Title Song
Typography

मालिकेचं शीर्षक गीत हे त्या मालिकेची ओळख असते. रेवती आणि श्रीधर यांच्यातल्या अनोख्या नात्याचं चित्रण असलेल्या 'छोटी मालकीण' या स्टार प्रवाहच्या नव्या मालिकेच्या शीर्षक गीतामध्ये आदर्श शिंदेचा सुरेल आवाज, मनात रेंगाळणारी चाल आणि लोकगीताशी नातं सांगणारे शब्द असा उत्तम योग्य जुळून आला आहे. त्यामुळेच 'छोटी मालकीण'चं शीर्षक गीत प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलं आहे.

'वाऱ्यावर पसरले सूर मखमली, मनामंदी झुलली माझ्या तुझी सावली, रानोवनी पानोपानी प्रीत जागली, नजरेला जेव्हा तुझ्या नजर भेटली' असे रोमँटिक शब्द असलेलं हे शीर्षक गीत आहे. या गाण्यातून छोटी मालकीण रेवती आणि श्रीधर यांच्यातली केमिस्ट्रीही दिसून येते. त्यांच्या अव्यक्त नात्याविषयीही हे गाणं खूप काही सांगून जातं. नव्या दमाचे गीतकार वैभव देशमुख यांच्या शब्दांना संगीतकार देवेंद्र भोमेनं संगीतबद्ध केलं आहे. लोकप्रिय गायक आदर्श शिंदेनं त्याच्या खास शैलीत हे गाणं गायलं आहे. दररोज संध्याकाळी वाजणाऱ्या या गाण्यानं प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. तसंच हे गाणं अनेकांच्या मोबाईलची रिंगटोन झालं आहे. या गाण्याचं फिमेल व्हर्जन श्रुती आठवलेने गायलं आहे.

Watch The Song Here https://www.instagram.com/p/BhOaMlcgqWn/

Chhoti Malkeen Title Song Team 02

शीर्षक गीताविषयी आणि स्टार प्रवाहसोबत असलेल्या नात्याविषयी आदर्श शिंदे म्हणाले, "स्टार प्रवाहबरोबर काम करताना अगदी घरच्यासारखं वातावरण असतं. स्टार प्रवाहबरोबर चार-पाच मालिकांची गाणी मी गायलोय. स्टार प्रवाहनं मला मोठं केलं असंही म्हणता येईल. कारण, स्टार प्रवाहचा रिअॅलिटी शो 'आता होऊन जाऊ द्या' मधून मी महाराष्ट्रासमोर आलो. त्यामुळे स्टार प्रवाहशी माझे कायमच छान सूर जुळतात. मी आजवर गायलेल्या गाण्यांत 'छोटी मालकीण' हे एक वेगळं आणि खास असं गाणं आहे. ते प्रेक्षकांच्या पसंतीला उतरतंय याचा मला आनंद आहे"

"माझ्या पहिल्याच मराठी मालिकेसाठी शीर्षक गीत करण्याची संधी दिल्याबद्दल मी स्टार प्रवाह आभारी आहे. मी या पूर्वी एका हिंदी मालिकेचं शीर्षक गीत केलं होतं. छोटी मालकीणचं शीर्षक गीत करणं हे नक्कीच आव्हानात्मक होतं. गाणं जरी रोमँटिक असलं, तरी त्याचा बाज लोकसंगीताचा आहे. आदर्शनेही या गाण्यासाठी ओपन व्हॉईस न लावता रोमँटिक व्हॉइस लावला आहे. त्यामुळे हे गाणं श्रवणीय झालं. हे गाणं प्रेक्षकांना आवडतंय ही माझ्यासाठी नक्कीच प्रोत्साहन देणारी गोष्ट आहे,' असं संगीतकार देवेंद्र भोमेनं सांगितलं.

प्रेक्षकांची पसंती मिळत असलेलं हे गाणं ऐकण्यासाठी पहा 'छोटी मालकीण' सोमवार ते शनिवार रात्री 9 वाजता फक्त स्टार प्रवाहवर!

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement