News
Typography

संगीत हा मराठी रसिकांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपल्या कोणत्याही सण आसवांमध्ये मनाला स्फूर्ती देण्याचं काम संगीत करतं. विविध स्थरातील, वयोगटातील लोकांना एकत्र आणण्याचं काम संगीत करतं. त्यामुळे अशाच निखळ, निरागस आणि सुरांनी भरलेला बहारदार संगीत मैफलीचा अनुभव रसिकांना देण्यासाठी कलर्स मराठीनं आणलं आहे सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर हे नवं पर्व. सेलेब्रिटी गायकांच्या गायकीने पहिलं पर्व गाजल्यानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन शोधून काढलेल्या छोट्या सूरवीरांचं हे पर्व आता रंगणार आहे. महाराष्ट्रातील प्रमुख आठ शहरांमधुन आता तब्बल सहा हजार मुलांमधून निवड झालेल्या ६ ते १५ वयोगटातील बालगायकांची मेगा ऑडिशनची फेरी १३ ऑगस्ट पासून सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. मागील पर्वाप्रमाणेच याही पर्वात आपल्या परिक्षणाने आणि ‘दाद’ देण्याच्या शैलीने, मार्गदर्शनाने प्रेक्षकांची मने जिंकलेले अवधूत गुप्ते, शाल्मली खोलगडे आणि महेश काळे परीक्षकांची भूमिका पार पाडणार आहेत. तर सर्वांची लाडकी अभिनेत्री, कवयित्री स्पृहा जोशी या नव्या कोऱ्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार आहे. तेंव्हा बघायला विसरू नका सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वा. फक्त कलर्स मराठीवर.

सूर नवा ध्यास नवाच्या या छोट्या सूरवीरांच्या पर्वाची घोषणा झाल्यापासूनच त्याबद्दल प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता होती. अनेक वर्षानंतर मराठी वाहिनीवर असं पर्व येत असल्याने ही उत्कंठा शिगेला पोहचली होती. मागील आठवड्यामध्ये सिटी ऑडिशनचे भाग प्रसारित झाल्यानंतर या गोड गळ्यांच्या सूरविरांमधून कुणाची निवड होणार याचे वेध आता प्रेक्षकांना लागले आहेत. येत्या १३ ऑगस्टपासून प्रक्षेपित होणाऱ्या मेगा ऑडिशनमधून याचे उत्तर प्रेक्षकांना मिळणार आहे.

“सूर नवा” कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाबद्दल बोलताना व्यवसाय प्रमुख, कलर्स मराठी, कलर्स गुजराती, वायकॉम18 मोशन पिक्चर्स प्रादेशिक पिक्चर्स निखिल साने म्हणाले की, “ सूर नवा ध्यास नवा कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वाची जेंव्हा सुरुवात केली होती तेंव्हाच असा मनामध्ये विचार आला होता की दुसरे पर्व हे छोट्या सूरवीरांचं असेल. या पर्वाद्वारे आम्हाला नवीन गायकांची पिढी आपल्या महाराष्ट्रासमोर घेऊन येण्याची संधी मिळाली आहे याचा खरच खूप आनंद होतो आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या या मुलांची तयारी वाखाणण्याजोगी आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची गाणी या मंचावर ते सादर करत आहेत हे कौतुकास्पद आहे. त्यामुळे आपल्याकडे असलेला संगीताचा ठेवा आणि पुढची पिढी यात समन्वय साधण्याचा हा कार्यक्रम एक प्रयत्न करणार आहे. मला असं वाटत की, सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर या कार्यक्रमाद्वारे महराष्ट्रातला जो संगीतप्रेमी प्रेक्षक आहे त्यांच्यासमोर आम्ही नक्कीच एक दर्जेदार कार्यक्रम सादर करण्यात यशस्वी होऊ”.

कार्यक्रमाविषयी बोलताना महेश काळे म्हणाले, “तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे नेहेमीच्या आयुष्यामध्ये निरागसता अनुभवणे कठीण झाले आहे. परंतु, सूर नवा ध्यास नवा – छोटे सूरवीर या कार्यक्रमाद्वारे प्रेक्षकांना खूप सुलभ पद्धतीने दर आठवड्यामध्ये ही निरागसता अनुभवयाला मिळणार आहे. आणि ही निरागसता गाण्याच्या स्वरूपात असल्याने ती मनोरंजनात्मक देखील असणार आहे. त्यामुळे तुम्ही हा कार्यक्रम नक्की बघा”.

कार्यक्रमाबद्दल अवधूत गुप्ते म्हणाले, “गेल्या बऱ्याच वर्षांपासून लहान मुलांसाठीचा असा कार्यक्रम मराठी वाहिनीवर आला नाही. या कार्यक्रमाद्वारे लहान मुलांना त्यांच्यातील कला संपूर्ण महाराष्ट्रासमोर सादर करण्यासठी मंच आणि संधी मिळणार आहे. तब्बल पाच हजार मुलांमधून ७० मुलांची निवड केली आहे आणि त्यामधून निवडलेली मुलं त्यांच्यातील कला सादर करण्यासाठी सज्ज आहेत. या सुंदर गायकांमधून एक सूरवीर शोधण्याची खूप मोठी जबाबदारी आमच्यावर सोपावली आहे असे मी म्हणेन. प्रेक्षकांना एक वेगळ्या प्रकारचा अनुभव आणि वेगळा टॅलेंट देण्याचा प्रयत्न आम्ही यावेळेस करू. “सूर नवा” या कार्यक्रमाची संपूर्ण टीम सज्ज आहे इतिहास घडविण्यासाठी”.

कार्यक्रमाच्या या पर्वाबद्दल बोलताना शाल्मली खोलगडे म्हणाली, “मी खूपच उत्सुक आहे... “सूर नवा” कार्यक्रमाचे दुसरे पर्व आम्ही प्रेक्षकांच्या भेटीस आणले आहे. या पर्वाचे खास आकर्षण आहेत लहान मुलं. लहान मुलं खूप निरागस असतात, एखादी गोष्ट लगेच शिकून घेण्याचे कसब त्यांच्याकडे असते, त्यांना कशाचीच भीती नसते आणि हे त्यांच्या गाण्यामध्ये देखील दिसून येते. या पर्वामध्ये प्रेक्षकांना लहान मुलांची सुंदर गाणी ऐकायला मिळतील याची मला खात्री आहे. या कार्यक्रमानिमित्त स्पर्धकांमध्ये आणि त्यांच्या गाण्यामध्ये झालेल्या बदलांचे आम्ही साक्षीदार असणार आहोत. मागील पर्वाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला, हे पर्व देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल अशी मला आशा आहे”.

कार्यक्रमाची सूत्रसंचालक स्पृहा जोशी कार्यक्रमाबद्दल म्हणाली, “मला संगीत खूप आवडतं आणि लहान मुलांमध्ये मी खूप रमते. 'सूर नवा ध्यास नवा' च्या या पर्वामध्ये या दोन्ही गोष्टी साधल्या जाणार आहेत. लहान मुलांना गृहीत धरून चालत नाही. त्यांना प्रत्येक गोष्टीचं नीट लॉजिक द्यावं लागतं. तसंच ती थेट असतात. एखादी गोष्ट आवडली किंवा नाही हे कुठलाही आडपडदा न ठेवता सरळ सांगून टाकतात. त्यामुळे तुम्ही जसे आहात तसेच, खरेखुरे त्यांच्यासमोर गेलात तरच त्यांच्याशी मैत्री करू शकता. ही बच्चेकंपनी आणि प्रेक्षक, परीक्षक यांच्यातला मी दुवा असणार आहे. त्यामुळे मी खूष आहे”.

5 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 5.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement