सरस्वतीचा आशीर्वाद - कुठल्याही कलाकाराला आयुष्यात यशस्वी होण्यासाठी 'लक्ष्मी' आणि 'सरस्वती' चा आशीर्वाद मिळणं फार आवश्यक आहे. मेहनतीने, कष्ट करून 'लक्ष्मी' मिळवता येते, पण केवळ नशीब आणि योग असेल तरच 'सरस्वती'चा आशीर्वाद मिळतो. आशा भोसले या सरस्वतीचा सहवास आणि आशीर्वाद मला लाभला याबद्दल परमेश्वराचे मानू तेवढे आभार कमीच आहे. २००७ साली माझ्या 'मराठी तारका' पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमाला गेस्ट म्हणून बोलावण्यासाठी आयुष्यात पहिल्यांदाच मी आशा भोसले यांना फोन केला, पण त्या बिझी असल्यामुळे येऊ शकणार नाही असं त्यांनी सांगितलं. मग मी माधुरी दीक्षितला गेस्ट म्हणून बोलावलं, त्यावेळचे जवळपास सर्वच जुने नवे कलाकार मोठ्या संख्येने एकत्र या कार्यक्रमाला आले. मुंबईतल्या सी प्रिन्सेस हॉटेलमध्ये हा कार्यक्रम झाला. माधुरीची मराठी कलाकारांच्या कार्यक्रमाला येण्याची ती पहिलीच वेळ होती. कार्यक्रम झाल्यानंतर दोन तीन दिवसांनी आशा भोसले यांनी मला भेटायला घरी बोलावले.

१९९८ साली, दूरदर्शनसाठी नववर्षाच्या निमित्ताने एका विशेष विनोदी कार्यक्रमाच्या शुटिंगसाठी मी विजू मामा बरोबर पहिल्यांदा काम केले. वर्षा उसगावकर ह्यांच्या नवऱ्याची भूमिका होती. त्यावेळी वर्षा उसगावकर प्रसिद्धीच्या शिखरावर होत्या आणि त्या जास्त करून अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या हिरॉईन म्हणूनच काम करीत होत्या. माझी पण वर्षाजीं बरोबर काम करण्याची पहिलीच वेळ. विजूमामाने मला शुटिंगच्या आधी विचारले "तू तिला नक्की सांगितलंय ना, तिच्या नवऱ्याच्या भूमिकेत मी असणार ते". मी वर्षा उसगावकर ह्यांना स्क्रिप्ट वाचायला दिले तेंव्हा ते वाचून त्यांनी मला विचारले माझ्या नवऱ्याची भूमिका कोण करणार आहे. मी 'विजय चव्हाण' सांगितल्यावर त्या हसल्या आणि म्हणाल्या "विजय कॉमेडी छान करतो, परफेक्ट आहे तो या भूमिकेला".

तबरेज नुरानी दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘लव सोनिया’मध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. १४ सप्टेंबरला रिलीज होणा-या ह्या सिनेमामध्ये वेश्या व्यवसायातल्या अंजली ह्या भूमिकेत दिसणाऱ्या सई ताम्हणकरला देहविक्रयाच्या व्यवसायाविषयी चित्रीकरणाआधी अभ्यास करावा लागला.

'मोठा माणूस' - अभिनेता निळूभाऊ फुले यांच्या सारखा माणूस अभिनेता म्हणून कलाक्षेत्रात मोठा होताच पण प्रत्यक्ष जीवनातही इतरांच्यासाठी केलेल्या कामामुळे 'मोठा माणूस' म्हणून सगळ्यांच्या स्मरणात आजही आहेत. मी माझ्या सुरवातीच्या काळात स्ट्रगल करण्यासाठी पुण्यात बालगंधर्व थिएटर ला जायचो तेंव्हा 'कथा अकलेच्या कांद्याची' या विनोदी नाटकात निळूभाऊंना मी प्रथमच पाहिले. थिएटर गर्दीने भरलेले, निळूभाऊंच्या एन्ट्रीला टाळ्यांचा कडकडाट. मी विंगेत उभा राहून नाटक बघितलं. निळूभाऊंना सिनेमात अनेकदा पाहिलेलं, पण प्रत्क्षय नाटकात त्यांचा अभिनय पाहून थक्क झालो. मग पुढे अनेकदा मी त्यांच्या नाटकाला जाऊन विंगेत उभा राहून ते नाटक पाहायचो. एकदा नाटकाच्या मॅनेजरने बघितलं की हा बरेचदा येतो आणि विंगेत उभा राहून फुकट नाटक पाहतो. त्यानी मला तिथून हकलायचा प्रयत्न केला पण तितक्यात निळूभाऊंची सेकंड एन्ट्री साठी ते विंगेत आले त्यांनी पाहिलं आणि मॅनेजरला थांबवत मला फ्री पास द्यायला सांगितला. मग पुढचं नाटक मी समोरून खुर्चीत बसून पाहिलं. त्यानंतर कधीच मला कुणी अडवलं नाही. मी अधून मधून पुन्हा पुन्हा निळू भाऊंच्या नाटकाचा 'शो' असेल तेंव्हा जाऊन त्यांना अभिनय करताना बघत असे. सिनेमातही ते काम करीत असल्याने त्यांची लोकप्रियता खूप होती. त्यांना भेटायला लोकांची गर्दी उसळायची. मला पाहून कधी कधी निळूभाऊ माझी चौकशी करायचे. मी लिहिलेल्या कथा, कविता, गाणी वाचून त्यावर प्रतिक्रिया द्यायचे. कधी इंटरवलला त्यांच्या साठी चहा आला की मलाही द्यायचे. तेंव्हा खूप भारी वाटायचं, निळू फुले यांनी मला चहा दिला याचं माझंच मला कौतुक वाटायचं.

अन्नपूर्णा - घर नेहमी धन धान्यांनी भरलेले असावे आणि घरात नेहमी अन्नपूर्णा प्रसन्न असावी असं आपण म्हणतो. मला मात्र आयुष्यात तीन अन्नपूर्णा अश्या भेटल्या की ज्यांच्यामुळे आयुष्यात मोलाची मदत झाली आणि शिकवणही मिळाली. 92/93 साली नाट्य चित्रपट क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी माझी धडपड चालू होती, घरच्यांना माझे कलाक्षेत्रात जाणे बिलकुल पसंत न्हवते आणि सपोर्ट करण्यासाठी घरची आर्थिक परिस्थितीही फार चांगली न्हवती. त्यामुळे त्यांना माहिती न होता मी पुण्यात बालगंधर्व येथे जाऊन कलाकारांना, निर्मात्यांना भेटत असे. पण बस च्या तिकिटासाठी लागणारे पैसे घरच्यांना मागण्याची हिम्मत न्हवती कारण त्यांना समजले तर सगळंच बंद होईल. पण माझ्या मदतीला एक अन्नपूर्णा उभी राहिल. ,आमच्या शेजारी राहणाऱ्या चौघुले काकू. घराजवळील एका कंपनीतल्या काही कामगारांसाठी त्या जेवणाचे डबे बनवायच्या. ते पोचते करण्याचे काम त्यांनी मला दिले, त्यासाठी त्या मला आठवड्याला 2 रुपये द्यायच्या. माझ्या घरापासून- हडपसर मधून पुण्यात बालगंधर्व येथे जाण्यासाठी बसने येऊन जाऊन 3 रुपये तिकीट होते पण माझ्याकडे असायचे 2 रुपये. मग 111 नंबरच्या बसने स्वारगेटला अर्ध्या वाटेत उतरून पुढे पायी चालत जावे लागायचे. आठवड्यातून एकदा मी पुण्यात जाऊन struggle करायचो. माझी धडपड पाहून नंतर त्या मला दर आठवड्याला 3 रुपये देऊ लागल्या. त्यामुळे 2 रुपये बस तिकिटाला खर्च झाल्यावर उरलेल्या 1 रुपयात बालगंधर्व समोर, जोशी वडेवाले यांच्याकडे, एक वडा पाव खायला मिळायचा. ते जर 3 रुपये त्या 'अन्नपूर्णा' चौगले काकूंनी दर आठवड्याला मला दिले नसते तर खिसा रिकामा असताना मी स्ट्रगल करायला बाहेर कसा जाऊ शकलो असतो?

Advertisement