'कियारा' हे नाव सध्या घराघरांत ऐकू येतंय. महिला वर्गातून बऱ्याचदा निंदा-नालस्तीची बळी ठरणारी ही व्यक्तिरेखा आहे 'घाडगे आणि सून' या मालिकेमधील. कियारा उर्फ प्रतीक्षा मुणगेकरचा करिअर ग्राफ उंचावणारी ही भूमिका सध्या प्रचंड प्रसिद्ध आहे. आत्तापर्यंत व्हिलनिश भूमिकेत दिसणारी प्रतीक्षा लवकरच तुम्हाला एका हटके भूमिकेत दिसणार आहे. 'बाबो' या आगामी चित्रपटात प्रतीक्षा आणि अमोल कागणेची जोडी जुळवण्यात आली असून अमोलची प्रेयसी म्हणून रसिकांच्या भेटीस येईल. नटखट, प्रेमळ-लाघवी आणि तितकीच समंजस प्रतीक्षा श्रीमंत घराण्यातली आहे उलट अमोल हा मध्यम वर्गीय. अमोल आणि प्रतिक्षाच्या प्रेमाला समाज मान्यता लाभणार का ? त्यांचं प्रेम यशस्वी होतं का ? घरच्यांचा विरोध श्रेष्ठ कि प्रेम ? काठ-शाहचा हा खेळ गमतीशीर पद्धतीने 'बाबो' मध्ये मांडला आहे.

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. या भावनेचं महत्त्व प्रत्येकाच्या मनात वेगळं असतं. नात्यातले अनुबंध जपत प्रेमाची अनोखी ‘पेठ’ उलगडणारा प्रेमपट लवकरच मराठी रुपेरी पडद्यावर येणार आहे. पोस्टर अनावरणाने या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच संपन्न झाला. ‘शारदा’ फिल्म प्रोडक्शनची प्रस्तुती असलेल्या ‘पेठ’ चित्रपटाचे निर्माते वीरकुमार शहा तर दिग्दर्शक अभिजित साठे आहेत.

'H2O' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून अवघ्या महाराष्ट्रात या चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटातून श्रमदानाचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला उन्हाळाच्या झळा बसत असतानाच, त्याची तमा न बाळगता 'H2O' चित्रपटातील सर्व कलाकारांनी 'पाणी फाऊंडेशन' अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यातील तिसी गावात सुरु असलेल्या श्रमदान शिबिरात उत्साहाने सहभाग घेत, तरुणांसमोर नवीन आदर्श ठेवला आहे.

‘संस्कृती कलादर्पण’ चा तीन दिवसीय नाट्य महोत्सव नुकताच उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मृदुला भाटकर आणि म.न.से महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. विजय गोखले, मिलिंद गवळी, गुरुदत्त लाड, कांचन अधिकारी, प्राजक्ता कुलकर्णी, स्मिता जयकर, सविता मालपेकर आदि उपस्थित मान्यवरांनी याप्रसंगी उपस्थित राहून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यंदा नाट्यमहोत्सवाचे १९ वे वर्ष असून, यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला.

क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी म्हणजे भारतीयांचे जिव्हाळ्याचे विषय आणि त्या दोन्ही एकत्र येणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. हा योग ‘बाळा’या मराठी चित्रपटाने जुळून आणला आहे. या दोन्ही गोष्टी आपली आवड म्हणून जपणारे अनेकजण असतील. मात्र त्याला आपल्या निर्धाराची जोड देत ती पूर्ण करणारे फार कमी असतात. आगामी 'बाळा' या चित्रपटातही क्रिकेटवेड्या बाळाची व त्याच्या निर्धाराची, स्वप्नांची गोष्ट उलगडणार आहे. ३ मे ला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा शानदार संगीत अनावरण सोहळा नुकताच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

विद्येची देवता ही श्री गणरायांची ओळख आहे. श्रींच्या १४ विद्या आणि ६४ कलांबद्दल आपल्याला माहित आहे, अलीकडच्या काळात जाहिरात ही ६५ वी कला म्हणून नावारूपाला आलेली आहे. आता यात आणखी भर पडली असून श्रीचं स्मरण करून ६६ व्या कलेबद्दल जाणून घेण्याची वेळ आली आहे. ही कला नेमकी कोणती? हे सांगण्यासाठी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी ’६६ सदाशिव’ या मराठी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Advertisement