Latest News
Typography

विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या अभिनेता प्रसाद ओकने आजवरच्या आपल्या कारकिर्दीत ऐतिहासिक भूमिकाही साकारल्या आहेत. वाचिक अभिनयाला यथोचित देहबोलीची जोड देत एखादी भूमिका रंगवण्याची कला चांगलीच अवगत असल्याने ऐतिहासिक व्यक्तिरेखांनाही न्याय देण्यात प्रसाद यशस्वी ठरतो. अभिनयातील याच गुणांमुळे प्रसादला ‘हिंदवी स्वराजाचे गुप्तहेर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहिर्जी नाईक यांची भूमिका साकारण्याची संधी आगामी ‘फर्जंद’ या ऐतिहासिक युद्धपटातून मिळाली आहे. येत्या १ जूनला ‘फर्जंद’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर यांच्या लेखन आणि दिग्दर्शनातून आकाराला आलेल्या ‘फर्जंद’ची निर्मिती अनिरबान सरकार यांनी केली आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज’ची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाचे सहनिर्माते संदिप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार आहेत.

शिवकालीन इतिहासातील बऱ्याच व्यक्तिरेखा आजवर कधीही खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आलेल्या नाहीत. ‘बहिर्जी नाईक’ हे शिवकालीन इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिरेखा आहे. महाराजांनी त्यांच्यातले कसब ओळखून स्वराज्य निर्मितीच्या कामाला उपयोगी पडतील हे जाणून त्यांना गुप्तहेरीच्या कामात रुजू करून घेतले. ते हिंदवी स्वराज्याचे गुप्तहेर होते. त्या काळातील १४ प्रांतांतील सर्व बोली मातृभाषेप्रमाणे त्यांना अवगत होत्या. वेषांतर करण्यात त्यांचा हातखंडा होता. इतकंच नव्हे तर काही ठिकाणी तर बहिर्जी एका व्यक्तीचं नाव होतं की टोळीचं, हेसुद्धा ठामपणे सांगण्यात आलेलं नाही. त्यांच्याबद्दल फार कमी माहिती उपलब्ध आहे आणि हेच त्यांचं खरं यश मानावं लागेल. हिंदवी स्वराज्याच्या जडणघडणीत बहिर्जी नाईक यांची मोलाची भूमिका होती.

Click Image to see HD Poster

Prasad Oak as Bahirji Naik Small

‘बहिर्जी नाईक यांची भूमिका प्रसादला चेहऱ्यावरील सहज बदलणाऱ्या हावभावांमुळे मिळाल्याचं लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरचं म्हणणं आहे. त्यामुळे अशी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी सुरुवातीपासून दिग्पालच्या मनात प्रसादचंच नाव होतं. प्रसादलाही भूमिका खूप आवडली. प्रसादने आपल्याअनोख्या शैलीत साकारलेल्या विविध रूपांमुळे चित्रपटाची रंगत वाढली आहे. प्रसाद ओक दिग्दर्शित ‘कच्चा लिंबू’ चित्रपटाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. दिग्दर्शनातील कौशल्यानंतर आता आगामी ‘फर्जंद’ चित्रपटातील प्रसादने साकारलेली बहिर्जीची भूमिकाही प्रेक्षक पसंतीस उतरेल यात शंका नाही.

१ जूनला ‘फर्जंद’ चित्रपटगृहांत झळकणार आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement