News
Typography

स्टार प्रवाहच्या कलाकारांनी दिवाळीच्या शुभेच्छा देत काही खास आठवणी शेअर केल्या.

हरीश दुधाडे – (किल्ले बनवण्यात रमायचो मी...)

स्टार प्रवाहवरील ‘नकळत सारे घडले’ मालिकेतील प्रतापराव म्हणजेच हरीश दुधाडेने दिवाळीची आठवण शेअर केलीय. दिवाळीमध्ये किल्ला बनवणं ही खास आठवण असल्याचं तो सांगतो. मी आणि माझा भाऊ लहान असताना दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या की किल्ला बनवायला घ्यायचो. छत्रपती शिवाजी महाराज दसऱ्यानंतर नवी मोहिम सुरु करायचे त्याचं प्रतिक म्हणून किल्ला बनवण्याची प्रथा आहे. कामाच्या निमित्ताने मुंबईला शिफ्ट झाल्यानंतर किल्ला बनवणं शक्य झालं नाही. पण आजही अंगणभर मातीने माखून किल्ला बनवणं ही गोड आठवण आहे. यासोबतच दिवाळीचा फराळ म्हणजे सर्वांच्याच आवडीचा विषय. गोड-धोड खाण्याची संधी हा सण देत असतो. मला फराळामध्ये शंकरपाळे विशेष आवडतात. चहासोबत शंकरपाळे खाण्याची मजा काही औरच.

यंदाची दिवाळी माझ्यासाठी खास यासाठी आहे कारण मी राहत्या घराचा कायापालट करवून घेतलाय. इंटिरिअर बदलल्यामुळे घरात नवी ऊर्जा जाणवू लागलीय. याच नव्या ऊर्जेसोबत मी नव्या कामांचा शुभारंभ करणार आहे.

Harish Dudhade

नुपूर परुळेकर - (दिव्यांच्या रोषणाईत हरवलेला तो दिवस)

स्टार प्रवाहवरील नकळत सारे घडले मालिकेतील नेहा म्हणजेच नुपूर परुळेकरने दिवाळीची खास आठवण सांगितलीय. मी माझी आई आणि माझे बाबा असं आमचं खुप छोटंस कुटुंब आहे. मला आठवतंय एकदा दिवाळीच्या दिवशी रात्री माझे बाबा मला बाईकवरुन घेऊन निघाले. कुठे जायचं हे काहीच ठरलं नसल्यामुळे माझ्या मनात खुप प्रश्न होते. बाबांनी त्यादिवशी मला मुंबईदर्शन घडवलं तेही मध्यरात्री. दिवसभर फटाके वाजवून अख्खी मुंबई निद्रावस्थेत असताना मी आणि माझे बाबा बाईकवरुन फिरत होतो. दिव्यांच्या रोषणाईत झगमगणारी मुंबई मी त्यादिवशी अनुभवली. दिवाळीचा अर्थ म्हणजे फक्त फटाके वाजवून प्रदुषण करणे नव्हे तर दिव्यांच्या उजेडाने अंधाराला प्रकाशात विलीन करणं हा सुद्धा आहे हा कानमंत्र त्यादिवशी मला माझ्या बाबांनी दिला. दिवाळीचा तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही.

Nupur Parulekar

एकता लब्दे - (वृद्धाश्रमात जाऊन साजरी करणार दिवाळी)

‘विठुमाऊली’ मालिकेतील रखुमाई म्हणजेच एकता लब्देचा आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या पहिल्या दिवशी सहकुटुंब सिद्धीविनायकाचं दर्शन घेणं हे मी नित्यनेमाने करते. दिवाळीची चाहूल लागली की घरातल्या साफसफाईपासून ते अगदी फराळापर्यंत प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग असायचा. शूटिंगमुळे आता ते शक्य होत नाही. पण यंदाच्या दिवाळीत वर्षभरात न भेटलेल्या माझ्या नातेवाईकांना आणि मित्रमंडळींना मी आवर्जून भेटणार आहे. तसंच यावर्षी एका वृद्धाश्रमाला भेट देण्याची माझी इच्छा आहे. माझ्याकडून त्यांना शक्य तितकी मदत करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

Ekta Labde

अजिंक्य राऊत - (दिवाळी म्हण्टलं की आठवतात पाटोदा लाडू)

विठुमाऊली म्हणजेच अजिंक्य राऊतसाठी दिवाळी हा फक्त सण नाही तर समृद्ध करणारा अनुभव आहे. उटणं, अभ्यंगस्नान, फराळ, दिव्यांची रोषणाई आणि आप्तेंष्टांची भेट या साऱ्या गोष्टी माझ्यासाठी खुपच स्पेशल आहेत. दिवाळी म्हण्टलं की मला आठवतात ते आजीच्या हातचे पाटोदा लाडू. लाडूचं नाव जितकं इण्टरेस्टिंग आहे तितकीच त्याची चवही. माझं आजोळ बीडचं. बीडमध्ये पाटोदा नावाचं एक छोटंस गाव आहे. त्याच गावाच्या नावावरुन लाडुंना पाटोदा लाडू हे नाव पडलं. आजीने बनवलेल्या लाडुंची चव अजूनही माझ्या जीभेवर रेंगाळते आहे. यंदा आजीला महिनाभर आधीच लाडू बनवण्याची खास फर्माईश केलीय. त्यामुळे भरपूर लाडू फस्त करणे हा माझा यंदाच्या दिवाळीचा अजेंडा आहे. शिवाय यावर्षी मी पहिल्यांदाच दिवाळी पहाटचा कार्यक्रम जवळून अनुभवणार आहे. डोंबिवलीच्या फडके रोड इथल्या दिवाळी पहाट कार्यक्रमासाठी मी जाणार आहे. विठुमाऊली मालिकेच्या निमित्ताने ही संधी मिळणार आहे आणि प्रेक्षकांना विठुमाऊलीचं दर्शन घेण्याचं निमित्त. त्यामुळे मी खुपच एक्सायटेड आहे. दिवाळी गीतं, दिव्यांच्या रोषणाईत झगमगून निघालेला आसमंत आणि चाहत्यांची अमाप गर्दी अश्या भारावलेल्या वातावरणात मी यंदा माझी दिवाळी सेलिब्रेट करणार आहे.

Ajinkya Raut

संकेत पाठक – (चकलीचे भन्नाट प्रयोग करुन पाहिलेत)

‘छत्रीवाली’ मालिकेतील विक्रम म्हणजेच संकेत पाठकसाठी दिवाळी म्हणजे फराळाची रेलचेल आणि खूप सारं शॉपिंग. लहानपणी नवे कपडे मिळण्याचे वर्षातले दोन हक्काचे दिवस म्हणजे दिवाळी आणि वाढदिवस. त्यामुळे दिवाळी या सणाचं विशेष महत्व आहे. आता मनात येईल तेव्हा शॉपिंग करता येतं. पण लहानपणी नव्या कपड्यांसाठी दिवाळीची वाट पहावी लागे. फराळामध्ये मला चकली खूप आवडते. खायला आणि करायला देखिल. क्रिस्पी चकली, त्रिकोणी आणि चौकोनी चकली असे बरेच वेगवेगळे प्रकार मी बनवले आहेत. यंदाही चकलीचा असाच एक भन्नाट प्रयोग करण्याचा माझा प्रयत्न असेल.

Sanket Pathak

नम्रता प्रधान – (पहिला पगार आणि दिवाळी)

‘छत्रीवाली’ मालिकेतील मधुरा म्हणजेच नम्रताला पहिल्या पगारातून दिवाळीसाठी घेतलेल्या खास भेटवस्तू आठवतात. पहिल्या पगाराची आठवण आपल्या प्रत्येकाच्याच मनात कायम जपलेली असते. माझ्यासाठी ही आठवण खुपच खास आहे कारण माझा पहिला पगार दिवाळीतच झाला होता. त्यामुळे सर्व पैसे मी शॉपिंगवरच खर्च केले होते. यंदाही माझ्या संपूर्ण फॅमिलीसाठी खूप सारं शॉपिंग करणार आहे आणि माझ्यासाठी नवा मोबाईल खरेदी करणार आहे.

Namrata Pradhan

संग्राम समेळ – (लग्नानंतरचा पहिलाच दिवाळ सण)

‘ललित २०५’ मालिकेतील नील म्हणजेच संग्राम समेळसाठी यंदाची दिवाळी खुपच स्पेशल आहे. त्याच्या लग्नाला यंदा २ वर्ष पूर्ण होत आहेत. गेल्यावर्षी त्याची पत्नी म्हणजेच पल्लवी प्रधान दिवाळीमध्ये शूटिंगसाठी बाहेरगावी होती. त्यामुळे दिवाळीचं सेलिब्रेशन एकत्र करता आलं नाही. यंदा मात्र संग्राम लग्नानंतरची पहिलीच दिवाळी सेलिब्रेट करणार आहे. पल्लवीसाठी खास गिफ्टही घेणार आहे. बालपणीची दिवाळीची एक खास आठवण संग्रामने आवर्जून सांगितलीय. लहानपणी दिवाळीच्या सुट्टीत तो वाड्याला त्याच्या आजीकडे जात असे. सणांमागचं खरं महत्त्व आणि आजी-आजोबांनी लहानपणी केलेले संस्कार आयुष्यभर मनावर कोरले गेले असल्याचं संग्रामने सांगितलं.

Sangram Samel

अमृता पवार – (मित्रमैत्रीणींची भेट आणि देवाचा आशीर्वाद)

‘ललित २०५’ मधली भैरवी म्हणजेच अमृता वर्ष गेली वर्षानुवर्ष दिवाळीत एक परंपरा कायम जोपासते आहे ती म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवशी मित्रपरिवारासोबत पार्लेश्वर मंदिरात जाऊन देवाचं दर्शन घेणं. शाळेत असल्यापासून सुरु असलेल्या या प्रथेत अद्याप खंड पडलेला नाही. त्यानिमित्ताने मित्रमैत्रीणींची भेटही होते. मला स्वयंपाकाची फारशी आवड नाही मात्र फराळ करायला खुप आवडतं. आईला आवर्जून मदत करते. यंदा ‘ललित २०५’मुळे आणखी एक हक्काचं कुटुंब मिळालंय त्यामुळे सेटवरही दिवाळीचं जोरदार सेलिब्रेशन करणार आहे.

Amruta Pawar

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)