Latest News
Typography

हलाल, ३१ ऑक्टोबर, संघर्षयात्रा या चित्रपटांतील अभिनयाचं कौतुक झाल्यानंतर प्रीतम कागणे "अहिल्या" या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात ती एका डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत प्रेक्षकांसमोर येणार आहे. खास या भूमिकेसाठी प्रीतमनं बुलेट चालवण्यापासून दोन महिन्यांचं खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं आहे.

सुधीर चारी निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केलं आहे. नितीन तेंडुलकर यांच्या गीतांना प्रवीण कुंवर यांनी संगीतबद्ध केलं आहे. चित्रपटात प्रीतमसह प्रिया बेर्डे, रोहित सावंत, अमोल कागणे, प्रमोद पवार, नूतन जयंत, निशा परूळेकर अशी उत्तम स्टारकास्ट आहे. प्रचंड कष्ट करून आयपीएस झालेल्या एका महत्त्वाकांक्षी महिला पोलिस अधिकाऱ्याची रंजक कथा अहिल्या चित्रपटात मांडण्यात आली आहे.

प्रीतमनं या चित्रपटातील भूमिकेसाठी विशेष मेहनत घेतली आहे. त्या विषयी प्रीतम म्हणते, "पोलिस अधिकाऱ्याची भूमिका या पूर्वी कधी केलेली नाही. अहिल्या चित्रपटानं ती संधी दिली. पोलिसांच्या जगण्याचे विविध कंगोरे या भूमिकेला आहेत. या भूमिकेसाठी फिजिकल फिटनेस वाढवणं आवश्यक होतं. त्यामुळे सायकलिंग, स्वीमिंग, कराटे खेळायला शिकले. दोन महिन्यामचं खडतर पोलिस प्रशिक्षणही घेतलं. आव्हान होतं, बुलेट शिकणं... बुलेट शिकताना चार-पाच वेळा धडपडलेही... मात्र, हार न मानता बुलेट चालवायला शिकले. त्यामुळे या भूमिकेला जीवंत करता आलं. या चित्रपटासाठी मीही खूप उत्सुक आहे."

"अहिल्या" चित्रपटाबरोबरच प्रीतमचा "मान्सून फुटबॉल" मराठी हिंदी चित्रपट आणि आणखी तीन चित्रपटही लवकरच येणार आहेत.

4.5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.50 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement