News
Typography

एका सामान्य घरातून आलेली मुलगी जी निसर्गाने सजवलेल्या गावात वाढली, हिरव्यागार रानात रमली, नदी काठावर खेळली, शुभ पावलांनी गावात आली आणि सगळ्यांची लाडकी बनली. पण, जिचा हात तिच्या आईने ती लहान असताना सोडला आणि देवाघरी गेली, अशी लक्ष्मी त्याक्षणीच पोरकी झाली. आईच्या नसण्यामुळे लक्ष्मीचं संपूर्ण भावविश्वच बदलून गेलं. परंतु, या परिस्थितीत तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी होती तिची आजी. लक्ष्मीची आजी तिला लहानपणापासून सांगत असे कि, तुझ्या स्वप्नातला राजकुमार नक्की येईल, आणि तुझं आयुष्य प्रेमाने बहरुन टाकेल. तेंव्हापासून लक्ष्मी त्या राजकुमाराची स्वप्न पाहते आहे.

जशी प्रत्येक मुलीची इच्छा असते कि, तिला तिच्या स्वप्नातला राजकुमार मिळावा... आपल्याला आधार देणारा, आपल्यावर जीवापाड प्रेम करणारा व्यक्ती आपल्या आयुष्यात असावा अशी इच्छा लक्ष्मीची देखील आहे. लक्ष्मीला तिचा राजकुमार मिळेल का ? लक्ष्मी जसं तिच्या घरातल्यांवर नि:स्वार्थीपणे प्रेम करते तिला असं नि:स्वार्थी प्रेम कधी मिळेल का ? तर दुसरीकडे मल्हार आणि आरवी हे जोडपं आहे ज्यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. हे दोघेही लवकरच लग्नाच्या पवित्र बंधनामध्ये अडकणार आहेत. जेंव्हा दुसऱ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी लक्ष्मी आणि एकमेकांवर नि:स्वार्थी प्रेम करणारे मल्हार आणि आरवी भेटतील तेंव्हा काय होईल ? हे जाणून घेण्यासाठी बघायला विसरू नका कॅम्स क्लब स्टुडीओ निर्मित “लक्ष्मी सदैव मंगलम्” १४ मेपासून सोम ते शनि संध्या. ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. पहिल्याच मालिकेमधून अवघ्या महाराष्ट्राचे मनं जिंकलेली सुरभी हांडे मालिकेमध्ये आरवीची भूमिका साकारणार आहे. तर ओमप्रकाश शिंदे मल्हार आणि निवोदित समृद्धी केळकर ही लक्ष्मीच्या भूमिकेत दिसणार आहेत.

Laxmi Sadaiva Mangalam Starts 14 May 01

संक्षिप्त कथा

निसर्गासारखी अवखळ, सगळ्यांवर नि:स्वार्थपणे प्रेम करणारी, बिनधास्त, स्वाभिमानी अशी लक्ष्मी. जिला मामाने जरी वाढवले असले तरी देखील त्याच्या नजरेत ती पांढऱ्या पावलांची झाली कारण तिचा जन्म होताच लक्ष्मीची आई जग सोडून गेली. यामुळे गावाला आपलीशी वाटणारी लक्ष्मी घरच्यांसाठी परकीच राहिली. गावामध्ये सगळ्यांचे प्रेम मिळवलेली लक्ष्मी घरामध्ये सगळ्यांची उपेक्षा आणि मामीचा जाच सहन करते आहे. पण, इतकं सगळ सहन करून देखील ती खंबीर आहे, ती रडत बसली नाही. अश्या या निरागस, स्वछंदी लक्ष्मीच्या आयुष्यात मल्हार नावाचा मुलगा अनपेक्षितपणे येतो ज्याच आरवी नावाच्या मुलीवर खुप प्रेम आहे. आरवी डॉक्टर असून मल्हार परदेशी शिकून नुकताच गावी आला आहे जिथे त्यांचा वडिलोपार्जित दुधाचा व्यवसाय आहे. आरवी आणि मल्हार बऱ्याच वर्षांपासून एकमेकांना ओळखत असून लवकरच ते लग्नाच्या बंधनात अडकणार आहेत.

सिमेंट काँक्रीटच्या शहरात प्रेमाला तडे जातात पण अस्सल मातीतल्या प्रेमाचं तसं नसतं. त्याला निसर्गाची जोड असते... आणि त्या हिरव्यागार निसर्गाने बांधलेले बंध तुटता तुटत नाहीत... गावामध्ये काही कामानिमित्त आलेल्या मल्हारची भेट लक्ष्मीशी होते आणि तिथून नियतीचा खेळ सुरु होतो. नियतीने आरवी, मल्हार आणि लक्ष्मी या तिघांसाठी काही वेगळेच लिहून ठेवले आहे. मल्हार आणि लक्ष्मी हे दोघे कुठल्या परीस्थीमुळे एकमेकांना भेटतात ? हे तिघे एकमेकांच्या समोर आले तर काय होईल ? हे बघणे रंजक असणार आहे. आयुष्यभर ओंजळीत निखारे आणि ओठी हसू घेऊन वावरणाऱ्या लक्ष्मीच्या नशिबी मल्हार खरोखर सुखाची चाहूल घेऊन येईल का ? या सगळ्या निरुत्तरित प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहेत.

Laxmi Sadaiva Mangalam Starts 14 May 02

या मालिकेच्या निमित्ताने व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी - वायाकॉम 18 चे निखिल साने म्हणाले, “लक्ष्मी सदैव मंगलम्” मालिकेमध्ये आम्ही नि:स्वार्थी मनाने घरच्यांवर आणि गावावर प्रेम करणाऱ्या लक्ष्मीची गोष्ट दाखवणार आहोत. कलर्स मराठीद्वारे आम्ही नेहेमीच प्रेक्षकांना वेगळ्या धाटणीच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करत असतो. या मालिकेमधून दाखवली जाणारी कथा महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असं मला वाटतं. प्रेक्षकांना या मालिकेची कथा जवळची वाटेल तसेच मालिकेमधील वेगळेपण बघायला नक्कीच आवडेल याची मला खात्री आहे. लक्ष्मी सदैव मंगलम् मालिकेद्वारे ७.०० वाजताचा प्राईमटाईम बँड मजबूत होईल अशी आम्ही आशा करतो”.

आपल्या नव्या मालिकेबद्दल बोलताना राकेश सारंग म्हणाले, “लक्ष्मी सदैव मंगलम्” ही मालिका शहर आणि गावं ह्यांचातला दुरावा कमी करणारी मालिका आहे. शहरातल्या धुसमळत्या प्रेमाला अस्सल ग्रामीण प्रेमाने रंगवणाऱ्या या मालिकेमध्ये आम्ही अतिशय निरागस आणि अवखळ अशा लक्ष्मीचा प्रवास दाखवणार आहोत. मालिकेमध्ये अनुभवी कलाकारांचा संच आणि अनोखी संकल्पना असल्यामुळे ही मालिका नक्कीच प्रेक्षकांना आवडेल अशी मला खात्री वाटते”.

मालिकेबद्दल तसेच भूमिकेविषयी बोलताना सुरभी हांडे म्हणाली,“मी या मालिकेमध्ये आरवी नावाची भूमिका साकारणार आहे जी डॉक्टर आहे. कलर्स मराठीवरील या मालिकेद्वारे मी रसिक प्रेक्षकांना एका नव्या भुमिकेमध्ये भेटायला येणार आहे, जे माझ्यासाठी एक प्रकारचं आव्हानचं आहे. आरवी आयुष्याकडे सकारत्मक दृष्टीने बघणारी मुलगी आहे. आरवीची भाषा, वेशभूषा, कपडे सगळ्यातच वेगळेपण आहे. मी आशा करते कि, प्रेक्षकांचं माझ्या या नव्या भूमिकेला देखील भरभरून प्रेम मिळेल”.

पुढे बोलताना ओमप्रकाश म्हणाला, “मी मालिकेमध्ये मल्हार नावाची भूमिका साकारणार असून मी आधी साकारलेल्या भूमिकेहून ही खूपच वेगळी आहे. मल्हार कोल्हापूर मधील असून त्याच्यासाठी त्याचे कुटुंब आणि आरवी जिच्यावर तो प्रेम करतो हे सर्वकाही आहे. मल्हार अत्यंत प्रेमळ, संवेदनशील, भावूक, मनमिळाऊ असा मुलगा आहे. मालिकेमध्ये आरवीची भूमिका सुरभी साकारत आहे तिचं आणि माझं चांगलं टयुनिंग आहे. ज्याप्रमाणे ही मालिका करताना आम्ही सगळे जण आनंद घेतो आहे त्याचप्रमाणे तुम्हाला देखील ही मालिका बघताना मजा येईलयाची मला खात्री आहे. मी खूपच उत्सुक आहे आणि आतुरतेने १४ मेची वाट बघतो आहे”.

देवावरचा विश्वास आणि वनराईचा आशीर्वाद लक्ष्मीला सगळं देतं गेला... एक जोडपं एकमेकाच्या प्रेमात धुंद ... एक निरागस मुलगी जिच मन स्वछंद ... अशा तीन जीवांच्या नि:स्वार्थ नात्याची गोष्ट... लक्ष्मी सदैव मंगलम् १४ मेपासून सोम ते शनि ७.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

Laxmi Sadaiva Mangalam Starts 14 May 03

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement