नितीन केणी प्रस्तुत आणि निशिता केणी लिखित व दिग्दर्शित 'बोगदा' या आशयघन सिनेमाचा नुकताच सोशल नेट्वर्किंग साईटवर 'झुंबड' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले. मृण्मयी देशपांडेवर आधारित असलेले हे गाणे, प्रेक्षकांना आपल्या ठेकात आणि तालात मंत्रमुग्ध करणारे आहे. मंदार चोळकर लिखित 'झुंबड' या गाण्याचे संगीत दिग्दर्शन सिद्धार्थ शंकर महादेवन आणि सौमील श्रींगारपुरे या दुकलीने केले असून, सिद्धार्थ शंकर महादेवनचा सुमधुर आवाज या गाण्याला लाभला आहे. बोगदा चित्रपटातील हे गाणे प्रेक्षकांना दर्जेदार संगीताची आणि नृत्याची अनुभूती देणारे ठरणार आहे.

मैत्रीच्या निरागस, निखळ नात्यावर असलेल्या दोस्तीगिरी सिनेमाचे ‘तुझी माझी यारी दोस्ती’ हे गाणे रिलीज झाले आहे. जागतिक मैत्री दिनाच्या सूमारास रिलीज झालेल्या ह्या गाण्यात मैत्रीतला गोडवा, खोडसाळपणा दिसून येतो आहे.

प्रख्यात अभिनेता अक्षय कुमारने ‘चुंबक’ चित्रपटाची प्रस्तुती करायची घोषणा सोशल मीडियावर अस्सल मराठीत केल्यापासून मराठी चित्रपटसृष्टीत या चित्रपटाचा बोलबाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर सुद्धा स्वतः अक्षय कुमारने प्रकाशित केल्यामुळे चित्रपटाची उत्सुकता अजूनच वाढायला लागली आहे. तसेच ‘चुंबक’ चित्रपटातील गाणी नुकतीच प्रकाशित करण्यात आली. या गाण्यांना सुद्धा संगीत रसिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. त्यामधील पहिले गाणे “खेचा खेची, गडबड गोची” हे असून ते स्वतः स्वानंद किरकिरे यांनी गायले आहे. या गाण्याला ओमकार कुलकर्णी यांनी शब्दांकित केले असून साकेत कानेटकर यांनी संगीत दिले आहे. तर दुसरे गाणे “चुंबक चिटक चिटकला चुंबक” हे गाणे बॉलीवूड मधील आघाडीचा गायक दिव्या कुमार याने गायले आहे. त्याशिवाय मराठी चित्रपटांमधील आघाडीची अभिनेत्री, ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि ‘बालगंधर्व’ फेम विभावरी देशपांडे हिने पहिल्यांदाच या सिनेमाकरीता म्हणजे ‘चुंबक चिकटला’ या शीर्षक गीताचे शब्द लिहिले आहेत. या गाण्यांची संगीत रचना अमर मंग्रुलकर यांची आहे.

लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या सिनेमातील नुकतेच 'गूज' हे गाणे प्रदर्शित करण्यात आले आहे. समाजातील दाहकता आणि वास्तविकता चिमुकल्या डोळ्यातून पाहण्याचा नवा दृष्टीकोन या सिनेमात मांडण्यात आला असून, 'गूज' या गाण्यामधून देखील ते प्रकर्षाने दिसून येते. येत्या २७ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमातील हे गाणे ओमकार कुलकर्णी याने लिहिले असून, देबारपितो यांचे काळजाला भिडणारे संगीत त्याला लाभले आहे.

प्रेमाच्या विरहातील गाणी सध्या तरुणाईमध्ये खूपच गाजतात. त्यात आता एक नवं गाणं तरुणाईच्या भेटीला आले आहे. प्रसिद्ध गायक अवधूत गुप्तेचे ‘लव्ह लफडे’ सिनेमातील ‘तु परी’ हे गाणं नुकतचं रिलीज झालं आहे. संगीत दिग्दर्शक अनय नाईक, नृत्य दिग्दर्शक नितीन जाधव, तर गाण्याचे शब्द सचिन आंबत, संजय मोरे, अजय थोर्वे या तरुणांनी रचले आहेत. “धुंद स्वप्नातला, धुंद चेहरा तुझा, धुंद झाली नजर, जीव वेडावला, माझ्या मनातली तुच परी” या गीताला तरुणांचा आवाज म्हणून ओळखला जाणारा अवधूत गुप्तेचा आवाज भावनिक करुन जातो. अवधूत गुप्तेच्या सुंदर आवाजामुळे ती परी आपल्यासमोर आपसूक उभी राहते.

लहान मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या आगामी सिनेमातील एक रंगबेरंगी गाणे, नुकतेच लाँच करण्यात आले. चानी आणि बाळूच्या निरागस मैत्रीवर आधारित असलेल्या, या सिनेमातील 'ता ना पि हि नि पा जा' हे इंद्रधनुष्याच्या रंगाची उधळण करणारे गाणे, बालमनाला भुरळ पाडणारे आहे.

Advertisement