Trailers / Teasers
Typography

बालपण म्हणजे खुशाल बागडण्याची, धम्माल मस्ती करण्याची पर्वणीच असते. उद्यानांमध्ये आपल्याला निरनिराळ्या रंगांची, सुगंधांची आणि आकारांची सुंदर सुंदर फुले दिसतात. त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये देखील अनेक रंगांचे आणि छटांचे मिश्रण असते. अशाच बालपणीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या ‘मंकी बात’ या धम्माल बालचित्रपटाचा भन्नाट ट्रेलर रिलीज झाला आहे.

चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये एक लहान मुलगा (वायू) दिसतो. त्याला सगळीकडे सतत दुर्लक्षित केले जाते. त्याच्या वयाची मुले त्याच्याबरोबर खेळत नाहीत. शाळेतील शिक्षक त्याची त्याच्या पालकांकडे तक्रार करत असतात, सोसायटीचा वॉचमन देखील त्याच्याबद्दल सातत्याने तक्रार करत असतो. एकंदरीत सर्वांचीच वायुबाबत काही न काही तक्रार असल्याने त्याचे पालकही त्याच्यावर नाराज होतात. दुसरीकडे सतत डावललं जाण्याच्या भावनेने वायू हताश होतो. कुणीही आपलंस करत नाही या भावनेने त्याची कुचंबणा होते. “आपले वागणे नेहमीच इतरांना चुकीचे वाटते, त्यामुळे आता चुकीचेच वागायचे”, असे तो ठरवतो. पुढे जी काही धम्माल करतो ती या ट्रेलर मध्ये दिसते.

तसेच यामध्ये एक अनोखे सरप्राईज दडलेले आहे, त्या व्यक्तीचे वागणे, बोलणे, वेशभूषा सगळं काही आकर्षक असतं. कधी तो कॅप घालून स्टायलिश लुकमध्ये दिसतो तर कधी नोकराच्या भूमिकेत, तर कधी मिशी वाढलेली. कधी साधी पांढरी टोपी घालून दिसतो तर कधी कामगाराचे कपडे घालून वावरताना दिसतो. विशेष म्हणजे त्याच्या हातात सतत वही, पुस्तके, चावी, फिजेट स्पिनर असे काही ना काही फिरताना दिसते ती व्यक्ती म्हणजे अवधूत गुप्ते. वेदांत आपटे आणि त्यांच्यातील अनोख्या संवादामुळे चित्रपटाची उत्कंठा शिगेला पोहचली आहे.

Watch the Trailer Here

दिग्दर्शक विजू माने यांची ‘मंकी बात’ हि कलाकृती लहान मुलांसाठी उन्हाळ्याच्या सुट्ट्यामधली खास मेजवानी ठरणार आहे. प्रोऍक्टिव्ह प्रस्तुत, निष्ठा प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाची प्रस्तुती आकाश पेंढारकर, विनोद सातव, अभय ठाकूर, प्रसाद चव्हाण, शंकर कोंडे यांची असून विवेक डी, रश्मी करंबेळकर, मंदार टिल्लू आणि विजू माने निर्माते आहेत. चित्रपटाची कथा महेंद्र कदम आणि विजू माने यांची, गीते आणि संवाद संदीप खरे यांचे तर संगीत डॉ. सलील कुलकर्णी यांनी दिले आहे. ‘मंकी बात’ मध्ये बालकलाकार वेदांत आपटे, पुष्कर श्रोत्री, भार्गवी चिरमुले, अवधूत गुप्ते, मंगेश देसाई, विजय कदम, नयन जाधव आदी कलाकार आहेत.

बच्चेकंपनीसाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत धम्माल मनोरंजन घेउन येणारा ‘मंकी बात’ येत्या १८ मे रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

4 1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 4.00 (1 Vote)
Related Article You May Like
Advertisement

Latest News