Web Show
Typography

पु. ल. देशपांडे हे महाराष्ट्राच्या अगदी घरा-घरापर्यंत पोहोचलेले नाव. लेखक, नाटककार, नट, दिग्दर्शक, प्राध्यापक, संगीतकार, असे बहुआयामी व्यक्तिमत्व लाभलेले ‘पु.ल.’ महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व म्हणून परिचित असले तरी राष्ट्रीय पातळीवर तितकीशी प्रसिद्धी त्यांना लाभली नाही, हे एक नवलच. आता ही पोकळीदेखील भरून काढायला सज्ज झालीय, सब टीव्ही वर २१ जुलै रोजी सुरु होत असलेली “नमुने” ही मालिका! पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ मधील पात्रांवर आधारित असलेल्या या मालिकेत खुद्द पुलंची भूमिका साकारत आहेत प्रसिद्ध विनोदी अभिनेते संजय मोने. तसेच सर्वांचे लाडके व ज्येष्ठ नट दिलीप प्रभावळकर हे सुद्धा “नमुने”मध्ये हरितात्या हे पात्र साकारत आहेत. या मालिकेच्या निमित्ताने ‘वाजवा’ या युट्युब चॅनेलने 'चॅट मसाला' या कार्यक्रमात 'नमुने'मधील या अभिनेत्यांची एक मुलाखत घेतली. प्रसिद्ध अभिनेत्री पर्ण पेठे हिने या मुलाखतीत दिलीप प्रभावळकर आणि संजय मोने यांच्यासोबत पुलंच्या आठवणींना उजाळा दिला.

दिलीप प्रभावळकर यांनी यावेळी त्यांच्या विद्यार्थीदशेतच त्यांच्यावर पुलंचा कसा प्रभाव पडला याची आठवण सांगितली. पुलंचा महाराष्ट्रावर असलेला सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभाव, त्यांनी जिवंत केलेली विविध पात्रे तसेच पुलंच्या साहित्यातील विविध पैलू याविषयी यावेळी चर्चा झाली. पुलंची भूमिका साकारताना आलेल्या विविध अडचणींविषयीदेखील संजय मोने यांनी या मुलाखतीत सांगितले. पुलंचा राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेला गौरव, वास्तविक जीवनातही आढळून येणारी पुलंची पात्रं व त्यांचे गुणविशेष, प्रत्येक गोष्टीतून येणारा पुलंचा आशावाद यामुळे पुलंच्या कलाकृती राष्ट्रीय पातळीवर कशा महत्त्वाच्या ठरतात यावरदेखील या मुलाखतीत चर्चा झाली.

'चॅट मसाला'चा हा ‘पुल’मय एपिसोड तुम्ही पाहू शकता “वाजवा” च्या युट्यूब चॅनेलवर. पुलंच्या 'व्यक्ती आणि वल्ली'वर आधारित 'नमुने' ही मालिका २१ जुलै रोजी सुरु होत असून दर शनिवारी व रविवारी रात्री ९ वाजता सब टीव्हीवर ती पाहता येईल.

Watch the Interview Episode Here

1 1 1 1 1 1 1 1 1 1 Rating 0.00 (0 Votes)
Related Article You May Like
Advertisement