News
Typography

प्रेमाला शब्दाची नाही तर नजरेची भाषा कळते. म्हणूनच मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो असं म्हणतात. प्रेम ही अत्यंत सुंदर आणि हवीहवीशी वाटणारी भावना आहे. बऱ्याच जणांना मैत्रीत प्रेमं गवसतं, तर काहींना एका नजरेत, पण काहींच्या बाबतीत मनं जुळायला एक क्षणही पुरेसा असतो. आयुष्य आणि क्षणाचं नातं हे खूप जवळच आहे. एक क्षण आयुष्याला अर्थ देतो... क्षणात नाती जोडली जातात, क्षणात आयुष्य बहरत, क्षणात जीव जडतो... परीस जसं लोखंडाचं सोनं करतो तसच मनं जुळवणारा हा एक क्षण आयुष्याचं सोनं करतो. हा क्षण माणसाच्या आयुष्यभर लक्षात रहातो. या क्षणामध्ये असीम किमया असते ज्यामुळे आपण क्षणार्धात व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि संपूर्ण आयुष्य बदलून जातं.

असचं काहीसं अनु आणि सिध्दार्थच्या बाबतीत देखील आहे. कोणता क्षण अनु आणि सिध्दार्थ एकत्र आणणार ? तो क्षण कधी येणार ? हे बघणं उत्सुकतेचे असणार आहे. अशी कोणती गोष्ट आहे ज्यामुळे यांच्या नात्याला एक नवी कलाटणी मिळणार आहे हे प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे. प्रेमाची व्याख्या बदलणारी कथा सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर. मधुगंधा कुलकर्णी यांनी लिहिलेल्या या कथेची निर्मिती केली आहे मंदार देवस्थळी यांच्या टीमवर्क अल्ट्रा क्रिएशनने. जुई म्हणून प्रेक्षकांची मनं जिंकणारी मृणाल दुसानीस अनुची तर सिद्धार्थची भूमिका शशांक केतकर साकारणार आहे. या मालिकेमधून पहिल्यांदाच मृणाल आणि शशांकची जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मालिकेमध्ये वंदना गुप्ते, प्रदीप पटवर्धन, नयना आपटे, शर्मिष्ठा राउत हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

मध्यमवर्ग कुटुंबामधली अनुश्री ही अत्यंत स्वाभिमानी आणि स्वावलंबी मुलगी आहे, जिचं आपल्या कुटुंबावर जीवापाड प्रेमं आहे. अनुश्री सगळ्या घराचा भार स्वत:च्या खांद्यावर घेऊन कुटुंबाचा सांभाळ हसतमुखानं करते आहे. “जेंव्हा परिस्थिती बदलता येत नाही, तेंव्हा मनस्थिती बदलावी” असे अनुचे आयुष्या बद्दलचे मत आहे. दुसऱ्या बाजूला सिध्दार्थ तत्ववादी हा गर्भश्रीमंत आणि उच्चभ्रू घरामधला, कर्तृत्ववान आणि आईवर प्रचंड प्रेम करणारा मुलगा आहे. सिध्दार्थच्या घरामध्ये त्याच्या लग्नाची चर्चा सुरु आहे, परंतु आजवर त्याला कोणतीच मुलगी आवडलेली नाही. अनु आणि सिध्दार्थचं भावविश्व खूप वेगळं आहे, लग्नाबद्दल या दोघांचही मत वेगळं आहे. जेंव्हा ही दोन वेगळी माणसं एकमेकांना भेटतील तेंव्हा काय होईल ? त्यांची मनं कशी जुळतील ? हा प्रवास बघणं रंजक असणार आहे.

Watch Title Track Here

या मालिकेच्या निमित्ताने प्रमुख, कलर्स मराठी - वायकॉम 18 चे निखिल साने म्हणाले, “आजच्या धकाधकीच्या जीवानात जिथे जगण्याचा वेग आणि व्याख्या बदलत चालल्या आहेत तिथे प्रेमाची मूळ व्याख्या आजही तीच आहे. मनं जुळण्यासाठी एक क्षणही पुरेसा असतो आणि तो क्षणच आयुष्य पूर्णपणे बदलतो हे आम्ही या मालिकेद्वारे अधोरेखित करणार आहोत. नायिकेचा संघर्ष आणि त्याला मिळणारी नायकाची खंबीर साथ हे सुखाच्या सरींनी... हे मन बावरे या मालिकेमधून प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या मालिकेद्वारे मृणाल दुसानीस आणि शशांक केतकरची यांची जोडी प्रेक्षकांच्या भेटीस पहिल्यांदाच येणार आहे. उत्तम कलाकार, दर्जेदार लिखाण आणि दिग्दर्शन यामुळे मालिका नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस पडेल अशी आम्हाला आशा आहे.”

