News
Typography

राजकन्या म्हटंलं की डोळ्यासमोर उभी राहते ती परीकथा आणि परिकथेतील 'ती' राजकन्या. मात्र सोनी मराठीवर नुकताच लाँच झालेल्या प्रोमोमधून तुमच्या-आमच्या सारखीच साधी, मध्यमवर्गीय मुलगी राजकुमारी म्हणून डोळ्यासमोर येते. तिचं विश्व कसं असेल याच वर्णन करताना तिच्या बाबांनी म्हटलेली कविता, त्यांच्या साठी ती राजकन्याच आहे, हे स्पष्ट दिसून येतं. असं असलं तरी बाबांच्या या राजकन्येच्या वाटेत कितीतरी अडथळे आहेत. डोळ्यात डॉक्टर होऊन समाजसेवा करण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या या राजकन्येच्या हाती सफेद डॉक्टरी कोटाऐवजी पोलिसांची खाकी वर्दी आली आहे.

खाकी वर्दीतल्या या राजकन्येचं आयुष्य ११ मार्चपासून प्रेक्षकांसमोर उलगडणार आहे. याची पत्रकार परिषद नुकतीच मुंबईत पार पडली. यावेळी बाबांची राजकन्या अवनी म्हणजेच किरण ढाणे, बाबांच्या भूमिकेत दिसणारे किशोर कदम ही प्रमुख पात्रं, सोनी मराठीचे बिझनेस हेड अजय भाळवणकर, मालिकेचे निर्माते - कोठारे व्हिजन चे महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि या मालिकेच्या टायटल ट्रॅक ची उत्तम सांगड घालणारे अशोक पत्की त्याबरोबरच याचं शीर्षकगीत लिहिणाऱ्या अश्विनी शेंडे उपस्थित होते. या सगळ्यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली.

Ek Hoti Rajkanya New Serial 01

२१ व्या शतकातल्या त्या प्रत्येक स्त्री चं प्रतिनिधीत्त्व करणाऱ्या अवनीने बाबांचं छत्र डोक्यावरून निसटल्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. आई आणि भावाची काळजी घेताना ती कुठेही अपुरी पडत नाही. बाबांच्या या राजकन्येचा खडतर प्रवास कधी संपणार आणि तिच्या बाबांनी कवितेत म्हटल्याप्रमाणे तिला लाखो सलाम कधी आणि कसे छळणार हे हळूहळू मालिकेतून उलगडत जाणार आहे. या मालिकेचं कथानक आणि विषयाबरोबरच शीर्षकगीत हे या मालिकेचं अजून एक वैशिष्ट्य आहे. हे शीर्षकगीत अश्विनी शेंडे यांनी लिहिलं असून त्याला देवकी पंडित आणि अजय पुरकर यांनी आवाज दिला आहे तर एकापेक्षा एक सुरेल गीतांनी मालिकाविश्व समृध्द करणाऱ्या अशोक पत्की यांचं संगीत याला लाभलं आहे. या मालिकेच्या शीर्षकगीताच्या निमित्ताने बऱ्याच दिवसांनी जमलेली देवकी पंडित आणि अशोक पत्की यांच्या संगीताची मैफल प्रेक्षकांना सुखावणारी ठरणार आहे.

‘एक होती राजकन्या’ असा बाबांच्या कवितेतून होणारा या राजकन्येचा उल्लेख आणि राजकुमाराच्या भेटीने होणारा शेवट, या प्रवासाचे साक्षीदार तुम्हीही व्हा येत्या ११ मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७:३० वाजता फक्त सोनी मराठीवर.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement