Latest News
Typography

व्हॉटसअॅप आणि इमेलच्या जमान्यात पत्र खूप मागे पडलं असलं तरीही पत्रव्यवहाराची जादू काही औरच असते आणि पोस्टमनच्या येण्याचं आजही तितकंच अप्रूप वाटतं. एक पोस्टमन तर टीव्हीच्या पडद्यावरुन आज घराघरांत पोहोचलाय आणि तो आपला वाटणारा पोस्टमन काका म्हणजे झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' मधील विनोदवीर, अभिनेता सागर कारंडे. 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमातील पोस्टमन काकांची पत्रं नेहमीच बरंच काही सांगून जातात. कधी कधी चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात अश्रू आणत ही पत्रं अनेक सामाजिक संदेश देऊन जातात. अलीकडेच थुकरट वाडीतील पोस्टमन काका म्हणजे अभिनेता सागर कारंडेने एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला असता अनेक चाहत्यांनी तो लाईक केला. त्या फोटोतील पोस्टमन काकांचा हा बाहुला त्याला नक्की दिला कोणी असावा असा प्रश्न अनेकांना पडला. तर एका चाहत्यानंच सागरला हा बाहुला भेट म्हणून दिला. आपल्या आवडत्या भूमिकेमुळे हा बाहुला सागरलाही खूप आवडला.

पूर्वी घराघरात सगळे जण पोस्टमन काकांची वाट पाहायचे. आजच्या सोशल मीडियाच्या जमान्यात पत्रं इतिहासजमा झाली आहेत. त्यामुळे लहानपणी घरी येणाऱ्या पोस्टमन काकांची जागा आता व्हॉट्सअॅप, फेसबुकनं घेतली आहे. 'चला हवा येऊ द्या'च्या माध्यमातून सागर कारंडेनं साकारलेल्या पोस्टमन काकांमुळे पुन्हा एकदा पोस्टमन काका घरोघरी पोहोचले. त्याची पोस्टमन काकांची भूमिका लोकप्रिय झाली आहे. अलीकडेच एका चाहत्याने पोस्टमन काकांचा हा खास बाहुला त्याला भेट म्हणून दिला. सागर त्याबद्दल म्हणाला की, "गेल्या आठवड्यात चित्रीकरण सुरू असताना मला हा बाहुला मिळाला. माझ्या एका चाहत्यानं खास माझ्यासाठी हा बाहुला दुकानातून विकत घेतला. पोस्टमन काकांची ही भूमिका माझ्या फार जवळची आहे. आपल्या भूमिकेचा बाहुला आज बाजारात मिळतोय हे बघून आनंद झाला. तो बाहुला बाजारात पाहून आज लोकांना माझी आठवण येतेय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. पोस्टमन काकांचा हा बाहुला मला आजपर्यंत मिळालेलं खास गिफ्ट आहे" असं तो आवर्जून सांगतो.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement