Latest News
Typography

प्रतिमा जोशी यांचे दिग्दर्शन असलेला आणि मुक्ता बर्वे व प्रिया बापट यांच्या प्रमुख भूमिका असलेला बहुचर्चित ‘आम्ही दोघी’ आज २३ फेब्रुवारी रोजी संपूर्ण महाराष्ट्र प्रदर्शित होत आहे. मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट या दोन प्रतिभावान अभिनेत्री पहिल्यांदाच या चित्रपटात एकत्र काम करत असून दोघींनी यात मध्यवर्ती भूमिका साकारल्या आहेत. त्यांच्याबरोबर किरण करमरकर, भूषण प्रधान, आरती वडगबालकर आणि प्रसाद बर्वे यांच्याही भूमिका आहेत. चित्रपटाची कथा प्रख्यात दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेली असून या चित्रपटाची निर्मिती पूजा छाब्रिया यांनी केली आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे सादरीकरण असलेल्या या चित्रपटाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हा चित्रपट महाराष्ट्रातच नव्हे तर आता परदेशात सुद्धा प्रदर्शित होणार आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, जर्मनी आणि सिंगापूर या देशांमध्ये या चित्रपटाचे शो दाखविले जाणार आहेत.

चित्रपटाची कथा अमला आणि सावित्री सरदेसाई या दोन प्रमुख पात्रांभोवती बेतलेली आहे. या दोन्ही व्यक्तिरेखा अनुक्रमे मुक्ता बर्वे आणि प्रिया बापट यांनी साकारल्या आहेत. विचारसरणी वेगळ्या असल्या तरी महिला इतर बाबतीत एकसारख्या असतात. त्यांचे अंतिम ध्येय एकच असले तरी त्या मार्ग वेगवेगळे चोखाळतात. मुक्ता बर्वे सकारात असलेली व्यक्तिरेखा ही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या एका गृहिणीची आहे. तिला शहरी भागाच्या जीवनशैलीचा तसा गंध नाही. प्रिया बापट ही एक थोडी वेगळ्या धाटणीची व्यक्तिरेखा साकारते आहे. त्यातून जीवनाचे तीन टप्पे अधोरेखित होतात.

‘जे मनात येईल ते पटकन करून मोकळे व्हा, नाहीतर पश्चाताप करण्याची वेळ येईल,’ हे आहे सावित्रीच्या जीवनातील तत्वज्ञान. ती स्वतःच्या आयुष्यात या तत्वज्ञानाचे तंतोतंत पालन करते.

“आम्ही दोघी’ हा चित्रपट प्रख्यात दिवंगत मराठी लेखिका गौरी देशपांडे यांच्या कथेवर बेतलेला आहे. गौरी देशपांडे या काळाच्या पुढे चालणाऱ्या प्रागतिक लेखिका होत्या. त्यांच्या कादंबरी, लघुकथा आणि कविता खूपच गाजल्या त्या त्यातील संकल्पनाच्या ऊंचींसाठी. त्यांनी स्वतःच्या शैलीतून साहित्यिक जगतात स्वतःचे स्थान निर्माण केले,” असे उद्गार चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रतिमा जोशी यांनी काढले आहे.

Aamhi Doghi Priya Mukta 02

“आजच्या तरुणींना त्यांच्या नात्यांमध्ये जे संबंध अपेक्षित असतात त्यांच्या जवळ जाणारी ही कथा आहे. ही आजच्या तरूणींच्या नातेसंबंधाची आणि म्हणूनच त्यांना प्रिय असलेली गोष्ट आहे. यात आई-मुलगी, मैत्रिणी, बाप–मुलगी, प्रियकर-प्रेयसी अशा नात्यांना स्पर्श केला गेला आहे. हा विषय प्रत्येक तरुणीशी भावनात्मकरित्या जोडला जाणारा आहे, म्हणूनच प्रेक्षक त्याबाबत संवेदनशीलरित्या जोडला जाईल,” त्या पुढे म्हणतात. गौरी देशपांडे यांच्या लिखाणावर बेतलेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजते, असेही त्यांनी म्हटले आहे. “मी फार पूर्वीच ठरविले होते की जेव्हा केव्हा मी स्वतः चित्रपट दिग्दर्शित करेन, तेव्हा तो गौरी देशपांडे यांच्या पुस्तकावर आधारित असेल,” त्या म्हणतात.

प्रतिमा जोशी आणि भाग्यश्री जाधव यांनी या चित्रपटाची पटकथा लिहिली असून चित्रपटातील संवाद भाग्यश्री जाधव यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात केवळ एकच गाणे आहे. ‘कोणते नाते म्हणू हे गुंतणे न टाळणे...,’ हे ते गाणे गुरु ठाकूर यांनी लिहिले आहे आणि त्याची रचना मंगेश धाकडे यांनी केली आहे. वैशाली माडे यांनी ते गायले आहे.

‘आम्ही दोघी’ची निर्मिती आणि सादरीकरण एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटचे संजय छाब्रिया यांचे आहे. एव्हरेस्ट एन्टरटेन्मेंटच्या नावावर कितीतरी गाजलेले चित्रपट आहेत. त्यांत मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, तुकाराम, आजचा दिवस माझा, हॅप्पी जर्नी, टाईम प्लीज, मुंबई-पुणे-मुंबई २, कॉफी आणि बरंच काही, बापजन्म आणि इतरही अनेक चित्रपटांचा समावेश आहे.

Aamhi Doghi Priya Mukta 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement