Trailers / Teasers
Typography

रुपेरी पडद्यावरील लग्नांबाबत बोलायचं झालं तर इथली बरीच लग्न अविस्मरणीय ठरली आहेत. रुपेरी पडद्यावरील अशाच एका लग्नाची चर्चा मागील काही दिवसांपासून चित्रपटसृष्टीत सुरू आहे. हे अनोखं लग्न मोठ्या पडद्यावर कधी पहायला मिळतंय याची उत्सुकता साऱ्यांनाच लागली होती, पण आता ती संपली आहे. मराठी रसिकांचे लाडके कलाकार म्हणजेच वैभव तत्त्ववादी आणि प्रार्थना बेहरे यांची प्रमुख भूमिका असलेला ‘What’s up लग्न’ हा चित्रपट १६ मार्चला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘फिनक्राफ्ट मीडिया’ अँड ‘एन्टरटेन्मेंट प्रा. लि’. या बॅनरखाली तयार झालेल्या या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले आहे.

‘नटसम्राट’ चित्रपटाची निर्मिती करणाऱ्या विश्वास जोशी यांनी या चित्रपटाच्या निमित्ताने आपली दिग्दर्शकीय इनिंग सुरु केली आहे. जाई जोशी व व्हिडीओ पॅलेस यांची प्रस्तुती असणाऱ्या ‘What’s up लग्न’ या चित्रपटाच्या प्री प्रोडक्शन व मार्केटिंग बाबत नानूभाई जयसिंघानी यांचे सुरुवातीपासून सहकार्य लाभले आहे. या चित्रपटातील गीते सध्या गाजतायेत त्यामागे दिग्दर्शकांनी दाखवलेला दृष्टीकोन मोलाचा ठरला आहे. संगीतसुद्धा चित्रपटासाठी महत्त्वाचे असल्याने चित्रपट चित्रिकरणाच्या आधीपासून या गीतांचे नियोजन करण्यात आले.

Watch The Trailer Here

‘कॉफी आणि बरंच काही’आणि मि. अँड मिस्टर सदाचारी या चित्रपटानंतर वैभव आणि प्रार्थना या हिट जोडीचा हा तिसरा चित्रपट आहे. या जोडीसोबत विक्रम गोखले, वंदना गुप्ते, विद्याधर जोशी, स्नेहा रायकर, अश्विनी कुलकर्णी, ‘राधा प्रेम रंगी रंगली’ फेम वीणा जगताप आदी मराठीतील नामवंत कलाकार या चित्रपटात आहेत. सोबत सुनील बर्वे, सविता मालपेकर आणि जयवंत वाडकर पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

या चित्रपटाची संकल्पना आणि लेखनसहाय्य विश्वास जोशी यांचं आहे. अभिराम भडकमकर आणि विश्वास जोशी यांनी मिळून ‘What’s up लग्न’ ची कथा लिहिली असून, पटकथा व संवादलेखन मिताली जोशी, अश्विनी शेंडे आणि विश्वास जोशी यांनी केलं आहे. तेरे नाम,ओएमजी, वॅाण्टेड या हिंदी चित्रपटाचे छायांकन करणारे सेतु श्रीराम या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपट करीत आहेत. संकलनाची जबाबदारी फैजल महाडीक आणि इम्रान महाडीक यांनी पार पाडली आहे. अश्विनी शेंडे आणि क्षितीज पटवर्धन यांनी लिहिलेल्या गीतांना संगीतकार निलेश मोहरीर, ट्रॅाय-आरीफ आणि यांनी संगीत दिलं आहे. हृषिकेश रानडे, निहीरा जोशी-देशपांडे, केतकी माटेगावकर, श्रुती जोशी या गायकांनी WHAT’S UP लग्न’ मधील गाण्यांना सुमधूर सूर दिला आहे. या गाण्यांवर फुलवा खामकर, सुजीत कुमार आणि भक्ती नाईक यांनी कोरिओग्राफी केली आहे. आदित्य बेडेकर यांनी पार्श्वसंगीत दिलं आहे, तर कला दिग्दर्शन शैलेश महाडीक यांनी केलं आहे.

नातेसंबध, सध्याची जीवनशैली दाखवतानाच तंत्रज्ञानाने आपल्याला कवेत घेतले आहे की, आपण तंत्रज्ञानाला कवेत घेतले आहे यावर ‘What’s up लग्न’ मार्मिक पद्धतीने भाष्य करतो. धावपळीच्या युगात स्मार्ट सवांद साधत नातेसंबधाची वीण कशा पद्धतीने जपली जाते हे दाखवणारा ‘What’s up लग्न’ हा चित्रपट प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देऊन जाईल हे नक्की.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement

Latest News