Latest News
Typography

झी टॉकीजचा अत्यंत लोकप्रिय असा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' हा पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. यंदा हा कार्यक्रम दहाव्या वर्षात पदार्पण करत असल्याने, या सोहळ्याचे विशेष महत्त्व होते. या वर्षी अनेक प्रसिद्ध मराठी हिंदी सिनेकलाकारांच्या लग्नामुळे हे वर्ष गाजलेलं होते . त्यामुळे सिनेसृष्टीतील २०१८ वर्षातील सिनेकलाकारांची लगीनघाई , त्यावरील मनोरंजन प्रेक्षकांना पाहायला मिळेल . दरवर्षी निरनिराळे आणि आकर्षक थीम घेऊन मनोरंजन करणारा या महासोहळ्यात 'लग्न सराई' .या थीम ची भट्टी चला हवा येऊ द्याच्या कलाकारांनी चांगलीच जमवली.

गेली दहा वर्षे, झी टॉकीज चा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण' हा सोहळा सर्व कलाकारांना त्यांनी वर्षभरात केलेल्या कामाची पोचपावती देतो आणि त्यामुळेच कलाकारांच्या मनातही 'महाराष्टाचा फेवरेट कोण' या सोहळ्याने मानाचे स्थान मिळवले आहे. पण त्याहुन जास्त तो जनमानसात सुद्धा तेवढाच प्रसिद्ध आहे. कलाकारांतील कलागुणांचे मूल्यमापन करण्यात इथे प्रेक्षकांचाही थेट सहभाग असतो, हेच याचे मुख्य कारण ठरते. 'फेवरेट चित्रपट', 'फेवरेट अभिनेता', 'फेवरेट अभिनेत्री', 'फेवरेट स्टाईल आयकॉन' अशा पुरस्कारांसह, दशकपूर्तीचे औचित्य साधून, 'गोल्डन दिवा ऑफ द इयर' हा नवा पुरस्कारदेखील यंदापासून प्रदान करण्यात आला आहे.

Click Here for the Complete List of Nominations

या नावाजलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या १० वर्षाच्या मनोरंजनाच्या प्रवासात झी टॉकीज ला अनेक मान्यवरांची साथ लाभली, 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण'चे कुटुंब विस्तारत गेले. या दिमाखदार सोहळ्याच्या सूत्रसंचालनाची धुरा सर्वाचे लाडके अभिनेते स्वप्नील जोशी आणि अमेय वाघ यांनी सांभाळली. महेश मांजरेकर, महेश कोठारे, सचिन पिळगावकर, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, मृणाल कुलकर्णी, रवी जाधव, संजय जाधव, समीर विध्वंस, प्रवीण तरडे, श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम, सिद्धार्थ चांदेकर, गश्मीर महाजनी, भूषण प्रधान, उमेश कामत, उपेंद्र लिमये, पूजा सावंत, क्रांती रेडकर, अभिज्ञा भावे, अंकित मोहन, संस्कृती बालगुडे, वैदेही परशुरामी, नेहा पेंडसे, मानसी नाईक, मृण्मयी देशपांडे, संदीप पाठक, वैशाली माडे, वैशाली सामंत, अवधूत गुप्ते, गौरी किरण, सायली पाटील, वर्षा उजगांवकर, पल्लवी पाटील, प्रिया बेर्डे, स्वानंदी बेर्डे आणि अनेक मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी रेड कार्पेटवर त्यांच्या स्टाइलची झलक दाखवली.

सायली पाटील, अभिज्ञा भावे आणि अंकित मोहन यांनी गणेशवंदना ने कार्यक्रमाची सुरुवात केली . महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांना मनोरंजित करणारा अभिनेता गश्मीर महाजनी याने पोलिसांना मानवंदना देणारा एक धमाकेदार परफॉर्म्सन केला. चला हवा येऊ द्या फेम श्रेया बुगडे, कुशल बद्रिके, भाऊ कदम यांनी पोट धरून हसवणारे विविध ऍक्ट केले . तर महेश मांजरेकर यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षीदेखील सिनेकलाकारांवर त्यांच्या विशिष्ट शैलीत टिप्पणी केली. याच प्रमाणे इतर अनेक कलाकारांनी विविध मनोरंजन करणारे परफॉर्मन्स सादर केले. त्याचबरोबर विविध विभागातील महाराष्ट्राचे फेव्हरेट अभिनेता, अभिनेत्री, चित्रपट, दिग्दर्शक, गायक असे अवॉर्ड्स दिले गेले.

महाराष्ट्राचा फेव्हरेट चित्रपट ज्याने प्रेक्षकांना अरारा म्हणत वेड लावले असा 'मुळशी पॅटर्न' ठरला. तर महाराष्ट्राचा फेव्हरेट दिग्दर्शक सुद्धा मुळशी पॅटर्न' चे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना हा बहुमान मिळाला. महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता पुष्पक विमान मधील अभिनयाकरीता सुबोध भावे याला तर महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेत्री माधुरी दीक्षित हिला तिच्या बकेट लिस्ट मधील कामासाठी मिळाला.

‘महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ‘ या कार्यक्रमाचे गेली १० वर्ष कुटुंबप्रमुख असलेलेले महेश मांजरेकर यांनी सांगितले की, "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण’ अर्थात MFK पुरस्कारांना दहा वर्ष होतायत. केवळ या पुरस्कार सोहळ्याचा भाग म्हणून नाही, तर एकंदरीतच हे पुरस्कार माझ्यासाठी फेव्हरेट राहिले आहेत. याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे झी टाॅकीजने या पुरस्कार सोहळ्यात जाणीवपूर्वक जपलेला खरेपणा. या पुरस्कार विजेत्यांची निवड चॅनलवर सांगितल्याप्रमाणे खरोखरच प्रेक्षकांच्या मतांवर ठरते. दरवर्षी ‘झी’ ची निर्मिती असलेले सिनेमे स्पर्धेत असूनही केवळ त्याच सिनेमांना सतत झुकतं माप देण्याचा प्रकार कधीच झाला नाही. ज्या कलाकृती सरस आहेत त्यांचा योग्य सन्मान या पुरस्कार सोहळ्यात होत आलाय, आणि हे सातत्य ठेवल्याबद्दल MFK टीमचा मला अभिमान वाटतो. एक दशकाचा टप्पा यशस्वीपणे पार झालाय, यापुढे या पुरस्कारांची घोडदौड अशीच कायम राहो, याच माझ्या मनापासून शुभेच्छा !!"

नक्की पाहा मनोरंजनाने भरलेला झगमगता सोहळा 'महाराष्ट्राचा फेवरेट कोण? २०१८'. रविवार २४ फेब्रुवारी, संध्या. ६:३० वा.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)