ध्येर्या, ढुंग्या आणि कबीरची महाविद्यालयीन भानगड दाखवणाऱ्या, 'बॉईज २' चे इंजिन बॉक्स ऑफिसवर सलग तिसऱ्या आठवड्यातही सुसाट वेगाने धावत आहे. इरॉस इंटरनॅशनल आणि एवरेस्ट इंटरटेंटमेन्ट प्रस्तुत, अवधूत गुप्ते ह्यांच्या सहयोगाने सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रोडक्शनअंतर्गत ५ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या सिनेमाने महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना भुरळ घातली आहे. सुमंत शिंदे, पार्थ भालेराव आणि प्रतीक लाडची प्रमुख भूमिका असलेल्या या सिनेमाच्या सुपरहिटचे नुकतेच मुंबई येथे मोठ्या थाटामाटात सेलिब्रेशन करण्यात आले. 'बॉईज २' चे निर्माते राजेंद्र शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या या सक्सेस पार्टीत, 'बॉईज ३' सिनेमाची घोषणादेखील करण्यात आली. तसेच या सिनेमाने अवघ्या १७ दिवसांमध्ये १६ करोडहून अधिक कमाई केली असल्याची माहिती इरॉस इंटरनेशनलचे नंदू अहुजा यांनी दिली.

महाराष्ट्रात मिळालेल्या उत्तम प्रतिसादानंतर ‘मी शिवाजी पार्क’ हा मराठी चित्रपट आता परदेशात प्रदर्शित होणार आहे. दर्जेदार आशयाने परिपूर्ण असलेला हा चित्रपट परदेशातील मराठी प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार आहे. १८ ऑक्टोबरला महाराष्ट्रभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने आता परदेशातही आपली घौडदौड सुरु केली आहे. येत्या १ नोव्हेंबरला जर्मनीतील म्युनिच मध्ये तर शनिवार ३ नोव्हेंबरला स्वीडनमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. शुक्रवार २ नोव्हेंबर आणि शनिवार ३ नोव्हेंबरपासून मी शिवाजी पार्क अमेरिकेतील न्यू जर्सी, डल्लास, बे एरिया, फिलाल्डेफिया, पोर्टलॅण्ड, सियाटेल, अटलांटा, हॉस्टन या शहरांतील चित्रपटगृहांतून प्रदर्शित होणार आहे. आपल्या न्यायव्यवस्थेवर प्रकाशझोत टाकणारा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट आहे. मराठीतील पाच दिग्गज कलाकार आणि तितकेच ताकदीचे दिग्गज दिग्दर्शक यांच्या एकत्रित प्रयत्नातून साकारलेला चित्रपट परदेशातील प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

वडील लोकेश आणि आई चैत्राली यांच्या पावलावर पाऊल टाकत शुभवी लोकेश गुप्ते चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहे. लोकेश विजय गुप्ते दिग्दर्शित 'एक सांगायचंय... Unsaid Harmony' या चित्रपटातून शुभवीच्या अभिनयाचा प्रवास सुरू होत आहे.

'मानसीचा चित्रकार तो' या मालिकेतून आपल्या करिअरची सुरुवात करणाऱ्या ऋत्विक केंद्रे ने मराठी सिनेसृष्टीत व नाट्यसृष्टीत स्वतःचे अस्तित्व निर्माण केले आहे. गेल्या महिन्यात त्याचा 'ड्राय डे' हा सिनेमा प्रदर्शित झाला. सिनेमातील त्याच्या कामाला प्रेक्षकांची पसंती लाभली. सध्या ऋत्विक आपल्या आगामी 'सरगम' सिनेमाच्या कामात व्यस्त आहे. मराठी सिनेसृष्टीसोबतच ऋत्विक दाक्षिणात्य सिनेमातही अभिनय करण्यासाठी सज्ज झाला असल्याचे सूत्रांकडून समजते आहे.

प्रसिद्ध अभिनेता शर्मन जोशी याने रंग दे बसंती, स्टाईल, मेट्रो, थ्री इडियटस, ढोल, गोलमाल, फेरारिकी सवरी अशा अनेक चित्रपटात त्याने विविध भूमिका साकारल्या आहेत. मुंबईमध्ये जन्मलेला शर्मनला मराठी भाषेविषयी खूप प्रेम आहे. महाराष्ट्राने मला भरभरून दिले आहे असे तो आवर्जून सांगतो. मला आता मराठी चित्रपटात काम करायचंय आहे असे शर्मन जोशी याने त्याचा भावना पुण्यात त्याच्या आगामी प्रदर्शित होणाऱ्या ‘काशी’ चित्रपटाच्या पत्रकार परिषदेत व्यक्त केल्या. तो पुढे असा म्हणला का माझा आगामी चित्रपट ‘काशी’ वेगळ्या धाटणीचा आहे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर सुंदरपणे स्थित, वाराणसी हे भारतातील सर्वात प्राचीन शहर आहे. या चित्रपटाची कथा या ठिकाणीच घडते.

‘मुंबापुरी प्रॉडक्शन’चे मोहसिन अख्तर निर्मित आणि सोनाली कुलकर्णी ची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी’ या मराठी चित्रपटाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. नवरात्रीच्या दिवसात टीझर पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर या चित्रपटाविषयीची कमालीची उत्सुकता वाढली आहे. एका सुंदर नात्याची गोष्ट सांगणाऱ्या ‘माधुरी’ या चित्रपटात सोनाली कुलकर्णीसह अभिनेता शरद केळकरची पण महत्त्वाची भूमिका आहे. नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा शरद या चित्रपटात प्रेक्षकांनी कधीही न पाहिलेल्या एका हटके रुपातून दिसणार आहे. नुकतेच, शरद केळकरने त्याच्या सोशल मिडीया अकाऊंट्सवरुन या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला आहे आणि या टीझरमधून शरदच्या लूकची आणि भूमिकेची झलक प्रेक्षकांना पाहायला मिळाली आहे.

Advertisement