Latest News
Typography

काही वर्षां अगोदर ‘बालक-पालक’ मध्ये ‘ढिनच्यॅक ढिनच्यॅक’ करत अभिनेता प्रथमेश परबने संपूर्ण महाराष्ट्रात कल्ला करायला सुरुवात केली. त्यानंतर ‘दगडू’ हे नाव जरी ऐकलं तरी लगेच आपल्याला सर्वांचा लाडका प्रथमेश परब आठवतो. ‘टाईमपास’ मधील दगडूची भूमिका अतिशय जबरदस्त साकारल्यामुळे प्रथमेशला रातोरात प्रसिध्दी मिळाली. टाईमपास २ मध्ये पण प्रथमेशने प्रेक्षकांचे दिलखुलासपणे मनोरंजन केले. त्याच्या या चित्रपटांनंतर प्रथमेशचा अभिनय पुन्हा कधी पाहायला मिळतोय याची उत्सुकता अनेकांना होती आणि प्रेक्षकांच्या उत्सुकतेपोटी प्रथमेशने ‘उर्फी’ या चित्रपटाच्या माध्यमातून ‘धनक धनक...’ करत पुन्हा एकदा दणक्यात एण्ट्री मारली. प्रथमेशच्या या तिन्ही चित्रपटांना प्रेक्षकांनी इतकं डोक्यावर उचललं की या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाकेदार/प्रशंसनीय कमाई केली.

युथ आयकॉन आणि महाराष्ट्राचा वंडरबॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रथमेश परबने जेव्हा त्याच्या पहिल्या तीन चित्रपटाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिसवर जी जोरदार कमाई केली त्यासाठी मराठी इंडस्ट्रीने त्याचे मनापासून कौतुक केले. तसेच प्रथमेशच्या ‘झिपऱ्या’ चित्रपटाने राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये पण सर्वांची वाहवा मिळवली. प्रत्येक चित्रपटांतून शाबासकीची थाप मिळवल्यावर पुन्हा एकदा अशी संधी कधी अनुभवयाला मिळतेय या प्रतिक्षेत जसा प्रथमेश परब असेल त्याचप्रकारे प्रथमेशच्या आगामी चित्रपटाच्या प्रतिक्षेत त्याचे चाहते पण नक्कीच असणार.

Prathamesh Parab Something New 02

सोशल मिडीयाच्या माध्यमातून प्रथमेश परब पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर कल्ला करणार याची चाहूल लागली आहे. ‘रेडू’ या मराठी चित्रपटाचे लेखक संजय नवगिरे यांनी दिग्दर्शक मिलिंद कवडे आणि प्रथमेश परब यांच्यासोबतचा फोटो नुकताच पोस्ट केला आणि विशेष म्हणजे त्यांनी या फोटोवर ‘लवकरच’ असे देखील म्हटले आहे त्यामुळे लेखक-दिग्दर्शक-अभिनेता हे त्रिकुट एकत्र येऊन काहीतरी मनोरंजक, भन्नाट प्रेक्षकांसाठी आणत आहेत हे नक्की. एकीकडे संजय नवगिरे यांची पोस्ट तर दुसरीकडे प्रथमेश परबने स्वत:चा डबिंग दरम्यानचा एक फोटो सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर कमाल कमाई करणारा युथ स्टार प्रथमेश परब पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करायला आणि मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अव्वल स्थानावर घेऊन जायला सज्ज झाला आहे असं म्हणायला हरकत नाही.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement