Latest News
Typography

कामगारांच्या प्रश्नांसाठी आंदोलने करणारे कामगार नेते आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित अभ्यंकर भांडवलदाराच्या भूमिकेत दिसणार आहेत. १३ जुलैला प्रदर्शित होत असलेल्या "लेथ जोशी" या चित्रपटात त्यांची महत्त्वाची भूमिका आहे.

अमोल कागणे आणि लक्ष्मण कागणे यांच्या अमोल कागणे स्टुडिओजने ह्या चित्रपटाची प्रस्तुती केली असून, प्रवाह निर्मिती आणि डॉन स्टुडिओज यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर मंगेश जोशी यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटात चित्तरंजन गिरी, अश्विनी गिरी, सेवा चौहान, ओम भूतकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अजित अभ्यंकर यांनी कामगारांच्या प्रश्नांबाबत सातत्याने आवाज उठवला आहे. त्यामुळे त्यांच्या चित्रपटातील पदार्पणाविषयी चर्चा आहे.

"गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञान बदलाची व्याप्ती आणि त्याचं स्वरूप फारच वेगानं बदलत आहे. मोठ्या यंत्रांकडून छोट्या यंत्रांकडे आणि माहिती तंत्रज्ञानाकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात विस्थापन होत आहे. त्याचा परिणाम असा झाला, की जगात भांडवलाला स्वातंत्र्य मिळालं आणि कामगार बंदिस्त झाला. त्यामुळे कामगाराची भांडवलाविरोधातील लढाशक्ती अधिकच क्षीण झाली. तंत्रज्ञानातील बदल अपरिहार्य असले, तरी या प्रक्रियेत कामगाराने जुळवून घेण्याबाबत काहीही विचार केला जात नाही. परिणामी तंत्रज्ञान बदलाची प्रक्रिया अमानुष होते. यंत्राचे नटबोल्ट काढून फेकावे, तशी माणसे काढली जातात, बदलली जातात. हे अतिशय वाईट आहे. याचा विचार माझ्या मनात होता. हाच विषय घेऊन मंगेश जोशी माझ्याकडे आला. मात्र, तंत्रज्ञान बदलाच्या या प्रक्रियेत कामगारांनीही हे तंत्रज्ञानाचं आव्हान त्याच्या योग्य अयोग्य विचारासहित स्वीकारणं मला महत्त्वाचं वाटतं" असं अभ्यंकर म्हणाले.

"मंगेशने कामगारांच्या प्रश्नांबाबतची माहिती माझ्याकडून घेतली. या विषयातली मंगेशची तळमळ पाहून मलाही त्यात रस वाटायला लागला. त्यामुळे मंगेशच्या विषयाबरोबरच त्याच्या त्या कलाप्रयत्नाशीही मी जोडला गेलो. एक दिवस अचानक त्याने चित्रपटात काम करण्याविषयी विचारलं. माझ्यासाठी ते खूपच सरप्रायझिंग होतं. कॉलेजमध्ये नाटकांतून मी काम केलं होतं. मात्र, कॅमेऱ्यासमोर कधीच अभिनय केला नव्हता. या चित्रपटातून तंत्रज्ञानात बदलातील वास्तव अधिक सकसपणे मांडण्यात आलं आहे", असंही अभ्यंकर यांनी सांगितलं.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement