Video Songs
Typography

कोणताही खेळ खेळण्यासाठी खेळाडूला अफाट कष्ट करावे लागतात, जीवतोड मेहनत ही करावीच लागते. एका बॉक्सरच्या घडण्याचं दर्शन घडवणारं "दमछाक...." हे "बेधडक" या चित्रपटातलं गाणं सोशल मीडियात चांगलंच लोकप्रिय ठरलं आहे. दमदार शब्द, उत्तम संगीत आणि अप्रतिम छायांकन ही या गाण्याची वैशिष्ट्य आहेत. "बेधडक" हा चित्रपट १ जून रोजी प्रदर्शित होत आहे.

"दमछाक" या गाण्यात बॉक्सर कशा पद्धतीन घडतो याचं चित्रण करण्यात आलं आहे. आपल्या प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली सराव करणं, त्याबरोबरच दमणं, खचणं, चिडचिड करणं या सगळ्या भावभावना या गाण्यात टिपल्या आहेत. उच्च दर्जाच्या सिनेमॅटोग्राफीमुळे हे गाणं पाहण्याचा अप्रतिम अनुभव मिळतो. त्यामुळेच या गाण्याला सोशल मीडियात उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

गाण्याविषयी दिग्दर्शक संतोष मांजरेकर म्हणाले, "'दमछाक' हे गाणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यात एक प्रवास मांडण्यात आला आहे. खेळाडू कसा घडतो याचं हे एक प्रकारे दर्शन आहे. "बेधडक" हा खेळावर आधारित चित्रपट असल्यानं तो तितक्याच उत्तम पद्धतीनं चित्रीत करणं गरजेचं होतं. निर्माते मंदार गोविंद टावरे यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिल्यानं चित्रपटाच्या निर्मिती मुल्यांमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही."

Watch The Song Here

राही प्रॉडक्शन्सच्या मंदार गोविंद टावरे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गोविंद टावरे यांचं चित्रपट लेखन, सुरेश देशमाने यांची उत्तम सिनेमॅटोग्राफी तर "मी शिवाजीराजे भोसले बोलतोय", "सुराज्य" असे उत्तमोत्तम चित्रपट केलेल्या संतोष मांजरेकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

गिरीश टावरे याचं अभिनेता म्हणून या चित्रपटातून पदार्पण होत असून अभिनेते अशोक समर्थ, गणेश यादव, सुश्रुत मंकणी, अनंत जोग, प्रसाद लिमये, अभिनेत्री नम्रता गायकवाड, स्नेहा रायकर, पूनम फणसे अशी या चित्रपटाची स्टारकास्ट आहे. प्रवीण शशिकांत जगताप याने कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे. मंगेश कांगणे,गोविंद टावरे आणि प्रवीण बांदेकर यांनी लिहिलेल्या गीतांना प्रवीण बांदेकर यांचे संगीत लाभले असून आदर्श शिंदे,सिद्धार्थ महादेवन, बेला शेंडे, आनंदी जोशी, प्रवीण बांदेकर यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गाणी स्वरबद्ध करण्यात आली आहेत.

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Advertisement