News
Typography

बिग बॉस मराठी या कार्यक्रमाची धमाकेदार सुरुवात तीन महिन्याआधी कलर्स मराठी वाहिनीवर झाली. कार्यक्रमाच्या घोषणेपासूनच या कार्यक्रमामध्ये कोण कोण असेल, कोण याचे सूत्रसंचालन करेल आणि मुख्य म्हणजे पहिल्या पर्वाचा विजेता कोण असेल याची उत्सुकता शिगेला पोहचली होती. महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीने बिग बॉस या कार्यक्रमाचे मराठमोळं रूपं प्रेक्षकांच्या भेटीस आणले. या पर्वाला प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिला, भरपूर प्रेमं दिले. कार्यक्रम सुरु होताच प्रत्येक सदस्याने प्रेक्षकांची मने जिंकण्यास, त्यांच्या मनामध्ये एक विशेष स्थान मिळविण्यास सुरुवात केली. प्रत्येक घरात, देशाच्या कानाकोपरामध्ये फक्त बिग बॉस मराठीची चर्चा रंगत गेली. आपल्या अस्सल मराठमोळ्या बिग बॉस पहिल्या सिझनमध्ये सदस्य १०० दिवस अनेक कॅमेरांच्या नजरकैदेत राहिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा महाअंतिम सोहळा नुकताच लोणावळा येथे पार पाडला. स्पर्धक आणि प्रेक्षक सगळ्यांनाच माहिती होते विजेता कोणी एकच असणार आहे. आणि शेवटी तो क्षण आला ज्याची वाट संपूर्ण महाराष्ट्र पहात होता, महाराष्ट्राला बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा विजेता मिळाला. मेघा धाडे ठरली बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाची विजेती तर पुष्कर जोगने पटकावले दुसरे स्थान. मेघा धाडेला १८ लाख ६० हजार इतकी धनराशी मिळाली आणि खोपोली येथे Nirvana Leisure Realty सिटी ऑफ म्युझिक कडून एक घर.

Click Here for Megha's Photos with Winner's Trophy

बिग बॉस मराठीच्या घराने पहिल्या दिवसापासून अनेक नाती बनताना बघितली, तर जसे दिवस सरत गेले ती नाती बदलताना, बिघडताना, त्यांच्यामध्ये कटुता येताना बघितले. पण या प्रवासात खुर्ची सम्राट या टास्कमुळे घरामध्ये दोन ग्रुप झाले, त्यानंतर एक ग्रुप शेवट पर्यंत टिकला तर दुसऱ्या ग्रुपला गळती लागली. या घरामध्ये पुरूषांनी कधी दादागिरी केली पण या घरातल्या मुली सगळ्यांना पुरून उरल्या. बिग बॉस मराठीचे घर प्रत्येक सदस्याच्या मागे भक्कमपणे उभे राहिले. या घराने आऊची माया अनुभवली, थत्तेची थत्तेगिरी प्रेक्षकांना खूप आवडली, सुशांतच रडण पाहिलं, मेघाच या घरावरच आणि कार्यक्रमावरच, किचनवरच प्रेम पाहिलं आणि तिची बडबड देखील ऐकली. तसेच राजेशचा अज्ञातव्यास पाहिला, जुईची चीडचीड आणि तक्रारी ऐकल्या, पुष्कर आणि सईची मैत्री पाहिली, पुष्करची टास्क दरम्यानची जिद्द बघितली आणि बघता बघता १८ सदस्यांचा प्रवास ६ जणांवर येऊन पोहचला.

Megha Dhade Winner of Bigg Boss Marathi 02

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाबद्दल बोलताना निखिल साने, व्यवसाय प्रमुख : कलर्स मराठी, कलर्स गुजराती आणि व्हायाकॉम18 मोशन पिक्चर्स प्रादेशिक चित्रपट म्हणाले, “बिग बॉस मराठी या कार्यक्रमाबद्दल अनेक प्रश्न जरी प्रेक्षकांच्या मनामध्ये असले तरीदेखील कुठेतरी एक महत्वाची गोष्ट आमच्या मनामध्ये होती आणि ती म्हणजे या कार्यक्रमातील मराठीपणा टिकवून ठेवणे. स्पर्धकांची निवड देखील ही गोष्ट लक्षात ठेऊनच करण्यात आली होती. बिग बॉस मराठीचे पहिले पर्व संपूर्ण कुटुंबाने एकत्र येऊन रोज बघितले हेच या कार्यक्रमाचे यश आहे तसेच या कार्यक्रमामध्ये अनेक वाद – विवाद झाले, अनेक चर्चा झाल्या, कार्यक्रमाबद्दल अनेक प्रतिक्रिया आल्या हे देखील या कार्यक्रमाला मिळालेले यशच आहे असे मी म्हणेन. कार्यक्रमाच्या अंतिम फेरीमध्ये पोहचलेले पाच स्पर्धक अत्यंत महत्वाचे होते. मेघाने पहिल्यापासूनच अत्यंत जिद्दीने हा खेळ खेळला आणि शेवटी प्रेक्षकांचा कौल तिच्याच बाजूने आला याबद्दल मी आनंदी आहे. बिग बॉस मराठी नंतर काहीतरी वेगळं प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याची इच्छा होती आणि म्हणूनच आम्ही सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाचे दुसरे पर्व घेऊन येत आहोत. या कार्यक्रमाद्वारे तरूण मुलांची गाणारी नवीन पिढी प्रेक्षकांसमोर येणार आहे. आम्हाला खात्री आहे या कार्यक्रमाला देखील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळेल.”

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाबद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, “बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचं पहिलं पर्व अतिशय छानरीत्या पार पडलं, प्रेक्षकांचे भरभरून प्रेम या पर्वाला मिळालं. मेघा, पुष्कर आणि सई यांची तिगडी पुढे जाईल असं मला पहिल्यापासून वाटलं होतं. मेघा अत्यंत हुशार खेळाडू आहे. मेघाकडून कुठली चूक झाली तर तिला माफी मागायला कधीच लाज वाटली नाही, ती प्रेमाने प्रेक्षकांची मने जिंकत गेली, ती या कार्यक्रमामध्ये पूर्ण अभ्यास करून आली होती. मेघाचं हळूहळू प्रेक्षकांबरोबरच नातं खूप भक्कम होतं गेलं आणि तिने विजेतेपद पटकावले असं मी म्हणेन”.

Megha Dhade Winner of Bigg Boss Marathi 03

मेघा धाडे जिने प्रेमानं सगळ्यांच मनं जिंकल आणि जिच्या खेळामध्ये जिद्दीचा कधीच अभाव दिसला नाही जी पूर्ण अभ्यास करून मैदानामध्ये उतरली. कधी प्रेमाने तर कधी तिखट बोलण्याने पण खेळ उत्तमरीत्या खेळत स्वत:चं स्थान टिकवून ठेवलं. रोखठोक बोलण्याने ती नेहेमीच चर्चेत राहिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वामध्ये सदस्य म्हणून जाण्याची संधी तिला मिळाली आणि आता ती या पहिल्या पर्वाची विजेती ठरली त्याबद्दल बोलताना ती म्हणाली, “मी अनेक वर्षांपासून बघितलेले स्वप्न आज पूर्ण झालं त्याचा मला खूप आनंद होतो आहे. कलर्स मराठी आणि इंडेमॉल टीमची मी आभारी आहे कि, त्यांनी मला माझं स्वप्न पूर्ण करण्याची संधी दिली. बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाचा भाग होण्याची संधी मिळाली आणि आता मी हे पर्व जिंकले आहे यावर मला विश्वासच बसत नाहीये. या प्रवासामध्ये मी बऱ्याच गोष्टी शिकली, बरचं काही कमवलं आहे. हे १०० दिवस मी कधीच विसरू शकणार नाही. या प्रवासामध्ये मला तीन जीवाभावाचे मित्र मिळाले पुष्कर, सई आणि शर्मिष्ठा. प्रवास अप्रतिम होता असचं मी म्हणेन”.

बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वाच्या प्रत्येक भागामध्ये झालेल्या टास्कने, वादाने, प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. बिग बॉस मराठी हा कार्यक्रम काही सदस्यांच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला असे म्हंटले तर चुकीचे ठरणार नाही. बिग बॉस मराठी या कार्यक्रमाचा प्रवास संपला असून पुढील आठवड्यामध्ये प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या कार्यक्रमाचा १४ आठवड्यांचा प्रवास फक्त १४ दिवसांमध्ये बघण्याची संधी मिळणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका बिग बॉस मराठी फक्त कलर्स मराठीवर.

Megha Dhade Winner of Bigg Boss Marathi 04

Megha Dhade Winner of Bigg Boss Marathi 05

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement