Trailers / Teasers
Typography

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते, ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावरून आपल्या भेटीला येणार आहेत. ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सुबोध भावे, सुमीत राघवन, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे.

चरीत्रपटांचा बादशहा अभिनेता सुबोध भावे काशिनाथ घाणेकरांची भूमिका साकारत आहे. मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. मराठी व्यावसायिक रंगभूमीला त्यांनी वैभवाचे दिवस आणले. डॉ. श्रीराम लागू, मास्टर दत्ताराम, प्राध्यापक वसंत कानेटकर, भालजी पेंढारकर, सुलोचना दीदी, प्रभाकर पणशीकर अशा व्यक्तिरेखा चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. त्यांची झलक या टीझरमध्ये दाखवण्यात आली आहे.

टिझर इथे पहा

दिवाळीच्या मुहूर्तावर ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. १९६० च्या दशकावर आधारीत असलेल्या ‘आणि..डॉ. काशिनाथ घाणेकर’ मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. त्यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमयरित्या बदलून टाकला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement