Exclusive
Typography

सिनेमात 'शान'से चालत येत त्याने घेतलेली एन्ट्री असो की स्टाईलमध्ये हातातला गॉगल फिरवून मग तो डोळ्यावर चढवण्याचा रूबाब असो, सिनेमात त्याने केलेली तुफान फायटिंग पाहून वास्तवात असं काही होत नाही हे आपल्याला माहीत असूनही आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणारा साऊथचा सुपरस्टार म्हणजे रजनीकांत. हिंदीत डब होऊन आलेले त्याचे काही चित्रपट टीव्ही वर मी पाहिले होते. पण या खऱ्या सुपरस्टार चा महिमा जेंव्हा मी स्वतः अनुभवला तेंव्हा खात्री पटली की साऊथचे प्रेक्षक का त्याला एवढं डोक्यावर घेतात.

एका वर्षी तिरुपतीला बालाजी दर्शनासाठी मी पोचलो. रात्रीचे अडीच वाजले असतील, मी शांत झोपेत असताना अचानक हॉटेलच्या बाहेर लोकांच्या बोलण्याचा आवाज येऊ लागला. साऊथची भाषा कळत नसल्याने ते लोक एकमेकांशी साधं बोलताना पाहूनही आपल्याला ते भांडण करतायेत की काय हा प्रश्न पडतो. मला ऐकू येणारा लोकांच्या बोलण्याचा आवाज काही वेळा नंतर हळूहळू वाढत गेला. त्या आवाजामुळे मला झोप येईना, वाटलं होतं थोड्या वेळाने तरी आवाज थांबेल, पण कसलं काय, नंतर जोर जोरात भांडणाचा आवाज येत राहिल्याने मला झोप येईना. चिडचिड सुरू झाली, मग वैतागून मी हॉटेलच्या रिसेप्शनला फोन करून विचारलं, तेंव्हा त्याचं उत्तर ऐकून माझी उरली सुरली झोप ही उडाली.

मी हॉटेलच्या बाहेर येऊन पाहिलं तर काय, हॉटेल शेजारी असणाऱ्या सिनेमा थिएटरच्या बाहेर लोकांच्या तिकीटासाठी मोठया रांगा लागलेल्या. थंडीचे दिवस असूनही कुणी स्वेटर घालून, कुणी शाल पांघरून, काहीजण अंगा भोवती चादरी लपेटून, स्त्रिया, पुरुष, म्हातारे, तरुण, लहान मुलं सगळ्या वयोगटातील लोक. रांगेत भक्तिभावाने देव दर्शनासाठी ताटकळत थांबावं तसे रांगेत उभे. सिनेमा थिएटर बाहेर रजनीकांत चं भव्य लाकडी कट आऊट उभं केलेलं. नारळ फोडून, हार घातलेला, पहाटेच्या वाऱ्याने त्या फुलांचा गंध आजूबाजूला पसरून भक्तीमय प्रसन्न झालेलं वातावरण. रजनीकांतला देवा समान मानून त्याच्या रिलीज होणाऱ्या सिनेमाचा फर्स्ट डे फर्स्ट शो ची तिकीट मिळवून आपल्या देवाच्या दर्शनासाठी भक्तांची ती लागलेली चढाओढ, ती व्याकुळता पाहून प्रश्न पडला हे लोकांचं रजनीकांत वर असलेलं प्रेम म्हणावं की, रजनीकांत नावाच्या सुपरस्टारचं त्यांना लागलेलं वेड?
माझ्या ड्रायव्हर कडून समजलं की साऊथला काही घरांमध्ये देवाच्या फोटो शेजारी रजनीकांत चा फोटो असतो, काहींनी त्याची मंदिरंही बांधली आहेत. मग अधिक खोलात जाऊन माहिती घेतल्यावर समजलं की त्याच्या मायबाप प्रेक्षकांना रजनीकांत स्टार होऊनही विसरलेला नाही, लोकांना तो भेटतो, गरजूंना मदत करतो, सामाजिक कामासाठी सढळ हाताने मदत करतो.

Mahesh Tilekar with Rajinikanth 02

अश्या या सुपरस्टार रजनीकांत बद्दल अनेक चांगल्या गोष्टी ऐकल्यावर नकळतपणे मी पण त्याचा फॅन झालो आणि एकदा तरी त्याला भेटण्याची इच्छा झाली. पण तो भेटणार कसा? कसं त्याच्या पर्यंत पोचणार? 2006 साली, मी राहत असलेल्या पुण्यातील हडपसर मध्ये मगरपट्टा सिटी इथं रजनिकांत 'शिवाजी' सिनेमाच्या शुटींगला आल्याची बातमी मला समजली. बातमी ऐकून मला आनंद झाला, वाटले तो साऊथचा सुपरस्टार, त्यामुळे आपल्या इथं त्याला पहायला लोकांची तिथल्या सारखी जास्त गर्दी नसेल. त्याला अगदी सहज भेटायला मिळेल. याच आनंदात मी शुटिंगच्या ठिकाणी पोचलो. पाहतो तर त्याला पाहायला लोकांची प्रचंड गर्दी, बंदोबस्ताला पोलीस, पोलिसांच्या पुढे शंभर एक बाऊन्सर. ह्या सगळ्यांच्या चक्रव्यूहातून मार्ग काढत रजनीकांत पर्यंत पोचणार तरी कसं? पोलीस पुढे जाऊ देत न्हवते, त्यामुळे दुरूनच त्याला पाहून समाधान मानावे लागले. त्या रात्री मात्र झोप लागली नाही, मनात हुरहूर की रजनीकांत आपल्या भागात शुटिंग करतोय आणि आपली भेट ही झाली नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी शुटिंगच्या ठिकाणी पोचलो, पोलिसांना विनंती केली, मराठीच पोलीस असल्याने त्यांनी सांगितले की आम्ही जरी पुढे जाऊ दिले तरी त्याचे जे पर्सनल बाऊन्सर्स साऊथ वरून आलेले आहे, त्यांनी पुढे जाऊ दिल्या शिवाय रजनीकांतला भेटता येणार नाही. खूप विनंती केल्यावर पोलिसांनी मला जाऊ दिले पण पुढे बाऊन्सर्सनी अडवले आणि परत मागे पाठवले. मला माझ्यासमोर काही अंतरावर रजनीकांत शुटिंग करताना दिसतोय पण मला त्याला भेटता येत नसल्यामुळे दुःख झाले. पुढे सलग दोन दिवस त्याला भेटायचं प्रयत्न केला पण भेट होऊ शकली नाही, काय करावं ते सुचेना. मग तो पुण्यातील कोणत्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरलाय ते मी शोधून काढलं आणि तिथे पोचलो. रजनीकांत शुटिंगला गेल्याचे समजले पण त्याच्या बाबत इतर कोणतीही माहिती द्यायला हॉटेलच्या लोकांनी नकार दिला. मी त्याच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली, माझा परिचय लिहिला आणि चार पाच दिवसापासून भेटायचा प्रयत्न करतो तरी आपली भेट होत नाही असा उल्लेख करून माझा मोबाइल नंबर लिहिला. हॉटेल रिसेप्शन च्या माणसाला विनंती केली की काही करून ही चिठ्ठी राजनीकांतच्याच हातात कशी पडेल असा प्रयत्न कर.

चिठ्ठी देऊन घरी आल्यावर मी स्वतःचीच समजूत घातली की आपण त्याला भेटायचा शेवटचा प्रयत्न करून बघितलाय, आता रजनीकांतची भेट होईल, नाही होईल हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. तीन दिवसांनी मला मोबाइलवर प्रायव्हेट नंबर म्हणून फोन आला, पलीकडचा आवाज ऐकून कानावर विश्वास बसत न्हवता, कुणी आपली मस्करी तर करीत नाही ना असे आधी वाटले. पण माझी चिठ्ठी मिळाल्याचे राजनीकांतने सांगितल्यावर माझी खात्री पटली. पुण्यातील शुटिंग पूर्ण संपल्यामुळे संध्याकाळच्या फ्लाईटने तो परत मद्रासला जाणार असल्याने त्याने मला दुपारी दोन वाजता हॉटेलवर भेटायला बोलावले. दोन ची वेळ जमेलना? असे वर त्यानेच विचारले. एवढा मोठा सुपरस्टार असूनही त्याला माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या वेळेची काळजी.

हॉटेलमध्ये त्याच्या रूम बाहेर दहा एक बाऊन्सर होते, ज्यांनी आधी मला रजनीकांतला भेटण्यासाठी अडवले होते. त्यातले काही होते तिथे, त्यांनी मला आदबीने आत जायला सांगितले. कॉलर ताठ करत मी आत गेलो आणि "नमस्ते महेश, कसा आहे बाबू"असं मोडक्या तोडक्या मराठीत बोलत रजनीकांतनी खांद्यावर हात ठेवत प्रेमाने चौकशी केली. पुढे अर्धा तास फक्त मी आणि तो,आम्ही दोघेच बोलत होतो. शुटिंगच्या ठिकाणी मला त्याच्या बाऊन्सर्सनी भेटू न दिल्याचे त्याला माझ्या चिठ्ठीतून समजल्यावर त्याला वाईट वाटल्याचे त्याने सांगितले. त्याच्या काही तामिळ चित्रपटातून त्याच्या हिरॉईन्स म्हणून काम केलेल्या जयाप्रदा, सौंदर्या या अभिनेत्रींच्या बरोबर मी पण काम केल्याचे माझ्या चिठ्ठीमध्ये त्याने वाचल्याचेही त्याने सांगितले आणि माझे कौतुकही केले. निळूभाऊ फुले यांच्याबद्दलही माझ्याकडे चौकशी केली. गप्पा चालू असताना काय घेणार तू खायला? असं त्यानं विचारल्यावर त्याला भेटूनच पोट भरल्याचं मी सांगितल्यावर चहा कॉफी तरी घ्यावीच लागेल असं सांगून चहा सांगू की कॉफी? असं त्यानं विचारल्यावर मी खरंच नको म्हणून सांगितले त्यावर गमतीने त्यानं उत्तर दिलं की तो एका फिल्मचे करोडो रुपये घेतो त्यामुळे माझ्या कॉफीचं बिल त्याला परवडण्यासारखं आहे. स्वतःच्या हातानी कॉफीचा कप माझ्या हातात देत, कॉफी पिता पिता तो बोलत होता, मी त्याचा एक एक शब्द कानात साठवून ठेवत होतो आणि डोळे भरून त्याला पाहत होतो.

नाव, पैसा, कर्तृत्व, सगळ्या बाबतींत त्याच्यापेक्षा मी खूपच लहान असतानाही माझ्याशी बोलताना, वागताना त्याच्यातील साधेपणा, सहजपणा पाहून जाणवलं की का त्याला त्याचे फॅन्स सुपरस्टार म्हणून डोक्यावर घेतात. याच सुपरस्टारने निघताना मी त्याच्या पाया पडताना माझ्या डोक्यावर हात ठेवून आशिर्वाद दिल्यावर वाटलं एका सुपरस्टारचा सुपरस्टार आशीर्वाद मिळालाय आपल्याला, आणखी काय पाहिजे?

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Source: Facebook - Mahesh Tilekar

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement