी मद्रासवरून आठवड्याला एक जहाज निघायचे तिथून बेटावर पोचायला किमान पाच दिवस लागायचे. महाराष्ट्रात त्यांचे नातेवाईक असले तरी इतक्या लांब कुणी त्यांना भेटायला जात नाही. मग वर्षा दोन वर्षातून कधीतरी हेच महाराष्ट्रात येतात. सुनामी आली तेंव्हा स्वतःच्या डोळयांसमोर त्यांची घर, संसार उध्वस्त झाल्याचं दुःख ते कधी विसरणार नाहीत, अनेकांचे प्राण गेले. काहींनी जीव वाचवण्यासाठी आसरा घ्यायला उंच डोंगरावर सहा सात दिवस उपाशी राहून काढले. आपल्या सत्तर वर्षे वयाच्या आंधळ्या आईला पाठीवर उचलून घेऊन बायको मुलांसह डोंगर चढलेल्या एका गावकऱ्याची कथा ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आले आणि जाणीव झाली की आपण नशीबवान आहोत की या लोकांना भेटायची संधी मिळाली. सुनामी नंतर शरद पवार हे एकमेव नेते त्या गावात गावकऱ्यांना भेटायला आल्याचे त्यांनी कौतुकाने आम्हाला सांगितले. पवार यांच्यानंतर आमची मराठी तारका टीम तिथं पोचल्याचा अभिमान आम्हाला वाटला. सुनामी नंतर परदेशातून मागावलेल्या विशिष्ट प्रकारच्या लाकडापासून बनविण्यात आलेल्या गावकऱ्यांच्या घरात आम्ही रात्री राहिलो. झोपायला जमिनीवर चादरी, सतरंजी टाकून दिलेल्या. त्यावर अंग टाकल्यावर प्रवासाचा शीण कुठच्या कुठं निघून गेला. रात्री जंगलातून एखादा प्राणी आला तर, त्याची भीती होतीच पण त्यापेक्षा जमिनीवर झोपण्याचं सुख जास्त होतं.

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 08

सकाळी गावकऱ्यांनी चुलीवर तापवून आंघोळीला दिलेलं पाणी, नाश्त्याला मिळालेले पोहे खाऊन आम्ही गावातून फेरफटका मारून पुन्हा परतीच्या प्रवासाला निघालो,मायेने माझ्या तोंडावरून हात फिरवणारी एक आज्जी डोळ्यात पाणी आणून म्हणाली " खूप बरं वाटलं तुम्ही इथं येऊन कार्यक्रम केला,कुणी येत नाही आम्हाला भेटायला. निघताना परत या म्हणायचं असतं, पण एवढा त्रास घेऊन तुम्हीआलाय, म्हणून निघताना'परत या'असं म्हणत नाही". गावातील स्त्रिया भावुक होऊन तारकांची गळा भेट घेत होत्या, काहींनी प्रवासात खायचे पदार्थ बांधून दिले.आपल्या मराठी माणसांचा निरोप घेऊन पुन्हा त्याच शीपने आम्ही परत अंदमानला निघालो, प्रवासाचा कंटाळा त्रास,याबद्दल कुणीच तक्रार केली नाही पुन्हा 36 तासांचा प्रवास करून रात्रीच्या वेळी अंदमानच्या भूमीवर पाऊल ठेवले तेंव्हा एकूण 72 तासांचा सागरी प्रवास करून एक मोठी मोहीम यशस्वी करून मराठी माणसांची मनं जिंकून आल्याचा आनंद मला आणि आमच्या तारकांना झाला.
मला या मोहिमेत सुरवातीपासून साथ दिलेल्या हेमांगी कवी,संस्कृती बालगुडे,स्मिता शेवाळे,तेजा देवकरआणि इतर तारकांचे,संपूर्ण टीमचे आभार मानू तेवढे कमीच आहेत. मनात विचार आला की स्वतःला देखण्या आणि प्रसिद्ध समजणाऱ्या,पैश्यालाच सर्वस्व मानणाऱ्या ज्या मराठी अभिनेत्रींनी आमच्या तारकांना फुकट एवढया लांब कश्याला जाताय म्हणून सांगितलं होतं, त्यांना पैसे खर्च करूनही,आम्ही सुनामी गावातील गावकऱ्यांचे जे प्रेम मिळवलंय ते मिळवता येणार नाही,आणि सावरकरांनी शिक्षा भोगलेलं सेलूलर जेल पाहण्याचं महत्त्वही कधी समजणार नाही.सौंदर्याची झळाळी,प्रसिद्धीची लकाकी ओसरल्यावर'शहाणपण'येऊन उपयोग काय?

पुन्हा नव्या उमेदीने बॉर्डरवर जाऊन जवानांच्यासाठी मराठी तारका कार्यक्रम करण्याचं मी ठरवलं, जे येतील त्यांना घेऊन,न येतील त्यांच्या शिवाय!

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Source: Facebook - Mahesh Tilekar

Mahesh Tilekar Marathi Tarka Laxmi Nagar 09

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement