News
Typography

झी युवाने अवघ्या २ वर्षांच्या कालावधीतच वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. वेगवेगळ्या विषयांना हात घालणाऱ्या कथा आणि त्यांच्या सादरीकरणातील नावीन्य यामुळे झी युवा या वाहिनीने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. झी युवा लवकरच आपल्या लाडक्या प्रेक्षकांसाठी 'वर्तुळ' ही नवी मालिका सादर करणार आहे. नावाप्रमाणेच ही मालिका आयुष्याचं वर्तुळ दर्शवणारी आहे. तसेच ही मालिका एक फॅमेली सस्पेन्स आहे. ही मालिका नोव्हेंबर महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मालिकेचं कथानक अगदी रंजक असून, ही कथा मीनाक्षी नावाच्या एका अनाथ मुलीची आहे, जिचा भूतकाळ तिच्या भविष्यकाळात डोकावतोय. नुकतंच या मालिकेचा प्रोमो रिलीज झाला. जुई गडकरी बऱ्याच काळानंतर मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. जुई मीनाक्षीची भूमिका साकारणार आहे. तर अभिजित परांजपे हा कथेचा नायक आहे ज्याची भूमिका विकास पाटील साकारणार आहे. मिनाक्षी आणि अभिजितची भेट अपघाताने होते. मीनाक्षीने तिच्या भूतकाळातील काही गोष्टी तिच्या मनात दडवून ठेवल्या आहेत. तिचा भूतकाळ अशा काही प्रकारे तिच्यासमोर येतो कि मीनाक्षीच्या पायाखालची जमीन सरकते. अभिजीत सोबत निर्माण झालेल्या विश्वासाच्या नात्याला मिनाक्षीच्या भूतकाळाने तडा जाणार का? त्यांचं नातं टिकून राहणार का?

मीनाक्षीचा भूतकाळ नक्की काय आहे? ती सगळ्यांपासून काय लपवतेय? याचा उलगडा लवकरच झी युवा वाहिनीवर होणार आहे. वर्तुळ ही मालिका १९ नोव्हेंबर पासून रात्री ९.०० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)