Latest News
Typography

अभिनय कट्टयावर आजपर्यंत केवळ मनोरंजनच नाही तर समाजातील अनेक वास्तववादी विषय सुद्धा मांडण्याचा प्रयत्न केला गेला त्यातलाच एक प्रयत्न म्हणजे कट्टा क्र ३८१ वरील एकांकिका.२९ सप्टेंबर २००६ रोजी महाराष्ट्रातल्या भंडारा जिल्ह्यात खैरलांजी गावात माणुसकीला काळिमा फासणारी अत्यंत अमानुष घटना घडली. गावातल्या छोट्या-छोट्या वादातून जातीयतेचं विष पेरलं जात राहिलं, अन भांडणातून मारहाण आणि बलात्कारापर्यंत प्रकरण पोहोचलं. या सगळ्या वादात माणसाचं एक वेगळं रूप अवघ्या जगाला पाहायला मिळालं, क्रूर आणि भयानक रूप! माणूस खरच एवढा क्रूर असू शकतो का? जात नावाची एक क्षुल्लक गोष्ट का माणसाच्या मनावर इतकी खोलवर कोरली गेली आहे ? आणि त्यासाठी जबाबदार कोण ? या विषयांवर अनेक रिसर्च उपलब्ध आहेतच, पन हे सगळं कधी थांबणार ? या सगळ्या अन्यायाविरुद्ध वेळोवेळी उठलेला आवाज का मर्यादित राहून जातो ? वगैरे अनेक प्रश्नातून '२९ सप्टेंबर २००६ रोजी' या एकांकिकेचा जन्म झाला. घडलेली घटना आणि त्याचे परिणाम या एकांकिकेतून लेखक राजरत्न भोजने आणि दिग्दर्शक संकेत पाटील यांनी मांडण्याचा प्रयत्न या एकांकिकेतून केला आहे.

वेळोवेळी पुरोगामी पुरोगामी म्हणून ओरडणारा हा महाराष्ट्र खरच पुरोगामी आहे का असाच प्रश्न, ही आणि अशा अनेक घटना सामान्यांसमोर पाडतात. या घटनेवेळी माजलेला जातीय कोलाहल आणि भोतमांगे कुटुंबावर झालेला अन्याय, मनामनामध्ये पेरलेलं जातीयतेचं विष हे महाराष्ट्राच्या सामाजिक मागासलेपणाचं प्रतीक आहे का ? असाच प्रश्न नेहमी पडत राहतो ! या घटनेनंतर अनेक आंदोलनं, मोर्चे महाराष्ट्र आणि देशभरात झाले, युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशनलाही या गोष्टीत भाग घेण्याची वेळ आली, पण अखेरच्या श्वासापर्यंत भय्यालाल भोतमांगेना न्यायासाठी झगडावं लागणं ही एक खरी शोकांतिका म्हणावी लागेल.

या घटनेनंतर अनेक लोक हळहळले, अनेकांनी या विषयावर बोलणं पसंत केलही असेल, पण तरीही त्या घटनेनंतर आजपर्यंत समाजात या प्रकारच्या घटना थांबल्या का ? असा प्रश्न विचारल्यावर उत्तर नसणं, शरमेने मान खाली घालण्यास प्रवृत्त करतं. या घटनेनंतर खर्ड्याच्या नितीन आगेचा जातीयतेच्या विखारी विषातून झालेला अमानुष खून असो किंवा अगदी कालच दलित मुलांनी विहिरीत आंघोळ केल्याने जळगावातील मारहाण असो, माणसाची समाजात होणारी अधोगतीच दर्शवतात. 2006 नंतरची ही 2018 मधील जळगावातील एक अमानुष घटना म्हणावी लागेल. या सगळ्या ज्वलंत उदाहरणामध्ये माणसाला माणुसकीची जाणीव करून देण्याचा उद्देश या एकांकिकेचा आहे.

Play 29 September 2006 on Abhinay Katta 02

हे सगळं असंच होत राहीलं तर जगातला सर्वाधिक मोठ्या संविधानिक डोलाऱ्यांपैकी एक म्हणवणारा भारतीय संविधानाचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही असं म्हटल्यास काही वावगं ठरणार नाही. लोकशाही जिवंत राहण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवण्यात जगाच्या इतिहासात कविता, कथा, कादंबऱ्या आणि नाटक साहित्याचा मोठा वाटा आहे आणि याच प्रेरणेतून ही एकांकिका जन्म घेते !

अभिनय कट्ट्याची सुरुवात तटकरे आजींनी दीपप्रज्वलन करून केली. नंतर लगेचच सुरू झालेल्या २९ सप्टेंबर २००६ या एकांकिकेने उपस्थित तुडुंब भरलेल्या सर्वच रसिक प्रेक्षकांच्या गर्दीला अवाक करून टाकले. जीवंत सादरीकरणामुळे तो प्रसंग उभा राहिला. आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून प्रत्येक कलाकाराला आपली बाजू मांडण्याचा अधिकार असून फक्त कोणत्या एका समाजासाठी नव्हे तर सत्य मांडण्यासाठी अभिनय कट्टा नेहमी तत्पर असतो . ज्यांना गांधी पटले त्यांनी ते का पटले ते दाखवावे व ज्यांना नथुराम समजले ते कसे समजले ते दाखवावे , समाजप्रबोधनाचे माध्यम म्हणून आपल्या कलाकृतीचा सन्मान करता येतो असे मत अभिनय कट्ट्याचे संचालक किरण नाकती यांनी मांडले तसेच मुसळधार पावसात सुद्धा रसिकांची तुडुंब गर्दी असल्यामुळे सर्व रसिकांचे आभार संचालकांनी मांडले. कट्ट्याचे निवेदन वीणा छत्रे हिने केले.

Play 29 September 2006 on Abhinay Katta 03

0.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement