शाहिरी जलशाच्या शैलीत समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणाऱ्या "शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला" या नाटकानं महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या नाटकाचा गौरवशाली ७०० वा प्रयोग २१ मे रोजी मुंबईतल्या यशवंतराव नाट्यगृह, माटुंगा येथे सायंकाळी ६ वाजता रंगणार आहे. महत्त्वाचं म्हणजे, या प्रयोगाला प्रसिद्ध अभिनेता आमीर खान, दिग्दर्शक नागराज मंजुळे उपस्थित राहणार आहेत.

यूटय़ूबसारख्या माध्यमामुळे अनेक हरहुन्नरी कलावंत पुढे आले आहेत. त्यातील ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ क्षेत्रातील कलाकारांनाही मोठय़ा प्रमाणावर प्रसिद्धी मिळतेय. यूटय़ूबचा बोलबाला वाढला तरीही लाइव्ह शोची गंमत कमी झालेली नाही. हेच ओळखून ‘न्यू नेस्ट’ या संस्थेने विनोदाची फटकेबाजी करणारा ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो रसिकांसाठी आयोजित केला आहे. ‘भारतीय डिजिटल पार्टी’ म्हणजे ‘भाडिपा’ या मराठमोळ्या ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ चॅनलने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या ‘भाडिपा’ चा ‘मुंबईकर, पुणेकर, नागपूरकर आणि परप्रांतीय’ हा धमाल ‘स्टॅण्ड अप कॉमेडी’ शो शुक्रवार २७ एप्रिलला ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे रात्रौ ८.३० वा रंगणार आहे. ज्योती सावंत आणि स्टीफन कैराना यांनी गुणी कलावंतांना व्यासपीठ देण्याच्या उद्देशाने ‘न्यू नेस्ट’ या संस्थेची स्थापना केलीय.

विल्यम शेक्सपिअर म्हणजेच मानवी जीवनातील भावनिक कल्लोळ भेदकपणे मांडणारी लेखणी, साहित्यप्रेमींच्या मनावर गारुड घालणारी लेखनशैली आणि जगभरातील कित्येक नाट्यकर्मींना भुरळ पाडणारं झपाटून टाकणारं लिखाण..! जागतिक रंगभूमीवरील या अढळ ताऱ्यांनं गेली साडे चारशे वर्ष रसिकमनांवर आपल्या अद्भुत लेखणीने अधिराज्य गाजवले आहे. मराठी नाट्यरसिकही त्याला अपवाद नाहीत. राम गणेश गडकरी ते कुसुमाग्रजांपर्यंत मराठी लेखक आणि नाटककारांमध्ये विल्यम शेक्सपिअरचा प्रभाव ठळकपणे जाणवला आहे. मराठी नाट्य रसिकांच्या जुन्या पिढ्यांनी मराठी रंगभूमीवर 'शेक्सपिअर' अनुभवला आहे, आता नव्या पिढीला 'शेक्सपिअर'चा विलक्षण अनुभव देण्यासाठी महाराष्ट्राची महावाहिनी झी मराठीने पुढाकार घेतला आहे. इंग्रजी रंगभूमीवर अजरामर ठरलेले 'विल्यम शेक्सपिअर' लिखित ‘हॅम्लेट’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणण्याचे शिवधनुष्य झी मराठी वाहिनीने उचलले आहे. नाना जोगांनी मराठी रूपांतर केलेल्या या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी चंद्रकांत कुलकर्णी यांनी आपल्या खांद्यावर घेतली आहे. तुषार दळवी, सुनील तावडे, भूषण प्रधान, आशिष कुलकर्णी, ओंकार कुलकर्णी, रणजीत जोग, मनवा नाईक, मुग्धा गोडबोले असे दिग्गज कलाकार यात आपल्याला दिसणार आहेत आणि 'हॅम्लेट'ची प्रमुख भूमिका ‘सुमित राघवन’ साकारणार आहे.

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याची स्थापना केली. या स्वराज्याचा विस्तार व विकास ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ ह्यांनी केला. वयाच्या विसाव्या वर्षी छत्रपती शाहू महाराजांकडून पेशवेपद स्विकारते वेळी स्वराज्यात फौज नव्हती, सैनिक सरदार नव्हते, खजिना नव्हता परंतु बाजीरावांनी ह्यावर मात करून स्वराज्याचा विस्तार केला. निष्ठावंत सैनिकांतून मल्हारराव होळकर, राणोजी शिंदे, गोविंदपंत बुंदेला ह्यांसारख्या स्वराज्यासाठी जीवाची पर्वा न करणाऱ्या अनेक शूर धाडसी सरदारांची फौज निर्माण केली. कुशाग्रबुद्धी, शस्त्रविद्या, युद्धनीती, मुत्सद्दीपणा, प्रशासन कौशल्य, चपळाई आणि नैसर्गिक व भौगोलिकतेचे भान यासारख्या गोष्टींचा योग्य वापर करून अजिंक्य योद्धा ‘श्रीमंत बाजीराव पेशवे’ ह्यांनी थेट दिल्लीच्या तख्तापर्यंत धडक मारून दिल्लीवर भगवा फडकविला. बाजीरावांनी जो पराक्रम गाजवला त्याला तोड नाही. हिंदुस्थानातील निजाम, मोगल, सिद्दी, पोर्तुगीज, इंग्रज यांसारख्या परकीय महासत्तांना मात देणारा ‘अजिंक्य योद्धा’ म्हणजे ‘श्रीमंत पेशवे बाजीराव’. म्हणूनच त्यांचं व्यक्तिमत्त्व, जीवन चरित्र व त्यांचा हा इतिहास आजच्या पिढीला ज्ञात व्हावा या उद्देशाने श्री. संजयजी पांडे यांच्या संकल्पनेतून ‘अजिंक्य योद्धा’ – ‘श्रीमंत पेशवे बाजीराव बल्लाळ’ हे महानाटय लवकरच रंगभूमीवर साकारले जाणार आहे.

‘संस्कृती कलादर्पण’ चा त्रीदिवसीय नाट्य महोत्सवाचा उद्घाटन सोहळा नुकताच माटुंगाच्या यशवंत नाट्यगृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवाचे उद्घाटन स्टार प्रवाहाच्या हेड श्रावणी देवधर आणि म.न.से महिला प्रमुख शर्मिला ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. अभिनेत्री स्मिता जयकर, विजय पाटकर, मिलिंद गवळी, अनंत पणशीकर, प्रदीप कबरे, नीता लाड, अक्षय बदरापुरकर, अक्षय कोठारी आदि उपस्थित मान्यवरांनी यावेळी महोत्सवाला शुभेच्छा दिल्या. यंदा नाट्यमहोत्सवाचे १८ वे वर्ष असून, सालाबादप्रमाणे यावर्षीदेखील नाट्यरसिकांचा या महोत्सवाला उदंड प्रतिसाद लाभला.

पती-पत्नीचं नातं आणि जगण्यातला स्ट्रेस यावर भाष्य करणाऱ्या 'डोण्ट वरी बी हॅप्पी' या नाटकाने मराठी रंगभूमीवर यशस्वी कामगिरी केली आहे. सोनल प्रॉडक्शन्सच्या नंदू कदम निर्मित मिहीर राजदा लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित या नाटकातील उमेश कामत आणि स्पृहा जोशी ही जोडीदेखील प्रेक्षकांमध्ये हिट ठरली असून, अनेक जोडप्यांसाठी हे नाटक कौन्सेलरचे काम करतानादेखील दिसून येत आहे. उमेश - स्पृहाच्या नैसर्गिक अभिनयाने रसिकांना 'हॅप्पी' करणाऱ्या या नाटकात लवकरच महत्वपूर्ण बदल घडणार आहे.

Advertisement