Exclusive
Typography

चित्रपटांमधून कधी खतरनाक खलनायक, कधी प्रेमळ बाप, कधी गर्विष्ठ श्रीमंत अशा विविध भूमिका साकारणारे जेष्ठ अभिनेते प्राण साहेब.शहरी आणि ग्रामीण ढंगाच्या भूमिकांमधून खऱ्या अर्थाने चित्रपटांचाही 'प्राण' होते. याचं सारं श्रेय त्यांच्या अभिनयाला. प्राण साहेबांना भेटण्याची माझी खूप इच्छा होती, पण अभिनय करणे बंद केल्यापासून त्यांनी ठरवून स्वतःला चित्रपटसृष्टी पासून दूर ठेवले होते. कुणालाही ते भेटत नसत.

मी मात्र मोठया आशेने त्यांच्या घरी फोन केला, घरातील एका व्यक्तीने फोन घेतला. मला प्राण साहेबांना भेटायचं म्हणून सांगीतलं. "वो मिलते नही किसिसे" असे बोलून त्या व्यक्तीने फ़ोन ठेवला, मग मी पुन्हा फोन लावला. त्याच व्यक्तीने फोन उचलला आणि आधी दिले तेच उत्तर पुन्हा दिले "बोला ना आपको साहब किसिसे मिलते नही" ते ऐकून मी पण उत्तर दिले "पता है वो किसिसे मिलते नही, लेकिन मुझे उनसे मिलना है". माझं बोलणं ऐकून तो वैतागून बोलू लागला, तो बोलताना प्राण साहेब तिथे असावेत. मी त्याला सांगितलं की मला साहेबांशी दोन मिनिटं फोनवर बोलुदेत. प्राण साहेब फोनवर आले, मी त्यांना माझी ओळख मराठी चित्रपट निर्माता दिग्दर्शक म्हणून सांगितल्यावर त्यांनी सांगितलं की ते कुणालाही भेटत नाहीत, पण मी विनंती केली आणि मला भेटायला ते तयार झाले.

Mahesh Tilekar with Pran 02

त्याच दिवशी संध्याकाळी त्यांनी घरी बोलावले. चित्रपटसृष्टीतल्या अनेक जुन्या कलाकारांच्या कडून मी प्राण साहेबांच्या बद्दलच्या अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्या होत्या त्यामुळे त्यांच्या बद्दलचा आदर वाढून भेटायची खूप इच्छा झाली होती. कामाच्या बाबतीत नेहमीच प्रामाणिक असणारे प्राण साहेब एकदा एका हिंदी चित्रपटाच्या शुटिंगसाठी मद्रासला गेले होते. शुटिंगच्यावेळी स्वतःला पूर्णपणे कामात झोकून देणारे प्राण साहेब एकदा शुटिंग संपवून हॉटेलमध्ये पोचले की मग मात्र ते फक्त स्वतःचेच असायचे. त्यांना प्रायव्हसी हवी असायची. स्वतःच्या पैशातून आणलेले ड्रिंक्स घेत ते स्वतःच्या रुममध्ये एकटे एन्जॉय करीत बसायचे. त्या दिवशी त्यांचा शुटिंगचा शेवटचा दिवस होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊच्या फ्लाईटने ते मुंबईला निघणार होते. नेहमी प्रमाणे संध्याकाळी त्यांचे शुटिंग संपले, मेकअप आणि गेटअप काढून शुटिंग सेटवरच्या सगळ्यांचा निरोप घेऊन ते हॉटेलवर आले, फ्रेश होऊन त्यांनी ड्रिंक्स सुरू केले. तिकडे इतर कलाकारांचे शुटिंग चालू होते. काही वेळा नंतर दिग्दर्शकाला त्याने केलेली एक चूक लक्ष्यात आली आणि त्याचे धाबे दणाणले. प्राण साहेबांचा एक महत्वाचा संवाद असलेला छोटा सीन घ्यायला तो विसरला होता. त्यात फक्त प्राणसाहेब असणार होते, बघायला गेलं तर छोटा सीन, पण सिनेमाच्या दृष्टीने महत्वाचा. सकाळी प्राण साहेब मुंबईला जाणार असल्याने काही करून प्राण साहेबांना पुन्हा स्टुडिओत बोलवावे लागणार होते, पण त्यांना फोन करून सांगण्याची हिम्मत दिग्दर्शकाला होत न्हवती.

त्या चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक प्रत्यक्ष भेटून प्राण साहेबांना विनंती करण्यासाठी हॉटेलवर पोचले. प्राण साहेबांचं ड्रिंक घेणं चालू होतं त्यात त्यांना डिस्टर्ब केल्यामुळे ते नाराज झाले. दिग्दर्शकाने त्याची झालेली चूक सांगितली आणि पुन्हा प्राण साहेबांनी मेकअप, गेटअप करून तो राहिलेला छोटा सीन करण्याची विनंती केली. निर्मात्याने ही हात जोडले पण प्राण साहेबांनी नकार दिला. दिग्दर्शकाने सांगितले की तयार होऊन ते सेटवर आल्यानंतर अर्ध्या तासात फ्री करिन. प्राण साहेबांना तो किती अडचणीत आहे ते समजत होते त्याच वाढणारं टेन्शन पाहून प्राण साहेबांनी त्याला सांगितले "मी आता ड्रिंक्स घेतलं आहे आणि जिथं मी काम करतो त्या ठिकाणाला, सेटला मंदिर मानतो, म्हणूनच दारू पिऊन मंदिरात जाणं मनाला पटणार नाही." प्राणसाहेबांचे उत्तर ऐकून दिग्दर्शकाने पुन्हा समजावण्याचा प्रयत्न करीत सांगितले उद्या तुम्ही सकाळी मुंबईला निघणार आहात म्हणून आत्ताच तुम्ही आला तर तो सीन करता येईल. प्राणसाहेबांनी त्यावर तोडगा काढत त्याची अडचण दूर केली. त्यांनी सांगितले मी पहाटे सेटवर येईन आणि राहिलेला सीन करून तसंच पुढे एअरपोर्टला जाईन. निर्माता दिग्दर्शक खुश झाले. ठरल्या प्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे लवकर उठून अर्धा तासात मेकअप आणि गेटअप करून शब्द दिल्याप्रमाणे बरोबर पाच वाजता प्राणसाहेब शुटिंगला हजर होते. तासाभराने काम संपवून ते एअरपोर्टला निघाले.

दारू पिऊन शुटिंग करणारे काही कलाकार मी पाहिले आहेत. कधी बिसलेरी बॉटल मध्ये इतरांना पाणी पितोय असे वाटावे म्हणून पाण्याऐवजी दारू भरून शूटिंगच्या ठिकाणी ते पिणारे, तर कुणी जज च्या खुर्चीत बसल्यावर खाली दारूचा ग्लास भरून ठेवून स्वतःला 'गुरू' म्हणवून घेणारे. जज च्या खुर्चीत बसणाऱ्या अश्या अभिनेत्यांचा काय आदर्श नवीन कलाकारांनी घ्यायचा? त्यांच्या असे हे उद्योग बाहेरून समजले की प्राणसाहेबांचा हा किस्सा हमखास आठवतो.

Mahesh Tilekar with Pran 01

प्राण साहेबांच्या घरी मी पोचलो तेंव्हा ते मराठी चॅनेलवर दादा कोंडके यांचा सिनेमा पाहात होते. मी त्यांना विचारलं की मराठी त्यांना समजतं का? त्यावर थोडं समजतं आणि टाईमपास म्हणून दादा कोंडके यांचे चित्रपट पाहायला त्यांना खूप आवडत असल्याचे त्यांनी सांगितले. चहा घेताना त्यांच्या जुन्या अनेक आठवणी, त्यांचं सुरवातीच्या संघर्षाच्या दिवसाबद्दल त्यांनी मला सांगितले, भारत पाकिस्तान फाळणी नंतर मुंबईत आल्यावर ताज हॉटेल पाहून आत जायची त्यांची इच्छा झाली पण खिशात पैसे न्हवते, पण दिवस बदलले, हाती पैसे आले तेंव्हा 52 रुपयांमध्ये ताज हॉटेलमध्ये एका दिवसासाठी रूम घेऊन राहिल्याचे त्यांनी सांगितले. पुण्यात प्रभात फिल्म कंपनीच्या चित्रपटात काम करण्यासाठी पुण्यात राहिल्यामुळे पुणे शहराबद्दल त्यांना विशेष प्रेम असल्याचे मला जाणवले. गप्पा झाल्यावर त्यांनी मला बाजूच्या खोलीत मुद्दाम जायला सांगितले, त्या खोलीत जाताच, एखाद्या गुहेत गेल्यावर समोर खजिना पाहून डोळे चमकावे तशीच अवस्था माझी झाली. प्राण साहेबांना मिळालेले अनेक पुरस्कार आणि त्यांच्या काही गाजलेल्या भूमिकांचे गेटअप, ड्रेसेस त्या रूममध्ये होते. डोळे भरून ते सगळं पाहत असताना त्यांनी सिनेमात साकारलेलं एक एक कॅरेक्टर समोर जिवंत होऊन उभं असल्याचा भास होत होता. हे सगळं बघत असताना प्राणसाहेबांचे एक सुंदर पेंटिंग दिसलं त्यावर इंग्रजीत लिहिलेली एक ओळ माझ्या नजरेत भरली ''प्राण सारखा अभिनय सोडला तर जगात सगळं काही करता येणं शक्य आहे'. अश्या मोठ्या अभिनेत्याला भेटणं अशक्य असतानाही मला मात्र ते शक्य झालं याच्या सारखं दुसरं भाग्य ते काय?

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Source: Facebook - Mahesh Tilekar

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement