Exclusive
Typography

एखाद्या खळखळ वाहत जाणाऱ्या पाण्याच्या प्रवाहासारखा माणसाच्या आयुष्याचा प्रवास संकटातून मार्ग काढत, सुखाचा आनंद घेत पुढे जात असतानाच अचानक एखाद्या वळणावर अडसर येऊन काही काळ प्रवास थांबला तर? डोळे बंद, कुठली संवेदना नाही की आजूबाजूला काय चालू आहे याचीही जाणीव नाही. म्हणायला श्वास चालू आहे पण वाहत जाणारं पाणी पुढे न जाता एका जागी शांत थांबावं अगदी तसंच आयुष्य काही काळ शांत झाल्याचा अनुभव मी घेतला आणि त्यातून सहीसलामत बाहेरही पडलो.

मागच्या वर्षी मराठी तारका शो साठी सियाचेन ला जाताना जसं जसं अठरा हजार फूट उंचीवर जाताना प्रवास सुरु होता तस तसा ऑक्सिजन कमी होत गेल्यामुळे श्वास घ्यायला मला आणि माझ्या टीमला त्रास झाला होता,पण तो त्रास काही क्षणांचा होता,परतीच्या प्रवासात ही मला थोडा त्रास जाणवला पण मुंबईत आल्यावर थोडा आराम केल्यानंतर पुन्हा बरं वाटेल असा अंदाज होता.

नेहमीप्रमाणे एक तास चालणं आणि योगा असं रोजचं रुटीन सुरू झाल्यावर जाणवू लागलं की नेहमीसारखी स्ट्रेंथ आणि फ्रेशनेस, योगा करूनही मिळत नाहीये, नेहमी एक तास न थांबता चालणारा मी,पण 20 मिनिटं चालून झाली तरी दम लागू लागला.तरी जितका वेळ जमेल तितका वेळ चालणं चालूच ठेवलं महिना झाला तरी चालताना लागणारा दम थांबेना,उतरताना चढताना लिफ्ट ऐवजी जिन्याचा वापर करण्याची मला सवय पण तीन मजले उतरले की धाप लागू लागली.कोलेस्टेरॉल वाढलंय असं काही महिन्यांपूर्वी सियाचेन ला जायच्या आधी डॉक्टरांनी सांगून औषधं सुरू केली होती पण तसं काही काळजीचं कारण नाही असं ही सांगितलं होतं. मग नक्की त्रास होतोय कशामुळे?माझं मीच कारणं शोधू लागलो आणि माझ्या आतला आवाज मला सांगत होता'आपल्याला काहीतरी होणार आहे'.डॉक्टरांनी सांगितले की चालू असलेल्या गोळ्या संपल्या की इतर टेस्ट करून ठरवू काय करायचं ते.पण तो पर्यंत न थांबता मी स्वतःहून डॉक्टरांना सांगितले एन्जोग्राफी करून बघुयात.

Mahesh Tilekar about His New Life 02

एन्जोग्राफीचे रिपोर्ट आल्यावर ते पाहून मला वाटत असलेली काळजी योग्य होती असं डॉक्टरांनी सांगितलं आणि एखाद्या चांगल्या हार्ट सर्जनला रिपोर्ट दाखवून पुढचा डिसिजन घ्या असा सल्ला दिला.
मुंबईतल्या एका चांगल्या सर्जनला सगळे रिपोर्ट दाखवले ते पाहून कधीपासून त्रास सुरू झाला ते त्याने विचारले.मी उत्तर दिल्यावर समोरच्या रिपोर्टवर नजर फिवून माझ्याकडे पाहत त्याने सांगितले"तुमच्या हार्टला मेजर ब्लॉकेज असताना, तुम्ही अठरा हजार फूट उंचीवरचा प्रवास कसा काय करून आलात?तिथं जर काही झालं असतं तर"?

त्यांनी विचारलेल्या'तर'चा मी कधी विचारच केला न्हवता.मेजर ब्लॉकेज असल्यामुळे कधीही हार्ट अटॅक येण्याची शक्यता असतानाही तुम्हाला तसं काही झालं नाही,नाहीतर अटॅक येऊन हार्ट डॅमेज झाल्यावर जास्त क्रीटीकल होऊन गेलं असतं".समोर बसलेला सर्जन आश्चर्यानं माझ्याकडे पाहत बोलत होता.त्याच्याकडे अगोदरच्या कमिटमेंट असल्यामुळे माझी बाय पास करायला आठवडा भर त्याच्याकडे वेळ नसल्याचे त्याने सांगितले.तिथून बाहेर पडल्यावर 'बायपास' हा एकच शब्द मला आठवत होता.साधं कुठं रक्त दिसलं तरी त्याची भीती वाटणारा मी,प्रत्यक्षात स्वतःचं बायपास ऑपरेशन करावं लागणार या विचाराने डोकं सुन्न झालं.दुःख ही झालं की कामाचं सोडून बाकी कसलं व्यसन नाही,नियमीत व्यायाम,योग्य आहार हे सगळं करूनही आपल्यावर हे मोठं संकट का यावं?मग दुसऱ्या बाजूनेही विचार केला की एवढे हार्ट ब्लॉकेज असतानाही आपण मोठया उंचीवरचा प्रवास करून सुखरूप परत आलो हा ही चमत्कारच नाही का.

Mahesh Tilekar about His New Life 03

सर्वाधिक बायपास करण्यात यशस्वी असलेल्या मुंबईतील एका अमराठी सर्जन बद्दल खूप ऐकले होते,त्याच्या हाताला जेवढं यश तेवढीच त्याची फी जास्त. स्वभावानंही तो तिरसट आणि खूप व्यवहारी असल्याने भेटायलाही पाच हजार कन्सल्टंट फी घेतो हे मी ऐकून होतो,तरी जिवापेक्ष्या पैसा प्रिय नाही असं प्रत्येकाला वाटत असतं. याच भावनेने आणि चांगल्या सर्जनच्या हातून बायपास व्हावी या हेतूने त्या अमराठी सर्जनला भेटायला गेलो.एका ओळखीच्या व्यक्तीमुळे त्याची अपॉइंटमेंट लगेच मिळाली तिथे पोचल्यावर तिथल्या रिसेपशनिष्ठनी पहीला प्रश्न विचारला "सर की कन्सल्टंट फी पांच हजार है,पता है ना आपको?".मी मान हलवून होकार दिला.माझा नंबर आल्यावर आत गेलो.त्या अनुभवी,यशस्वी सर्जन नी माझे रिपोर्ट पाहिले आणि रिपोर्ट बरोबर असलेली माझ्या हार्टचे ब्लॉकेज दाखवणारी सीडी लॅपटॉपवर लावली,ती सुरू झाल्यावर माझ्या हार्ट मध्ये कुठे आणि किती मोठे ब्लॉकेज आहे ते तो दाखवून माहिती देत होता, पण तिकडे न पाहता लॅपटॉपच्या शेजारी असलेल्या गणपतीच्या मूर्तीवर माझी नजर होती.त्याचं सगळं बोलून झाल्यावर"आप मेरे पास आये हो,इसका मतलब मेरी फी का भी अंदाजा होगाही आपको,उसमे एक पैसाभी कम नही होगा". त्याने असे सांगून पैश्याबाबत पुढे काही बोलायची संधी मला दिली नाही.आपण डॉक्टर देवाच्या जागी मानतो.पण या देवातला व्यवहारीपणा पाहून मी गप्पच बसलो.मला जास्त वेळ घालवून रिस्क घ्यायची न्हवती म्हणून लवकरात लवकर बायपास करायची असं त्या सर्जनला सांगितल्यावर दोन दिवसांनी तो परदेशी जात असल्याने सात दिवसांनी तो परत येणार असल्याचे त्याने सांगितले आणि तोपर्यंत माझ्यासाठी तुम्ही थांबू नका असंही सुचवलं.पण मी त्याला सांगितलं की त्याच्याच हातून माझी बायपास व्हावी अशी माझी इच्छा आहे.ते ऐकून तो म्हणाला"ठीक है परसो रातकी फ्लाईटसे मै जा रहा हूं,उस दिन सुबह आठ बजे तुम्हारी बायपास शुरु करते है,कल पुरे पैसोंका चेक मेरे हाथ मे चाहीये".

Mahesh Tilekar about His New Life 04

सर्जनची फी सोडून ऑपरेशन,हॉस्पिटलचा खर्च वेगळा.जवळच्या मित्राच्या ओळखीतून व्यक्तिगत लक्ष्य दिले जाईल, चांगले डॉक्टर मिळतील आणि बिलातही सूट मिळेल म्हणून मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचं ठरलं पण सकाळी ऑपरेशन थिएटर उपलब्ध होणार नाही संध्याकाळी मिळेल,असं समजल्यावर आता करायचं काय? सर्जन तर रात्रीच्या फ्लाईटने परदेशात जाणार आणि ते फ्रेशमुड मध्ये फक्त सकाळीच ऑपरेशन करतात असं त्यांच्या असिस्टंटनी सांगितले होते.दुसऱ्या दिवशी ऍडमिट व्हायचंय ,तिसऱ्या दिवशी ऑपरेशन. पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये थिएटर उपलब्ध नाही.काय होणार पुढं या काळजीत संध्याकाळ निघून गेली. रात्री लीलावती हॉस्पिटलमधून फोन आला की ऑपरेशन थिएटर सकाळच्या वेळेत उपलब्ध होईल.दुसऱ्या दिवशी मी ऍडमिट झालो,माझ्याबरोबरीनें काम करणारा मित्र अभिजित चेक घेऊन सर्जनकडे गेला, पण त्याने तो चेक घेतला नाही ऑपरेशन च्या आधी द्या म्हणाला.ऑपरेशनच्या आधीच्या रात्री हॉस्पिटलमधील रूमच्या बाल्कनीतून रात्रीच्या लाईटच्या प्रकाशात उजळणारी मुंबई डोळे भरून पाहिली, ऑपरेशनच्या वेळी आणि नंतरही शुद्ध येईपर्यंत डोळ्यासमोर फक्त अंधारच असणार होता म्हणून त्या प्रकाशाचं जास्त अप्रुप वाटत होतं.घरी कुणाला,नातेवाईकांना, इतर मित्र मंडळींनाही बायपास बद्दल सांगायचं नाही असं मी अभिजीतला सांगितले होते कारण नाका तोंडात नळ्या असताना व्हेंटिलेटरवर आपण असलेल्या अवस्थेत आपल्याला पाहून कुणी दुःखी झालेलं मला पाहवलं नसतं. म्हणून जवळच्या अगदी दोघा तिघांनाच त्याची कल्पना दिली होती.सगळं व्यवस्थित होईल म्हणून अभिजित मला धीर देत होता,पण मन घट्ट करून आहे त्या परिस्थितीला सामोरं जाण्याचा निर्णय मी घेतल्यामुळे आतून स्ट्रॉंग झालो होतो. गंमतीने मी स्वतःचीच समजूत काढत होतो की आतापर्यंत अनेकांनी काळजावर केलेले घाव आपण झेलले,आता हार्ट ऑपरेशन मुळे ते घाव निघून जातील. ऑपरेशन करणारा सर्जन तिरसट असल्यामुळे अभिजीतला सांगीतलं की सकाळी ऑपरेशनच्या आधी मला भूल दिल्यामुळे मी शुद्धीत नसणार पण तू न विसरता सर्जनला चेक दे आणि मी आणलेली गणपतीची मूर्ती भेट म्हणून दे.एक डिसेंबर 2017 ला म्हणजे आजपासून एक वर्षापूर्वी माझी बायपास झाली आणि मला नवा जन्म मिळाला. सकाळी चाललेलं ऑपरेशन संध्याकाळी संपलं ,तो पूर्ण दिवस ,रात्र जगाशी,इतर कुणाशी माझा काहीच संबंध राहिला न्हवता.व्हेंटिलेटरवर असल्याने श्वास चालू असूनही स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव नाही. माझा मीच मला अनोळखी झालेलो.दुसऱ्या दिवशी डोळे उघडल्यावर नाका,तोंडातून, आणि शरीरातून आजूबाजूला पसरलेल्या नळ्या दिसत होत्या,छाती जड झालेली.कुणी दहा किलोचे वजन ठेवावं इतकं जडपणा हृदयावर जाणवत होता. श्वास घ्यायलाही त्रास होत होता.आय सी यु मध्ये राहण्याची ती पहिलीच वेळ.घश्याला कोरड पडलेली म्हणून पाण्याचे फक्त तीन चार थेंब तोंडात नर्सने टाकले.बाहेरच्या जगाशी कुठलाही संबंध न ठेवता पाच दिवस आय सी यु मध्ये त्या बेडवर कूस न बदलता नुसतं पडून राहणं म्हणजे एक प्रकारची शिक्षा वाटत होती. समोरच्या भिंतीवरील घड्याळ्यातील पुढे जाणारे काटे पाहून वाटायचं आपली ही पण वेळ निघून जाईल. आयुष्यात एवढ्या अडचणींवर मात केलीये,संकटातून बाहेर पडलोय तर या आय सी यु मधून पण आपण लवकर बाहेर पडू असा माझा मलाच विश्वास वाटू लागला. सहाव्या दिवशी हाताला धरून डॉक्टर आणि नर्सने मला थोडं चालायला सांगितलं, पाय मोकळे झाले आणि हुरूप आला,मग ठरवलं दुसऱ्या दिवशी कुणाचा आधार न घेता चालायचं, आणि ते जमलंही.माझा कॉन्फिडन्स पाहून डॉक्टरांनी 2 पायऱ्या उतरायला सांगितल्या,पण मी 4 पायऱ्या उतरवून दाखवल्या. माझी रिकव्हरी पाहून नंतर एक दिवस नॉर्मल रूम मध्ये ठेवून डिस्चार्ज मिळाला.

घरी येऊन साधारणतः आठवडा झाला असेल,त्या दिवशी मंगळवार होता.माझं ऑपरेशन केलेल्या सर्जन कडून सकाळीच एक माणूस घरी आला भला मोठा फुलांचा गुच्छ आणि एक पाकीट देऊन तो गेला.पाकीट उघडून पाहिलं तर त्यात एक चेक होता माझ्या नावाचा.माझ्या ऑपरेशन साठी सर्जनला मी जे पैसे दिले होते त्यातील 75℅ रक्कम माझ्या नावावर त्या चेकवर लिहिलेली होती.गोंधळून जाऊन मी त्या सर्जनला फोन केला.त्यावर त्याने उत्तर दिले की माझ्या ऑपरेशनच्या वेळी त्याला जी मी गणपतीची मूर्ती दिली होती ती त्याच्या बायकोला खूप आवडली तिने ती कुठून आणली ते विचारल्यावर त्याने बायकोला सांगितले की महेश टिळेकर म्हणून एक पेशंट आहे त्याचं बायपास केलं तेंव्हा गिफ्ट म्हणून मिळाली.त्याची बायको मराठी,तिने माझा मराठी तारका कार्यक्रम आणि वन रूम किचन फिल्म पाहीली होती,तिने मग माझ्याबद्दलची सगळी माहिती,माझे व्हिडिओ गुगल आणि युट्युब वरून नवऱ्याला दाखवले.ते त्याने पाहिले आणि त्याला काय वाटलं देव जाणो त्याने मला चेक पाठवला.मी सर्जनला सांगितले की तुम्हाला तुमची प्रोफेशनल फी म्हणून मी पैसे दिले होते ते परत कसे घेणार? ते ऐकून सर्जन म्हणाला" तुमची ओळख तुम्ही मला आधी सांगितली नाही,तुमचं काम,तुमची माहिती माझी बायको मराठी असल्यामुळे तरी मला समजली,मी आयुष्यात कधी कुणासाठी कमी पैशात ऑपरेशन केलं नाही.पहिल्यांदाच एकदा घेतलेले पैसे परत देत आहे ते ही तुमचं काम पाहून तुम्हाला.माझ्या असिस्टंट डॉक्टरांची फी म्हणून थोडे पैसे ठेवून बाकीच्या रकमेचा चेक दिलाय,पण हे कुठं बोलायचं नाही,नाहीत सगळ्यांना डिस्काउंट द्यावा लागेल तुम्ही आणि तुमचा मराठी तारका शो पाहायला मला बोलवा नक्कीआणि तुम्ही दिलेलीगणपतीची मूर्ती मला आणि माझ्या बायकोला फार आवडली आहे".

व्यवहारी सर्जन मधील ती माणुसकी पाहून डॉक्टर मध्ये असलेला देव मी अनुभवला.
ज्या देवानं मला नवा जन्म आणि नवी स्वप्नं दिली

लेखक: निर्माता-दिग्दर्शक 'महेश टिळेकर'

Source: Facebook - Mahesh Tilekar

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement