News
Typography

गेली ४९ वर्षं सिनेप्रेमींचं मनोरंजन करणारे अशोक सराफ यंदा व्यावसायिक क्षेत्रातल्या ५०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. आपल्या एकापेक्षा एक चित्रपटांनी प्रेक्षकांना कधी हसवणाऱ्या तर कधी प्रेक्षकांचा थरकाप उडवणाऱ्या या अवलियाच्या योगदानाला सलाम करत सोनी मराठीने अशोक सराफ सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ४९ वर्षांची कामगिरी लक्षात घेता या सप्ताहाला ‘सम्राट सराफ’ हे नाव देण्यात आलं आहे. ‘सम्राट सराफ’ २४ ते ३० सप्टेंबर असं सप्ताहभर चालणार असून २४ ते २९ सप्टेंबर या कालावधीत रोज दुपारी ३ वाजता अशोक सराफ यांचे ‘नवरी मिळे नवऱ्याला’, ‘आमच्यासारखे आम्हीच’, ‘घायाळ’, ‘आई नं.१’, ‘एकापेक्षा एक’, ‘गुलछडी’ हे चित्रपट प्रेक्षक पाहू शकणार आहेत. पोलिसांच्या संवेदना दर्शवणाऱ्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटानी सप्ताहाची सांगता होणार आहे.

आजपर्यंत प्रेक्षकांसमोर एक तर पोलिसांची लाचखोरी किंवा त्यांचा जाच मांडला गेला आहे; किंवा खूपच धीट अशा पोलिसांची कथा मांडली गेली आहे. मात्र पोलिसांनाही ह्रदय असतं, त्यातही संवेदना असतात, आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींचा परिणाम जसा सामान्य माणसांवर होतो, तसाच तो पोलिसांवरही होतो... समोरच्याचं दु:ख बघून सेंटी होणाऱ्या या पोलिसांची कथा ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटातून समीर पाटील या दिग्दर्शकानी मांडली आहे. आणि मराठी प्रेक्षकांसाठी सुरू झालेल्या सोनी मराठी या नवीन वाहिनीवर या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर होणार आहे.

प्रेक्षकांशी अतूट नातं जोडण्याच्या उद्देशानी सुरू झालेल्या या वाहिनीवर केल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरची सुरुवात, गेली ४९ वर्षं प्रेक्षकांशी अनोखं नातं जपणाऱ्या अशोकमामांच्या ‘शेंटिमेंटल’ या चित्रपटाने होणार आहे. या ४९ वर्षांत अशोक सराफ यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. विनोदाचं अचूक मीटर जपणाऱ्या सराफ यांनी कित्येक संवाद अजरामर केले आहेत. त्यांनी साकारलेल्या भूमिकांसाठी संवादफेक करण्याची त्यांची शैली, आपल्या भूमिकेतलं वेगळेपण दाखवण्यासाठी घेतलेली मेहनत सगळंच अभूतपूर्व. या सगळ्यांचाच परिणाम की काय, आजही दार ठोकल्यावर धनंजय मानेंची आठवण आल्याशिवाय राहत नाही, तर गमतीनी वॉख्खॅ, विख्खी, विख्खू हेही सहज येतं. केवळ विनोदच नाही, तर अशोक यांनी साकारलेला खलनायकही तितकाच ताकदीचा होता.

अभिनेता म्हणून चतुरस्र असणाऱ्या या ‘सम्राट सराफ’च्या चित्रपटांची मजा २४ ते ३० सप्टेंबर अशी सप्ताहभर लुटा आणि पोलिसांची सेंटिबाजू समजून घेण्यासाठी जरूर पाहा ‘शेंटिमेंटल’ चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर दुपारी १ आणि संध्याकाळी ७ वाजता फक्त सोनी मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement