News
Typography

स्टार प्रवाहच्या कलाकारांनी प्रेक्षकांना होळी आणि धुळवडीच्या शुभेच्छा देत काही खास आठवणी शेअर केल्या आहेत.

Bhargavi Chirmuley

भार्गवी चिरमुले

माझी नवी मालिका ‘मोलकरीण बाई’ येत्या २५ मार्चपासून स्टार प्रवाहवर सुरु होणार आहे. त्यामुळे उत्सुकता आहेच. मालिकेत आम्ही धुळवडीचा खास सिक्वेन्स शूट केलाय. यानिमित्ताने बऱ्याच वर्षांनी मी रंग खेळले. खूप मजा आली. हा धमाकेदार सीन लवकरच मालिकेत पाहायला मिळेल. आनंद हा शोधण्यात असतो त्यामुळे पर्यावरणाची हानी होणार नाही आणि मुक्या प्राण्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेत सण साजरे व्हायला हवेत असं मला वाटतं.

Ashutosh Kulkarni

आशुतोष कुलकर्णी

मी मुळचा पुण्याचा. होलीका दहनानंतर पाचव्या दिवशी येणारी रंगपंचमी आम्ही साजरी करायचो. कॉलेजच्या मित्रांसोबत तेव्हा रंग, पिचकारी आणून मी दणक्यात हा सण साजरा केलाय. आता तसं सेलिब्रेशन करणं जमत नाही. मालिकेच्या निमित्ताने दरवर्षी सेटवरच रंगपंचमी साजरी होते. पण होळीची पूजा मात्र मी दरवर्षी न चुकता करतो. सणाच्या निमित्ताने केल्या जाणाऱ्या गोडाधोडाचा आस्वादही घेतो.

Gaurav Ghatnekar

गौरव घाटणेकर

होळी आणि धुळवडीच्या माझ्या खुपच खास आठवणी आहेत. शाळेत असताना अगदी शाई फेकण्यापासून या सेलिब्रेशनला सुरुवात व्हायची. आईच्या हातची गरमागरम पुरणपोळीवर ताव मारत मी हा सण साजरा करायचो. आता पर्यावरण पुरक सण साजरा करण्याकडे माझा कल असतो. यंदा ‘ललित २०५’ च्या सेटवर मी धुळवडीची सगळी हौस भागवून घेतलीय. सलग ३ दिवस आम्ही सीनच्या निमित्ताने सेटवर होळी साजरी केली. ही खास आठवण मी कधीच विसरु शकत नाही.

Amruta Pawar

अमृता पवार

मी मुळची कोकणातली. त्यामुळे दरवर्षी कोकणातल्या शिमगोत्सवाला आवर्जून जायचे. यंदा शूटिंगमुळे जाणं होणार नाही. पण गावात साजरा केला जाणारा हा सण खुपच स्पेशल आहे. पारंपरिक पद्धतीने बांधली जाणारी होळी, त्यानिमित्ताने नातेवाईकांच्या होणाऱ्या भेटीगाठी आणि खास म्हणजे कोकणात घरोघरी येणारी देवाची पालखी हा माहोल भारावून टाकणारा असतो. यंदा ललित २०५ च्या कुटुंबासोबत सेटवरची धुळवड मी एन्जॉय केलीय.

Ashwini Kasar

अश्विनी कासार

मी मुळची बदलापूरची. एकत्र कुटुंबात वाढलेली. त्यामुळे आम्ही सगळे मिळून अंगणात होळी बांधायचो आणि आजही ही प्रथा अखंड सुरु आहे. माझी आजी होळीसाठी द्राक्षापासून दागिने बनवायची. आम्हा मुलांसाठीही बत्ताश्याचे दागिने तयार करायची. त्या दागिन्यांची चव अजूनही जीभेवर रेंगाळते आहे. धुळवडही आम्ही एकत्र खेळायचो. यादिवशी किचनचा संपूर्ण ताबा घरातल्या पुरुष मंडळींकडे असतो. गरमागरम भजी आणि वड्यांचा बेत धुळवडीच्या निमित्ताने दरवर्षी आखला जातो. यंदा ‘मोलकरीण बाई’च्या सेटवर आम्ही धुळवड खेळलो.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement