झी मराठी वरील "लगीर झालं जी "या लोकप्रिय मालिकेचे पार्श्वगीत, "ये रे ये रे पावसा" चित्रपटाचे टायटल साँग, लव्ह लफडे चित्रपटातील 'ताईच्या लग्नाला' यासारखी एकापेक्षा एक सुपरहिट गाणी देणारे गायक आणि संगीतकार प्रवीण कुवर यांचे अजून एक नवे चित्रपट गीत लवकरच चाहत्यांच्या भेटीला येत आहे. पण या चित्रपटाचे नाव मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. दुर्वा एंटरटेनमेंट प्रस्तुत आणि निलेश पाटील (शेलिनो ड्रीम्स इन्फोटेन्मेंट) निर्मित "फुगडी" या गायक प्रवीण कुवर यांच्या आवाजातील गाण्याचे रेकॉर्डींग नुकतेच युफोनी स्टुडिओ, अंधेरी पश्चिम येथे पार पडले. निलेश पाटील यांची ही पहिलीच निर्मिती असून लवकरच या गाण्याच्या चित्रीकरणालाही सुरुवात होणार आहे.

माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याच्या जोडीला नशिबाची साथ असते, त्यामुळे, तो भरपूर प्रमाणात आपल्या नशिबावर अवलंबून असतो, असे म्हंटले जाते. उदाहरणार्थ, आपल्या दैनंदिन जीवनात काही काम चांगल्या पद्धतीने पार पडले की, अमुक व्यक्तीने नशीब काढले असे बोलले जाते, पण जर हेच काम बिघडले तर त्याच्या नशिबाला कोसले जाते. मुळात, आपले नशीब हे आपल्याच हातात असते, आयुष्यात येणाऱ्या चढ उताराला माणूसच जबाबदार असतो, मात्र नाव नशिबाचे पुढे केले जाते. नशिबाच्या याच संकल्पनेवर आधारीत असलेला एक नवाकोरा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. लॅन्डमार्क फिल्म्सच्या विधि कासलीवाल प्रस्तुत, फ्लाईंग गॉड फिल्म्स निर्मित, गिरी मीडिया फॅक्टरी यांच्या सहयोगाने प्रदर्शित होत असलेल्या या चित्रपटाचे नाव ‘नशीबवान’ असे आहे. अमोल वसंत गोळे यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटाचे नुकतेच सोशल नेट्वर्किंग साईटवर मोशन पोस्टर प्रदर्शित करण्यात आले. ‘नशीबवान’ सिनेमाच्या या मोशन पोस्टरवर मराठीचा गुणी कलाकार भाऊ कदम एक स्वच्छता कामगाराच्या भूमिकेत आपल्याला दिसून येतो. तसेच, त्याच्या हातात त्याचा साथीदार म्हणजे साफ सफाई करणारा झाडूसुद्धा तेवढ्याच दिमाखात चमकत असल्याचे पाहायला मिळते.

भारतीय चित्रपटसृष्टीची व्याप्ती खूप मोठी असून, या सृष्टीत वावरणाऱ्या कलाकारांच्या कामगिरीमुळे हिंदी तसेच इतर प्रादेशिक चित्रपटांचा बोलबाला दिवसागणिक वाढत असल्याचे आपल्याला पाहायला मिळते आहे. या प्रसिद्धीत मराठी चित्रपट आणि मराठी कलाकारदेखील मागे राहिलेले नाहीत. कारण, मराठी कलाकारांच्या चाहते वर्गात देखील प्रचंड वाढ होत आहे. त्यामुळे चाहत्यांच्या या गराड्यात टिकून राहण्यासाठी आणि आपले अस्तित्व सिध्द करण्यासाठी कलाकार मंडळी सतत प्रयत्नशील असतात. असाच एक प्रयत्न मराठीचे ज्येष्ठ आणि गुणी कलाकार विजय पाटकर यांनी केला आहे. हिंदी तसेच मराठीच्या छोट्या आणि मोठ्या पडद्यावर कामगिरी बजावणारे विजय पाटकर, किनशीप हब या अॅपद्वारे आपल्या चाहत्यांच्या भेटीस येत आहे. त्यांच्या अभिनय कारकिर्दीची इत्यंभूत माहिती लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या या अॅपमुळे, विजय पाटकर यांना प्रेक्षकांसोबत जवळीकदेखील साधता येणार आहे. एका क्लिकवर सर्व माहिती उपलब्ध करून देणाऱ्या या अॅपचे नुकतेच एका छोटेखानी समारंभात अनावरण करण्यात आले.

अभिनेता समीर धर्माधिकारी यांनी आपल्या देखण्या व्यक्तिमत्वासोबतच आपल्या विविधांगी भूमिकांनी आजवर आपली वेगळी छाप उमटवली आहे. ‘तू तिथे असावे’ या आगामी मराठी चित्रपटात समीर यांचा वेगळा अंदाज प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. ‘बाबा भाई’ या ‘डॉन’ ची भूमिका समीर यांनी चित्रपटात साकारली आहे. यात समीर धर्माधिकारी यांचा रावडी लूक पहायला मिळतोय. ‘जी कुमार पाटील एंटरटेण्मेंट’ ची प्रस्तुती असलेल्या ‘तू तिथे असावे’ हा चित्रपट येत्या ७ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.

महाराष्ट्रचे आराध्यदैवत आणि अखंड वारकरी समुदायाच्या लाडक्या विठूमाऊलीवर आधारित ' विठ्ठल ' या सिनेमाची चर्चा सवर्त्र जोरदार सुरु आहे. कंबरेवर हात ठेऊन विटेवर उभा असणाऱ्या माउलीचे मनुष्य रूप दाखवणाऱ्या या सिनेमाचा नुकताच सोशल नेटवर्किंग साईट वर टीजर प्रदर्शित करण्यात आला. राजीव रुईया यांची कथा आणि दिग्दर्शन तसेच टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी यांची प्रस्तुती असलेल्या या सिनेमाच्या टीजर मध्ये सुरुवातीला भव्यदिव्य विठ्ठलाची मूर्ती दिसून त्यावर अभिराचा वर्षाव होत ढोल ताशाच्या गजरात माउलीला वंदन करताना श्रेयस तळपदे दिसत आहे, त्यामुळे या चित्रपटात श्रेयस तळपदे नेमक्या कोणत्या भूमिकेमधून दिसून येणार ? असा प्रश्न प्रेक्षकांमध्ये निर्माण झाला आहे.

आपल्या देशात ९० च्या दशकात खासगीकरण, जागतिकीकरण धोरणाचे वारे वाहू लागले, यामध्ये कारखानदारी, खासगी उद्योग, आयटी कंपन्या यांना चालना मिळाली, यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला हातभार लागला. मात्र विकास करताना जेव्हा समतोल साधला जात नाही, तेव्हा कुठल्या एका क्षेत्राचा बळी जाणार हे निश्चित आहे. दुर्दैवाने हा समतोल न साधल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. शेतीशी निगडीत समस्या मांडणारे अनेक चित्रपट आले, पण या समस्या मुळात जन्मास का आल्या? यावर सडेतोड भाष्य करणारा ‘मुळशी पॅटर्न’ हा मराठी चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Advertisement