कथेच्या लेखिका मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “सुखाच्या सरींनी... हे मन बावरे” ही अनु आणि सिद्धार्थची एक सुंदर प्रेमकहाणी आहे. प्रत्येकासाठी एक खास व्यक्ती या जगात असते. पण, ही खास व्यक्ती कधीच सूचना देऊन आयुष्यात येत नाही. ती व्यक्ती आपल्या ध्यानीमनी नसताना अचानक भेटते आणि आपलं आयुष्य बदलून टाकते. असचं काहीसं अनु आणि सिध्दार्थच्या आयुष्यात घडणार आहे. दोन परस्परविरोधी माणसांना नियती एकत्र आणते आणि त्यांची एक सुंदर प्रेमकहाणी सुरु होते. आम्हाला खात्री आहे ही वेगळी प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल”.

मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी म्हणाले, “अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा या मालिकेद्वारे मला कलर्स मराठीसोबत काम करण्याची संधी मिळाली याचा खूप आनंद आहे. “सुखाच्या सरींनी... हे मन बावरे” ही खूप वेगळी प्रेमकथा आहे. या कथेद्वारे आम्ही प्रेमकथा एका वेगळ्या प्रकारे आणि वेगळ्या दृष्टीकोनातून सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे. प्रेमाला अनेक पैलू असतात आणि त्यातलाच एक पैलू प्रेक्षकांसमोर मांडण्याचे आव्हान आम्ही या मालिकेद्वारे स्वीकारले आहे”.

He Mann Baavre New Serial Soon

आपल्या कमबॅक बद्दल बोलताना मृणाल दुसानीस म्हणाली, “जवळपास एका वर्षांनंतर पुन्हा एकदा या मालिकेद्वारे मी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मी खूप खुश आहे. कारण सुध्दा तसचं आहे कलर्स मराठी ही वाहिनी, मंदार देवस्थळी यांचं दिग्दर्शन आणि मधुगंधाचं लिखाण इतकी सुंदर संधी सोडू नये असं मला वाटलं. शशांक आणि माझी जोडी प्रेक्षकांना आवडेल याची खात्री आहे. प्रेक्षकांच्या शुभेच्छा मालिकेला आणि आमच्या सगळ्या टिमला असू दे इतकचं सांगेन”.

भूमिकेबद्दल बोलताना शशांक केतकर म्हणाला, “मी खूप खुश आहे कारण पुन्हा एकदा मी कलर्स मराठीवर मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. पुन्हा एकदा असं मी म्हणालो कारणं माझी पहिली मालिका याच वाहिनीवर होती आणि त्याचा दिग्दर्शक मंदार देवस्थळी होतो. मृणाल दुसानीस ही लोकप्रिय अभिनेत्री आणि वंदना ताई या ज्येष्ठ अभिनेत्री माझ्यासोबत मालिकेमध्ये आहेत याचबरोबर संपूर्ण टीम कमाल आहे. नेहेमी सारखचं प्रेक्षकांचं प्रेम मला मिळेल अशी आशा करतो”.

प्रेम माणसाला बदलत, घडवत आणि बरचं काही शिकवतं देखील. प्रेमानं सगळं काही बदलून जातं, सगळी गणित, संपूर्ण आयुष्य... तरीही प्रेम ही हवीहवीशी वाटणारी भावना आहे. सुखाच्या सरींनी चिंब चिंब भिजलेले हे मन बावरे प्रत्येकालाच नव्याने प्रेमात पाडणारे आहे. तेंव्हा बघायला विसरू अनु आणि सिध्दार्थची एक वेगळी प्रेमकथा सुखाच्या सरींनी... हे मन बावरे ९ ऑक्टोबर पासून रात्री ८.०० वा. फक्त कलर्स मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement