News
Typography

गुलमोहर या प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकेमध्ये वेगवेगळ्या सुंदर हृदयस्पर्शी कथा सादर केल्या जातात. प्रेमाला वयाचं बंधन नसतं असं म्हणतात ते अगदीच खरं आहे. प्रेम आणि नातं यांचं हळुवार उलगडणार कोडं म्हणजे गुलमोहर. या मालिकेने आता पर्यंत त्यातील अप्रतिम गोष्टींद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. यावेळी गुलमोहर 'बोक्या' या आगामीकथेतून ९०च्या दशकातील एका मस्तीखोर पण तितक्याच लाघवी व्यक्तिरेखेला उजाळा देणार आहे. बोक्या सातबंडेच्या ५ कथा प्रेक्षकांसाठी सादर केल्या जाणार आहेत.

सुप्रसिद्ध लेखक दिलीप प्रभावळकर ह्यांच्या सिद्धहस्त लिखाणातून तयार झालेल्या अनेक कलाकृतींपैकी एक म्हणजेच बोक्या सातबंडे – ज्याला आपण प्रभावळकर ह्यांचा मिश्कील मानसपुत्र असं सुद्धा म्हणू शकतो. वय वर्ष दहा असलेला हा बोक्या मनाने अतिशय निर्मळ, निरागस आहे, पण वृत्तीने अतिशय धाडसी आणि साहसी आहे. हा व्रात्य आहे. पण ह्याला वांड म्हणता येणार नाही. बोक्या हा खोडकर जरी असला तरी त्याच्या खोड्या ह्या घातक नसतात. गरजू व्यक्तीला मदत करणं हे बोक्या आपलं कर्तव्य समजतो आणि हे सगळं बोक्या अतिशय निस्वार्थीपणे करतो. दुसऱ्यांना मदत करताना कधी कधी बोक्या स्वतः सुद्धा अडकतो. पण शेवटी तो संकटातून बाहेर पडतोच. बोक्याची निरीक्षण शक्ती कमाल आहे. जे इतरांना अजिबातच दिसत नाही ते बोक्याच्या नजरेतून सुटत नाही.

Gulmohar Zee Yuva Bokya Satbande 02

बोक्याच्या बाबतीत त्याच्या घरच्यांची वेगवेगळी मत आहेत. पण बोक्याचा एकंदरीत स्वभाव सगळ्यांना आवडतो. त्याचं वागण कधीतरी आगाऊ वाटत असलं तरी त्यामागे त्याचा हेतू खूप साफ आणि स्वछ असतो. सगळ्यांचा लाडका बोक्या हा आजी साठी तर जणू दुधावरची साय आहे. आपल्या मित्रांसोबत वेगवेगळे उपद्व्याप करणारा बोक्या हा एकंदरीत सगळयांना आवडून जातो.

बोक्या सोबत आपल्या बालपणाला उजाळा देण्यासाठी पाहायला विसरु नका गुलमोहर, प्रत्येक सोमवार आणि मंगळवार रात्री ९.३० वाजता फक्त झी युवा वर!

Gulmohar Zee Yuva Bokya Satbande 03

 

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement