Latest News
Typography

हिंदीसोबतच मराठीतही आपल्या अभिनयाची चुणूक दाखवणारा मराठमोळा अभिनेता राकेश बापटची पावलं अध्यात्माच्या दिशेने वळली आहेत. राकेशच्या जीवनात असं काय घडलं की त्याला अध्यात्माची ओढ लागली असावी? असा प्रश्न पडणं साहजिक आहे, पण यातही ट्विस्ट आहे. मराठी चित्रपटात ‘चॅाकलेट हिरो’ म्हणून नावारूपाला आलेला राकेश खऱ्या जीवनात नव्हे, तर चंदेरी दुनियेत अध्यात्माकडे वळला आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ या आगामी चित्रपटासाठी राकेश अध्यात्मिक बनला आहे.

१९९९ मध्ये ‘मि. इंडिया’चा रनर अप आणि ‘मि. इंटरकॉन्टीनेंटल’ स्पर्धेचा पहिला विजेता ठरलेल्या राकेशने ‘तुम बीन’, ‘दिल वील प्यार व्यार’ या हिंदी सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. नेहमीच आव्हानात्मक भूमिकांच्या शोधत असणाऱ्या राकेशला ‘सविता दामोदर परांजपे’ चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एक वेगळी भूमिका साकारण्याची संधी मिळाली. या सिनेमात राकेशने साकारलेला अशोक हस्तमुद्रीकांत पारंगत आहे. टीआयएफआरचा स्कॅालर असूनही तो अध्यात्माकडे का वळतो याचं उत्तर ‘सविता दामोदर परांजपे’ हा सिनेमा पाहिल्यावर मिळेल. या सिनेमातील अशोकच्या भूमिकेबद्दल बोलताना राकेश सांगतो की, "आजवर मी नेहमीच वैविध्यपूर्ण भूमिका साकारण्याला प्राधान्य दिलं आहे. ‘सविता दामोदर परांजपे’ मधील व्यक्तिरेखाही त्याच वाटेवरील पुढचं पाऊल आहे. या सिनेमात मुख्य भूमिकेत असलेल्या शरद आणि कुसूम यांच्या जीवनाला कलाटणी देणारी माझी व्यक्तिरेखा प्रेक्षकांनाही नक्कीच आवडेल." असा विश्वासही राकेशने व्यक्त केला आहे.

Raqesh Bapat Savita Damodar Paranjpe 02

‘सविता दामोदर परांजपे’ या सिनेमाचं दिग्दर्शन स्वप्ना वाघमारे जोशी यांनी केलं आहे. चित्रपटाची कथा शेखर ताम्हाणे यांची असून पटकथा व संवादलेखन शिरीष लाटकर यांनी केलं आहे. जॅान अब्राहमची पहिली मराठी निर्मिती असलेल्या या चित्रपटात राकेश सोबत सुबोध भावे, तृप्ती तोरडमल, अंगद म्हसकर, पल्लवी पाटील, सविता प्रभुणे आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. योगेंद्र मोगरे, तृप्ती मधुकर तोरडमल सहनिर्माते आहेत. मंदार चोळकर व वैभव जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना निलेश मोहरीर आणि अमित राज या मराठीतील दोन आघाडीच्या संगीतकारांनी स्वरसाज चढवला आहे. प्रसाद भेंडे यांचं छायांकन आणि क्षितिजा खंडागळे यांचं संकलन या सिनेमाला लाभलं आहे. ‘जे.ए.एन्टरटेन्मेंट’ आणि ‘पॅनोरमा स्टुडिओज’ प्रस्तुत ‘सविता दामोदर परांजपे’ हा चित्रपट ३१ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

3 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 3.00 (1 Vote)
Advertisement