आनंदसागर प्रॉडक्शन हाऊस प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत आणि पांडुरंग जाधव दिग्दर्शित ‘ड्राय डे’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 'ड्राय डे' या नावामुळेच अधिक चर्चा होत असलेल्या या सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीख नुकत्याच पार पडलेल्या १ मे, महाराष्ट्र दिनाच्या मुहुर्तावर जाहीर करण्यात आली. गतवर्षी १० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होऊ न शकलेल्या 'ड्राय डे' सिनेमाला, सेन्सॉरच्या नियमावलीमुळे प्रतीक्षा करावी लागली होती. मात्र, अखेरीस हि प्रतीक्षा आता संपली असून, संजय पाटील यांची निर्मिती असलेला हा सिनेमा १३ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात झळकणार असल्याचे सोशल नेटवर्कींग साईटद्वारे सांगण्यात आले आहे.

कोणत्याही भूमिकेला योग्य न्याय देण्याचं कसब अंगी असलेल्या अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आजवर बऱ्याच अवघड भूमिकाही अगदी सोप्या पद्धतीने सादर करीत रसिकांची मनं जिंकली आहेत. हिच मृण्मयी आता लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या ‘फर्जंद’ या आगामी सिनेमात एका कलावंतीणीच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्वामी समर्थ मुव्हीज क्रिएशन एलएलपी’ ची प्रस्तुती आणि अनिरबान सरकार यांची निर्मिती असलेला ‘फर्जंद’ १ जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘फर्जंद’ची सहनिर्मिती संदिप जाधव, महेश जाऊरकर आणि स्वप्निल पोतदार यांनी केली आहे.

मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ (एमटीडीसी) यांकडून कर्जत येथील नितीन चंद्रकांत देसाई यांच्या एन.डी. स्टुडिओत दि.२८ एप्रिल ते १ मे दरम्यान 'बॉलिवूड पर्यटन' चा महामेळा भरवण्यात आला आहे. यादरम्यान ३० एप्रिल रोजी भारतीय चित्रपटसृष्टीचे प्रणेते दादासाहेब फाळके जयंती आणि १ मे महाराष्ट्र दिन अश्या दुहेरी मुहूर्ताचे औचित्यदेखील या चारदिवसीय कार्यक्रमात साधण्यात आले आहे.

ख्यातनाम गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते हे नाव सर्वांनाच परिचयाचे आहे. पारंपरिक संगीताला आधुनिक संगीताची जोड देऊन त्यांनी बनवलेली अनेक गाणी महाराष्ट्रात लोकप्रिय आहेत. संगीतक्षेत्रात आपले एक वेगळे वलय निर्माण केल्यानंतर त्यांनी चित्रपट दिग्दर्शनातही आपला स्वतंत्र ठसा उमटविला. असा हा अष्टपैलू कलाकार निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित ‘मंकी बात’ या धमाल बालचित्रपटातून अभिनयात पदार्पण करणार आहेत.

प्रतिष्ठेचा अरविंदन पुरस्कार प्राप्त 'रेडू' चित्रपटाने राज्य पुरस्कारांमध्येही आपला डंका वाजवला आहे. राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयातर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात एकूण ७ सर्वोत्कृष्ट पूरस्कारांवर सागर छाया वंजारी दिग्दर्शित 'रेडू'ने आपले नाव कोरले आहे.

पाणी फाउंडेशनची सक्रिय कार्यकर्ती असलेल्या अभिनेत्री सई ताम्हणकरने महाराष्ट्रदिनी पुण्याजवळच्या सुकळवाडी गावात श्रमदान केले. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र पाणीटंचाईमुक्त करण्यासाठी सई ताम्हणकर गेली तीन वर्ष कार्यरत आहे.

Advertisement