‘अगं आज घरकाम करणाऱ्या बाई आल्याच नाहीत, माझं संपूर्ण दिवसाचं वेळापत्रकच कोलमडलं... खरंच गं माझ्या घरकाम करणाऱ्या मावशी आहेत म्हणून तर ऑफिसची कामं मी निश्चिंत मनाने करु शकते. हे आणि असे अनेक संवाद आपल्या नेहमी कानावर पडत असतात. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजांसोबतच घरकाम करणारी बाई ही नोकरदार स्त्रियांच्या आयुष्यातली महत्त्वाची व्यक्ती आहे. जिच्या असण्याने आयुष्य जितकं सुखकर होतं तितकंच तिच्या नसण्याने अस्ताव्यस्त. कधी ती असते ताई, कधी मावशी, कधी काकू तर कधी नुसतीच बाई. कुटुंबातली सदस्य नसली तरी कुटुंबातलाच एक अविभाज्य भाग. आपल्या आयुष्यातल्या याच महत्त्वाच्या व्यक्तीची गोष्ट सांगणारी ‘मोलकरीण बाई’ ही मालिका लवकरच ‘स्टार प्रवाह’ या वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. २५ मार्चपासून सायंकाळी ६.३० वाजता ही नवी मालिका आपल्या भेटीला येईल.

महाराष्ट्रातील लोककलांच्या भरजरी परंपरेला पुन्हा झळाळी देण्यासाठी कलर्स मराठी वाहिनी "एकदम कडक” हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन आली. या कार्यक्रमामध्ये महाराष्ट्रातील विविध भागातील लोककलाकार आपली कला सादर करत आहेत. त्यांच्या जोडीला आहेत प्रसिद्ध विनोदवीर ज्यांची खुशखुशीत विनोदशैली, अतरंगी पात्रं, खुमासदार विनोदांची मेजवानी प्रेक्षकांचे तुफान मनोरंजन करत आहेत. एकदम कडकच्या येत्या आठवड्यामधील भागामध्ये रंगणार आहे सामना ढोलकी – घुंगरू, काव्य आणि कव्वाली मध्ये. प्रेक्षकांना काही खास परफॉर्मन्स बघायला मिळणार आहेत. शास्त्रीय गायन, भजन, धम्माल स्कीट अशी मनोरंजनाची पर्वणी “एकदम कडक” या कार्यक्रमाच्या पुढील आठवड्यामधील भागांमध्ये बघायला मिळणार आहे. तेंव्हा नक्की बघा “एकदम कडक” सोम ते बुध रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

नवऱ्याने पत्नीसाठी कधीही साडी खरेदी केली नाही, की कधी कुठला दागिना आणला नाही. तरीही पत्नी म्हणत असेल "नवरा असावा तर असा" किंवा जन्मोजन्मी हाच नवरा हवा तर ती स्त्री कुणी सामान्य स्त्री नसते, तर ती असते एक असामान्य व्यक्ती. आणि ते दाम्पत्य असतं, समाजसेवेचं व्रत हाती घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे. तीनशे पंच्याहत्तर भागांचा टप्पा पार केल्यानंतर कलर्स मराठी वरील "नवरा असावा तर असा" कार्यक्रमाच्या विशेष भागात या व्रतस्थ दाम्पत्याची भेट घडणार आहे. आणि या असामान्य जोडीची असामान्य संसारगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे.

आपल्या सभोवताली ज्या गोष्टी घडतात, त्यातून आपण नेमकं काय घेतलं पाहिजे आणि काय नाही, तसेच स्वत:ला कसे जपावे आणि वेळोवेळी बोलून कसं व्यक्त व्हावं हे आतापर्यंत सोनी मराठी वरील ‘ह.म.बने तु.म.बने’ मालिकेतून दाखवण्यात आले आहे. सर्वात महत्त्वाचा विषय जो आपल्या पाल्याच्या हितासाठी आहे, असा विषय या मालिकेत दाखवणार आहे आणि तो विषय म्हणजे ‘चांगला आणि वाईट स्पर्श कसा ओळखावा’.

‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेतून प्रेक्षकांना विठुरायाच्या विविध रुपांचं दर्शन घडत असतं. कृष्ण, महादेव, धनगर, वृद्ध अश्या वेगवेगळ्या रुपांमध्ये विठुमाऊलीचं दर्शन घडल्यानंतर आता लवकरच विठुरायाचा नरसिंह अवतार मालिकेत पाहायला मिळणार आहे. कलीयुगातही विठ्ठल नामाचा गजर अखंड सुरु राहावा यासाठी पुंडलिकाने मंदिर बांधण्याचं कार्य हाती घेतलंय. पुंडलिकाच्या या प्रवासात बरीच आव्हानं आहेत. सत्ययुग, त्रेतायुग आणि द्वापारयुगातल्या तीन विशेष घटकांपासून पुंडलिकाला विठ्ठलाचं मंदिर उभारायचं आहे. पुंडलिकाला त्याच्या ध्येयपूर्तीचा मार्ग दाखवण्यासाठी विठुरायाने नरसिंह अवतार धारण केलाय. भक्ताला योग्य दिशा दाखवण्यासाठी भगवंत कोणत्या ना कोणत्या रुपात प्रकट होत असतो असा मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न ‘विठुमाऊली’ या मालिकेतून करण्यात येतोय.

श्रीमंत घराणं असलेलं देशमुख कुटुंब कसं आहे, किती भिन्न स्वभावाचे व्यक्ती त्या कुटुंबात राहतात याची कल्पना प्रेक्षकांना आलीच आहे. मंजूच्या बाबतीत देशमुख कुटुंबांनी प्रत्येकवेळी अडचणी उभ्या केल्या, तिला कमी लेखलं, तिचा अपमान केला. याविषयी नाराजी आणि राग मंजूच्या मनात नक्कीच असणार. आता या मालिकेत अशा एका नवीन व्यक्तीची एण्ट्री होणार आहे ज्याला श्रीमंत, भांडवलशाही वृत्तीच्या माणसांबद्दल अतिशय तिटकारा आहे आणि विशेष करुन देशमुख कुटुंबाबद्दल प्रचंड संतापही आहे आणि ती व्यक्ती म्हणजे ‘जगदीश महापात्रे’.

Advertisement