Latest News
Typography

चॉकलेट हिरो स्वप्निल जोशी आता एकदम नव्या लूकमध्ये प्रेक्षकांसमोर येणार आहे. ओळखीच्या चेहऱ्याची पुन्हा नव्याने होणारी ही ओळख आहे श्रावणी देवधर यांच्या ‘मोगरा फुलला’ या आगामी चित्रपटातील. चित्रपटाचे निर्माते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी ट्विट करत स्वप्निल जोशी साकारत असलेल्या सुनील कुलकर्णीचा हा आगळा लूक प्रेक्षकांसमोर आणला.

स्वप्निलच्या ‘मोगरा फुलला’ मधील नव्या अवतारामुळे या चित्रपटाबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली आहे. श्रावणी देवधर या गुणी आणि सिद्धहस्त दिग्दर्शिका बऱ्याच काळानंतर पुन्हा दिग्दर्शनाकडे वळत असल्यानेही या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता आहे. लपंडाव, सरकारनामा, लेकरू अशा मोजक्या पण दर्जेदार चित्रपट देणाऱ्या देवधर या आपल्या वेगळ्या शैलीसाठी ओळखल्या जातात. फिल्मफेअर आणि स्क्रीनसारखे अनेक प्रतिष्ठित पुरस्कार देवधर यांनी आतापर्यंत प्राप्त केले आहेत.

Swwapnil Joshi Mogra Phulala First Look 01

या चित्रपटाची निर्मिती ‘जीसिम्स’ च्या अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार यांनी केली आहे. फुगे, तुला कळणार नाही, रणांगण या चित्रपटांची निर्मिती आणि ‘भिकारी’ चित्रपटाची प्रस्तुती ‘जीसिम्स’ने केली आहे. अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक निशाणदार म्हणतात, ”मोगरा फुलला’ची कथा मनाला स्पर्शून जाईल. श्रावणी देवधर या आघाडीच्या दिग्दर्शिकेबरोबर काम करत असल्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्या एक अत्यंत प्रतिभावान आणि कठोर परिश्रम करणाऱ्या दिग्दर्शिका आहेत. त्यांचा एक वेगळाच टच या चित्रपटात पाहायला मिळेल.”

शिर्षकावरून ध्वनित होते त्याप्रमाणे सुखांत प्रकारची अशी ही एक प्रेमकथा आहे. एका मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेला सुनील कुलकर्णी लग्नाचे वय उलटून गेले तरी कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये अडकून राहतो. पण एके दिवशी आपण प्रेमात पडलो असल्याचे त्याच्या लक्षात येते. तो जिच्या प्रेमात पडला आहे ती एक सुखवस्तू कुटुंबातील पण स्वतंत्र बाण्याची आणि स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाची तरुणी आहे. आगळ्या अशा कथेवर आधारित असल्याने ‘मोगरा फुलला’ प्रेक्षकांना एक वेगळी पर्वणी देऊन जाईल.

Swwapnil Joshi Mogra Phulala First Look 02

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)