Latest News
Typography

नेहमीच विविध शैलीतील व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता राजेश श्रृंगारपुरे आता प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. जगभरात फुटबॅाल वर्ल्ड कप फिवर सुरु असताना राजेश मात्र ‘गोटया’ खेळायला शिकवणार आहे. जय केतनभाई सोमैया यांची निर्मिती असलेला व भगवान वसंतराव पाचोरे यांनी दिग्दर्शित केलेला ‘गोटया’ हा चित्रपट ६ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

विहान प्रोडक्शन आणि द्वारा मोशन पिक्चरची निर्मिती असलेल्या गोटया चित्रपटाची सहनिर्मिती नैनेश दावडा व निशांत राजानी यांनी केली आहे. अभिनयाकडून दिग्दर्शनाकडे वळलेल्या भगवान पाचोरे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं असून, कथा-पटकथा-संवाद-गीतलेखनही त्यांनीच केलं आहे. या सिनेमाची कथा गोटया या खेळावर आधारित आहे. गोटया नावाच्या एका मुलाला गोटया खेळण्याचं प्रचंड वेड असतं. हे वेड त्याला कशाप्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेतं त्याची मनोरंजक कथा या सिनेमात पहायला मिळेल.

Rajesh Shringarpure Gotya Coach 01

या गोटयाला, गोटया खेळायला शिकवण्याची कामगिरी राजेशने साकारलेल्या प्रशिक्षकाकडे आहे. तसं पाहिलं तर राजेशने यापूर्वीही प्रशिक्षकाची भूमिका साकारली आहे. याबाबत राजेश म्हणाला की, "यापूर्वी ‘मन्या - द वंडर बॅाय’ या सिनेमात अॅथलिट, तर एकता- द पॅावर’ कबड्डी कोच बनलो होतो, पण ‘गोटया’ मधील प्रशिक्षक या दोन्ही सिनेमांपेक्षा खूप वेगळा आहे. आपल्याकडे गोटया या खेळाकडे केवळ टाइमपास म्हणून पाहिलं जातं. हे चुकीचं आहे. खरं तर हा खेळ आंतरराष्ट्रीय पातळीवरही खेळला जातो हे फार कमी लोकांना माहित असेल. या खेळामुळे शारीरीक हालचाली सुधारतातच, पण एकाग्रताही वाढते. हा बुद्धीचाही खेळ आहे. बालपणी मीदेखील गोटया खेळायचो. त्यामुळे या खेळाशी फार जवळच नातं आहे. या सिनेमामुळे पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या. भगवान पाचोरे यांनी एका सुंदर संकल्पनेवर तितकाच सुरेख सिनेमा तयार केल्याने एका चांगल्या सिनेमात काम केल्याचं समाधान लाभलं."

Rajesh Shringarpure Gotya Coach 02

या सिनेमात राजेशच्या जोडीला ‘गोटया’ची भूमिका साकारणारा ऋषिकेश वानखेडे तसेच सयाजी शिंदे, आनंद इंगळे, कमलाकर सातपुते, सुरेखा कुडची, हेमांगी राव, शरद सांखला, शशांक दरणे, पोर्णिमा आहिरे आदि कलाकारांच्याही भूमिका आहेत. भगवान पाचोरे यांनीच या सिनेमातील गीतरचना लिहिल्या आहेत. या गीतांना अवधूत गुप्ते यांनी संगीत दिलं आहे, तर नृत्य दिग्दर्शन गणेश आचार्य यांनी केलं आहे. रोहित नागभिडे यांचं पार्श्वसंगीत या सिनेमाला लाभलं आहे. छायालेखन बाशालाल सय्यद यांनी केलं असून, संकलन राहुल भातणकर यांनी केलं आहे. बाबासाहेब पाटील आणि विशाल चव्हाण या सिनेमाचे कार्यकारी निर्माते आहेत.

६ जुलै पासून चित्रपटगृहांत गोटयांचा खेळ रंगणार आहे.

Rajesh Shringarpure Gotya Coach 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement