News
Typography

झी युवा वाहिनीवरील लोकप्रिय मालिका फुलपाखरूच्या सेट वर मुसळधार पावसामुळे काल शूटींगला खाडा झाला आणि संपूर्ण टीमला एक अनपेक्षित सुट्टी मिळाली. रविवार पासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झालंय आणि या पावसाचा परिणाम मालिकेच्या चित्रीकरणावर देखील झाला. जोरदार पावसात प्रवास करणे सुरक्षित नसल्यामुळे फुलपाखरूच्या टीमला सुट्टी देण्यात आली.

मालिकांचं चित्रीकरण हे आठवड्यातील ७ ही दिवस १२ -१२ तास चालतं त्यात अशी अनपेक्षित सुट्टी मिळाल्यामुळे फुलपाखरूची टीम सुखावली आणि हा सुट्टीचा दिवस घरी आराम करत घालवावा कि बाहेर पावसाचा आनंद लुटावा या विचारात आहे. नक्कीच दिग्दर्शकासाठी पावसामुळे पुढे ढकललं गेलेलं शूट पूर्ण करणे ही तारेवरची कसरतच असते.

पावसामुळे मिळालेल्या सुट्टी बद्दल अभिनेत्री हृता दुर्गुळे म्हणाली, "मुसळधार पावसामुळे टीम मधील काही लोकं शूटिंगसाठी पोहोचू शकले नाहीत आणि त्यामुळे आम्हाला शूटिंगला सुट्टी देण्यात आली. लहानपणी आपण शाळेत असताना आपल्याला जोरात पाऊस पडला की सुट्टी मिळायची, मालिकेचं शूटिंग करताना तसा ऑप्शन नसतो पण आज अनपेक्षितपणे सुट्टी मिळाली त्यामुळे मी माझ्या घरच्यासोबत आज वेळ घालवणार आहे आणि पावसाचा आनंद घेणार आहे." तसेच अभिनेता यशोमन आपटे म्हणाला, "आजचा मुसळधार पाऊस बघून मला आमच्या मालिकेतील पावसाळ्यात नुकतंच शूट केलेलं गाणं आठवलं. लागोपाठ शूटिंग करत असल्यामुळे अशी अनपेक्षित सुट्टी मिळणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. आज आराम करायचं मी ठरवलंय."

मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, "पावसाळ्यात शूटिंगमध्ये काहीना काही अडथळे येतच असतात, त्यामुळे त्या दृष्टीनं आम्ही पूर्वतयारी केलेली असते. सुट्टीचा दिवस भरून काढण्यासाठी आम्ही वेळ न दवडता वेगाने काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करू."

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement