Exclusive
Typography

ज्याप्रमाणे जन्म देणाऱ्या आईचे ऋण आपण कधीच फेडू शकत नाही, त्याप्रमाणे मातूभूमीचे पण आपल्यावर खूप उपकार आहेत ही भावना मनात ठेवून देशाच्या रक्षणासाठी ऊन वारा पावसातही बॉर्डरवर आपले कर्तव्य बजावणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी माझा 'मराठी तारका' कार्यक्रम करण्याची संधी वेळोवेळी मला मिळाली.

Mahesh Tilekar with Indian Army 01

बारामुल्ला, उरी कारगिल अश्या ठिकाणी बॉर्डरवर आणि जिथं आत्तापर्यंत कुणीच कार्यक्रम केला नाही, अश्या अत्यंत संवेदनशील ठिकाणी 'सियाचेन' येथे मराठी तारका कार्यक्रम करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांचे आयुष्य किती खडतर आहे ते डोळ्यांनी पाहता आले. जवानांना जेंव्हा जेंव्हा मी बॉर्डरवर भेटलो, तेंव्हा त्यांना "तुम्हाला अश्या खडतर, धोकादायक परिस्थितीत ड्युटी करताना घरच्या माणसांची आठवण, त्यांचीही काळजी वाटत असेल ना?". असं विचारल्यावर अनेकांनी दिलेलं उत्तर एकसारखं असायचा "जशी जन्म देणारी आई, तशी मातृभूमी ही पण आपली आईच आहे, आणि मुलाचं कर्तव्यच आहे आईचं रक्षण करणं". जवानांच्या कडून ही अशी उत्तरे मिळाली की वाटायचं की हे खरं देशप्रेम. घरा पासून आपल्या माणसांच्या पासून मोह, माया सगळं सोडून अशी ड्युटी करणं हा केवढा मोठा त्याग.

Mahesh Tilekar with Indian Army 02

बॉर्डरवर तैनात असणाऱ्या जवानांच्या मनोरंजनासाठी कसल्याच सुविधा नसल्यामुळे जेंव्हा आम्ही तिथे जाऊन त्यांच्यासाठी मराठी तारका कार्यक्रम करतो, तेंव्हा त्यांच्या नेहमीच्या तणावाच्या आयुष्यात काही क्षण आनंदाचे आपल्या कार्यक्रमामुळे देता आले याचं समाधान खूप आहे. त्यांना झालेला आनंद त्यांच्याही चेहऱ्यावर दिसतो आणि कधी कधी जवान मला ही विचारतात "तुम्ही कोणत्याही सोयी सुविधा नसताना एवढा त्रास सहन करून, तुमच्या टीमसह लांबचा प्रवास करीत आमच्यासाठी बॉर्डरवर येऊन कार्यक्रम करता, तुमच्यात एवढी एनर्जी येते कुठून?".

Mahesh Tilekar with Indian Army 03

कारगिल ला शो होता तेंव्हा जमलेल्या जवानांनी आपापसात प्रत्येकाकडून जमा केलेल्या पैशाचं पाकीट माझ्या हातात ठेवत "तुम्ही आमच्यासाठी इथं येऊन फ्री मध्ये कार्यक्रम करता, प्रवास खर्चही घेत नाही, आम्ही तुम्हाला काही देऊ शकत नाही, पण फुल न फुलाची पाकळी समजून हे पैसे स्वीकारा" जवानांची विनंती ऐकून मला काही सुचेना. त्यात काही मराठी जवानही होते त्यांनीही खूप आग्रह करायला सुरुवात केली तेंव्हा "तुम्ही मातृभूमीच्या ऋणा साठी अहोरात्र सेवा करता, आमचं रक्षण करता, मग आमचंही कर्तव्य आहे तुमच्या आनंदासाठी आम्ही कार्यक्रम करणं". आजूबाजूला जमलेल्या जवानांनी आपला आग्रह सोडला नाही. "फार नाही आम्ही देऊ शकत. दहा हजार आहेत, आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून तरी घ्या हे." त्यांचं आमच्यावरचं प्रेम पाहून मलाच गहिवरून आलं, तिथे उपस्थित असलेल्या आर्मी ऑफीसरनी पण मला "जवानांचे मन मोडू नका घ्या ते पैसे". अशी विनंती केल्यावर मला ते घ्यावे लागले. मी पैसे स्वीकारल्यावर जवानांचे चेहरे आनंदाने आणखीनच फुलले. त्यांनी दिलेले ते दहा हजार म्हणजे माझी आत्ता पर्यंतची सर्वात मोठी कमाई म्हणून मी अजूनही जपून ठेवले आहेत.

Mahesh Tilekar with Indian Army 04

एक वर्षापूर्वी जवानांच्यासाठी लडाख आणि सियाचेन येथे मराठी तारका कार्यक्रम करण्याची संधी मिळाली. लडाख मधील कार्यक्रम संपवून दुसऱ्या दिवशी सकाळी निघून परतापुर ला संध्याकाळी पोचायचे होते. पुन्हा तिसऱ्या दिवशी सकाळी तिथून पाच तासांचा प्रवास करून भारत पाकिस्तान बॉर्डरवर तैनात असलेल्या आपल्या मराठी जवानांना सदिच्छा भेट देऊन पुन्हा परतापूर ला पोचायचे आणि संध्याकाळी कार्यक्रम करून दुसऱ्या दिवशी पहाटे सियाचेन ला निघायचे. असा सगळा प्लॅन ठरला होता. त्याप्रमाणे लडाखमध्ये अकरा हजार फूट उंचीवर कार्यक्रम करताना ऑक्सिजन च्या अभावामुळे आमच्यातील काही कलाकारांना श्वास घेताना त्रास झाल्यामुळे ऑक्सिजन सिलेंडर, मास्क देण्यात आले होते. आर्मीचे डॉक्टरही आमची काळजी घेत होते. आमच्या बरोबर कार्यक्रमात जवानांनाही सहभागी करून घेतल्याने ते ही आनंदी होते.

Mahesh Tilekar with Indian Army 05

प्लॅन प्रमाणे लडाख वरून आम्ही पुढे परतापूर साठी निघालो. वाटेत सगळ्यात अवघड आणि साडे अठरा फूट उंचीवर असलेला खार डोंगला पास हा घाट वळण पार करायचा होता. आमची बस निघाली, बसचा ड्रायव्हर आर्मी मधीलच होता. मुख्य रस्ता सुरू व्हायच्या आधीच पुढे जाण्याचा रस्ता बंद करण्यात आल्याचे समजले. रस्ता छोटा असल्याने घाट रस्त्यावर एकेरी वाहतूक चालते. मध्येच दोन ठिकाणी बर्फ वितळून दरड कोसळल्यामुळे रस्ता मोकळा होईपर्यंत वाट पाहण्याशिवाय पर्याय न्हवता, चार तास झाल्यानंतर रस्ता मोकळा झाल्याचे कळाले, पण तो पर्यंत दुपार झाली होती. दुपारी निघून पुढे जाताना घाट वळण असल्यामुळे आणि पुढे अठरा हजार उंचीवर जाताना ऑक्सिजन ही कमी कमी होत जातो त्यामुळे नक्की किती वेळ प्रवास संपायला लागेल याची खात्री नाही आणि संध्याकाळी लवकर अंधार पडत असल्यामुळे पुढे प्रवास करणे धोक्याचे असल्याचे बंदोबस्तासाठी असलेले आर्मीचे लोक आम्हाला सांगत होते. त्यांनी पुन्हा परत लडाख ला जाऊन मुक्काम करायला सांगितला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर पुन्हा निघायला सांगितले. मला त्यांचा सल्ला पटत होता कारण आमच्या हितासाठीच ते सांगत होते. पण मन तयार होत न्हवते, कारण ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सकाळी भारत पाकिस्तान बॉर्डरवर आपल्या मराठी जवानांची भेट घ्यायची होती.

Mahesh Tilekar with Indian Army 06

पण जर दुसऱ्या दिवशी सकाळी लडाख वरून निघालो तर बॉर्डरवर मराठी जवानांच्या भेटीचा बेत रद्द करावा लागणार होता. आर्मी ऑफीसर लोकांनीही मला सांगितले जवानांना भेटन्याचे रद्द करून फक्त कार्यक्रम करावा. लडाख मध्ये आल्या पासून आमच्या बरोबर असणारा आणि आमची छान मैत्री झालेल्या बसच्या ड्रायव्हरला मी सांगितले की मला काही करून बॉर्डरवरच्या मराठी जवानांनाही भेटायचे आहे,त्यासाठी आजच निघणं गरजेचं आहे पण वाटेत घाटात काही झालं पुन्हा दरड कोसळून रस्ता बंद झाला तर सगळ्यांचे जीव धोक्यात येणार. माझी घालमेल ऐकून ड्रायव्हरने मला एकच सांगितले "सर आपको भगवान पे भरोसा है तो चलते है, मै तो आने को तय्यार हूं, आपको सही सलामत लेकर जाऊंगा" असा विश्वास त्याने मला दिला आणि बाजूला असलेले एक छोटं मंदिर दाखवलं. तिथे जाऊन देवाच्या पाय पडून आता पुढे जायचं ठरवलं. एका साध्या टपरीवर जे मिळेल ते खाऊन प्रवास सुरु झाला.

Mahesh Tilekar with Indian Army 08

एका बाजूला बर्फाचे डोंगर दुसऱ्या बाजूला खोल दरी, खाली नजर गेली तरी घाम फुटेल. पावसामुळे जागो जागी खड्डे पडलेल्या रस्त्यामधून मोठ्या कसरतीने ड्रायव्हर बस पुढे नेत होता. माझा अर्ध्या जीव टांगणीला लागलेला, बस मधल्या माझ्या संपूर्ण टीमची जबाबदारी माझ्यावर आहे आणि आपल्यामुळे जीव धोक्यात घालून तेही अश्या परिस्थितीत यायला तयार झालेत. जर मध्येच काही झालं तर? अनेक विचार मनात येत होते, पण परमेश्वराला प्रार्थना करीत होतो की संपूर्ण रस्ता मोकळा मिळु दे, वाटेत कुठेही दरड नको कोसळू दे. अंधार पडायच्या आत अवघड घाट वळण खारडोंगला पास, पार करता येउदे. केवळ परमेश्वराची कृपा आणि ड्रायव्हरची कमाल, म्हणून रात्री बारा वाजता आम्ही परतापुरला पोचलो, पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी 5 तासांचा प्रवास करीत भारत पाक बॉर्डरवर पोचलो. तारेचं कुंपण आणि त्याच्या पालिकडे पाकिस्तान ची हद्द. मराठी तारका टीम भेटायला येणार म्हणून आपले मराठी जवान खूप आतुरतेने आमच्या स्वागताला उत्सुक होते.

Mahesh Tilekar with Indian Army 09

आम्हाला भेटल्यावर त्यांना घरच्या माणसांना भेटल्यासारखा आनंद झाला. "आम्ही घरी जातो तेंव्हा टीव्हीवर तुमचा कार्यक्रम पहायची संधी मिळते. आता पुन्हा घरी जाऊ तेंव्हा घरच्यांना सांगू की मराठी तारका टीम आम्हाला भेटायला बॉर्डरवर आली होती". जवानांना आम्हाला भेटून झालेला आनंद पाहून वाटलं परमेश्वराची कृपा म्हणून जीवाचं काही बरं वाईट न होता सुखरूप पोचलो आणि आपल्या मराठी जवानांना भेटता आलं. चहा आणि शंकरपाळे देऊन त्यांनी केलेलं स्वागत म्हणजे आमचा सन्मानच. त्यांच्याशी गप्पा मारून पुन्हा शो साठी निघालो.

Mahesh Tilekar with Indian Army 10

परतापूर मधील शो संपवून पुन्हा एक नवीन धाडस करायला आम्ही सगळे निघालो. सहा तासांचा प्रवास, वाटेत ना कसली झाडं, ना साधा पक्षी. माणसं दिसणं तर दूरच. मोठ मोठे डोंगर दगडी रस्ता त्यातून मार्ग काढत आम्ही सियाचेन बेस कॅम्पला पोचलो आणि आपण मराठी असल्याचा अभिमान वाटला. जिथे कुणालाही पोचणं शक्य होत नाही आणि जिथं कुणी आतापर्यंत कार्यक्रम केला नाही अशा ठिकाणी, सियाचेन ला 'मराठी तारका टीम पोचली. आजू बाजूला डोंगर. मध्येच पाऊस, जोरात वाहणारा वारा. त्याही परिस्थितीत कार्यक्रम सुरू केला आणि पाऊस, वारा थांबला. बर्फाच्या पर्वतांवर दोन दोन महिने शत्रूचा सामना करण्यासाठी दिवसरात्र बर्फात छातीठोकपणे उभं राहणाऱ्या जवानांना भेटून, त्यांच्याशी गप्पा मारून त्यांच्या देशप्रेमापुढे नकळतपणे आदराने मान झुकली. माझ्या कार्यक्रमातून त्यांचे मनोरंजन झाले, ते खुश झाले पण तरीही वाटत राहिले या जवानांच्या इतके 'मातृभूमीचे ऋण' आपण फेडणार तरी कसे?

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Source: Facebook - Mahesh Tilekar

Mahesh Tilekar with Indian Army 11

Mahesh Tilekar with Indian Army 12

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement