Latest News
Typography

ख्यातनाम गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे नाव सर्वांनाच परिचयाचे आहे. पारंपरिक संगीताला आधुनिक संगीताची जोड देऊन त्यांनी बनवलेली अनेक गाणी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. संगीतक्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातही आपला स्वतंत्र ठसा उमटविला. असा हा अष्टपैलू कलाकार निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’ या धमाल बालचित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहेत.

‘मंकी बात’ या चित्रपटाबद्दल बोलताना अवधूत गुप्ते म्हणाले की, पहिला म्युझिक अल्बम केल्यानंतर मला अनेक दिग्दर्शकांनी अभिनय करण्याविषयी विचारले होते, मात्र मी तो आपला प्रांत नाही असे सांगत त्यांना टाळले होते. ‘मंकी बात’चे दिग्दर्शक विजू माने हे माझे जवळचे मित्र. त्यांनी मला जेव्हा अभिनयासंबंधी विचारणा केली असता, मी नेहमीप्रमाणेच टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र नंतर जेव्हा त्यांनी मला कथा ऐकवली तेव्हा मी क्षणार्धात होकार दिला. अभिनेता म्हणून हा माझा पहिला चित्रपट तर आहेच, पण मी जी भूमिका साकारली ती नक्कीच सर्वांसाठी सरप्राईझ असणार आहे. नेहमीपेक्षा काही वेगळे करण्याचा माझा स्वभाव चित्रपटातही दिसेल याची काळजी दिग्दर्शक विजू माने यांनी घेतल्याचेही अवधूत गुप्तेने नमूद केले.

‘मंकी बात’ चित्रपटाचे दिग्दर्शन मराठीतील प्रथितयश दिग्दर्शक विजू माने यांनी केले आहे. आकाश पेंढारकर आणि विनोद सातव हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून चित्रपटाची निर्मिती विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू, विजू माने यांनी केली आहे. चित्रपटाचे संवाद आणि गाणी संदीप खरे यांनी लिहिली असून डॉ. सलील कुलकर्णी यांनी संगीतबद्ध केली आहेत. असा हा धमाल विनोदी बालचित्रपट येत्या १८ मे रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 5.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement