Latest News
Typography

प्रेम.. ही सुंदर भावना. कुणाला कळलेली, कुणाला न कळलेली. काहींना अलगद सहजपणे स्वर्गसुख देणारी. तर काहींसाठी विरह आणि वेदना देणारी. पहिल्या प्रेमाची तर बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या शरद आणि पल्लवी या दोन प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणारा ‘काय झालं कळंना’ हा मराठी चित्रपट येत्या २० जुलैला आपल्या भेटीला येणार आहे. तत्पूर्वी या चित्रपटाचा धमाकेदार म्युझिक लॉण्च मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. या म्युझिक लॉण्च च्या निमित्ताने कलाकारांनी सादर केलेल्या धम्माल स्किटस् ने उपस्थितांची दाद मिळवली.

प्रेमकथेला सुमधूर गीत-संगीताची जोड दिल्यास ती रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यात यशस्वी होते. हे लक्षात घेऊनच ‘काय झालं कळंना’ या चित्रपटातील प्रेमकथेलाही कर्णमधुर गीतांची किनार जोडण्यात आली आहे. ‘काय झालं कळंना’, ‘टकमक टकमक’, ‘रुतला काटा’, ‘फुटला टाहो’, ‘चंद्रकोर’ अशा वेगवेगळ्या जॉनरची पाच गीते या चित्रपटात असून ही गीते माधुरी अशिरघडे, वलय, शौनक शिरोळे यांनी लिहिली आहेत. संगीत पंकज पडघन याचं आहे. आदर्श शिंदे, सायली पंकज, रोहित राऊत, रुपाली मोघे, सौरभ साळुंखे यांनी गीते स्वरबद्ध केली आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने रसिक प्रेक्षकांना सुरांची अनोखी म्युझिकल ट्रीट अनुभवता येणार आहे. तरुणाईच्या ओठांवर सहज रुळतील आणि लोकप्रिय ठरतील अशी गाणी या चित्रपटात आहेत.

या चित्रपटाद्वारे गिरीजा प्रभू व स्वप्नील काळे नवी जोडी रुपेरी पडद्यावर पदार्पण करीत असून या दोघांसोबत अरुण नलावडे, संजय खापरे, वंदना वाकनीस, कल्पना जगताप, श्रद्धा सुर्वे, हेमाली कारेकर, सुयश झुंजुरके, रवी फलटणकर यांच्या भूमिका आहेत. भन्नाट व्यक्तिरेखा भरपूर स्टंट, प्रेमकहाणी असा सगळा मसाला या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे.

श्री धनलक्ष्मी प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘काय झालं कळंना’ या चित्रपटाचे निर्माते पंकज गुप्ता असून दिग्दर्शन व कथा सुचिता शब्बीर यांची आहे. पटकथा किरण कुलकर्णी व पल्लवी करकेरा यांची आहे. संवाद लेखन राहुल मोरे आणि सुचिता शब्बीर यांचे आहेत. नृत्यदिग्दर्शन सुजीत कुमार, सुचिता शब्बीर यांचं आहे. छायाचित्रण सुरेश देशमाने याचं असून संकलन राजेश राव यांचं आहे. चित्रपटाच्या कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी शब्बीर पुनावाला सांभाळत आहेत.

Kay Zala Kalana Marathi Film Music Launch 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement